Sunday 21 February 2016

राजवाडीच्या शेतकऱ्यांचा स्वामीनाथन यंच्या हस्ते गौरव

                  भारतातील शेतकरी असुरक्षित – स्वामीनाथन

सिंधुदुर्गनगरी - शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीचा आग्रह मी नेहमीच धरला आहे. शेतकर्‍यांना उत्पन्न मिळाले नाही तर शेतकरी काम कसा करणार? शेतकर्‍याला त्याने उत्पादीत केलेल्या मालाला हमी मिळाली पाहिजे. बाजारमूल्य मिळाले पाहिजे. सध्या शेतकरी असुरक्षित आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुटण्यासाठी आपण सादर केलेला अहवाल केंद्र शासनाने स्वीकारला पाहिजे, असे मत हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी व्यक्त केले. किर्लोस (सिंधुदुर्ग) येथील सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानतर्फे नुकत्याच (ता. १८ फेब्रुवारी) झालेल्या सिंधु अॅग्रो फेस्ट व प्रदर्शन या कार्यक्रमातील चर्चासत्रात बोलत होते. या समारंभात राजवाडीच्या ग्रामस्थांचा सत्कार डॉ. स्वामीनाथन यांच्या हस्ते झाला.
      श्री. स्वामिनाथन यांना देशातील पहिला 'भारत कृषी रत्न' पुरस्कार ब्रिगेडिअर सुधीर सावंत,  मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, तसेच भारत रत्न पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. एक लाख रुपये सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी कुलगुरु रविप्रकाश दाणी, डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. योगेश नेरकर, डॉ. चक्रवर्ती, अँड. राजेंद्र कोरडे, एस. आर. देवकर, माजी आमदार राजन तेली, डॉ. विलास सावंत आदी उपस्थित होते.  स्वामिनाथन पुढे म्हणाले,  महाराष्ट्र व केरळमधील शेतकर्‍यांची स्थिती मला ज्ञात आहे. महाराष्ट्रामधील आत्महत्या ही भीषण समस्या आहे. पूर्वी शास्त्रज्ञ शेतकर्‍यांकडे जात नव्हते. परंतु आता बदल झाला आहे. १९४२ मध्ये झालेली क्रांती शेतकर्‍यांना प्राधान्य दिल्यामुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. रमेश ठाकरे म्हणाले, जगातील ९0 देशांनी डॉक्टरेट दिलेल्या व १९६६-६७ मध्ये भारताच्या हरितक्रांतीचे जनक असलेल्या डॉ. स्वामिनाथन यांचे पाय सिंधुदुर्गात लागल्याने कोकणसाठी हा सोन्याचा दिवस आहे. डॉ. स्वामिनाथन हे शेतकर्‍यांचे देव आहेत, असेही ठाकरे म्हणाले. ३६ वर्षानंतर स्वामिनाथन कोकणात आले आहेत. त्यांचा हा दौरा संपूर्ण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारा ठरेल, असा विश्‍वास कुलगुरु डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

.........................
संगमेश्वर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील राजवाडी  गावातील ग्रामस्थ प्रयोगशील म्हणून ओळखले जातात. जलव्यवस्थापन, शेती, बचत गटासह विविध उपक्रमांमध्ये या गावाने स्वतःचे असे वैशिष्ट्य निर्माण केले आहे. या संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौरव झाला. त्याच वृत्तांत.




No comments:

Post a Comment