Wednesday, 29 July 2015

"गीतारहस्य' चर्चासत्रानिमित्ताने आयोजित शोभायात्रा, ग्रंथदिंडी रद्द

रत्नागिरी – गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीच्या निमित्ताने रत्नागिरीत होणार असलेल्या चर्चासत्राच्या प्रारंभी आयोजित केलेली शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी राष्ट्रीय दुखवट्यामुळे रद्द करण्यात आली आहे. चर्चासत्र मात्र नियोजनानुसार होणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याविषयी सांगोपांग परिचय घडविण्यासाठी रत्नागिरीत चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन गीता भवनात होणार आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्राच्या प्रारंभी एक ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता टिळक आळीतील लोकमान्यांच्या जन्मस्थानापासून गीता भवनापर्यंत शोभायात्रा आणि ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. शहरातील शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होणार होते. मात्र ही दिंडी आणि शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे कोकण विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली. दोन दिवसांचे चर्चासत्र मात्र नियोजनानुसार होणार असून एक ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे.


Tuesday, 14 July 2015

गीतारहस्यविषयक चर्चासत्रासाठी कतारमधून अठरा हजाराची देणगी

                     रत्नागिरी – लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने रत्नागिरीत होणाऱ्या चर्चासत्रासाठी कतारमधील मराठीभाषिकांनी अठरा हजाराची देणगी नुकतीच दिली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याविषयी सांगोपांग परिचय घडविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन गीता भवनात होणार आहे. दोन दिवसांच्या या चर्चासत्रासाठी आता व्यवसायानिमित्ताने कतारमध्ये वास्तव्य असलेले मूळचे रत्नागिरीतील रहिवासी गणेश कृष्णा पाटील यांनी व्यक्तिगतरीत्या पाच हजार आणि कतारमधील गणेश मित्रमंडळातर्फे तेरा हजार रुपये अशी अठरा हजाराची देणगी आयोजकांकडे सुपूर्द केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी ती स्वीकारली. याशिवाय रत्नागिरी जिल्हा पदवीधर शिक्षक संघटनेने पंचवीस हजाराची देणगीही ही श्री. लिमये यांच्याकडे सुपूर्द केली.

                सर्वांच्या सहकार्याने चर्चासत्र पार पडणार असून इच्छुकांनी देणग्या देऊन आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन गीता मंडळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानच्या कोकण विभागीय कार्यालयाशी (टिळक आळी, रत्नागिरी. दूरध्वनी – 02352-222701) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sunday, 12 July 2015

काजरघाटी येथील मठात १७ जुलै रोजी टेंब्ये स्वामींची १०१ वी पुण्यतिथी

रत्नागिरी – शहराजवळील पोमेंडी खुर्द (काजरघाटी) येथील मठात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामींच्या पादुका आहेत. मठात दरवर्षीप्रमाणे आषाढ शुद्ध प्रतिपदेला म्हणजे येत्या शुक्रवारी (ता. १७) पुण्यतिथी उत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा १०१ वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उत्सवानिमित्ताने गेल्या १० जुलैपासून श्री गुरुचरित्र वाचन सुरू आहे. पुण्यतिथीदिनी १७ जुलै रोजी सकाळी वाजता श्रींच्या पादुकांची षोडशोपचार महापूजा आणि अभिषेक, सकाळी ११ त दुपारी या वेळेत यतिअर्चा,  तीर्थराजजपूजन, आरती, मंत्रपुष्प, दुपारी ते या वेळेत महाप्रसाद,  सायंकाळी ते या वेळेत पुण्यातील हभप पुंडलिकबुवा हळबे यांचे कीर्तन होईल. सायंकाळी वाजता श्रींची पूजा आणि आरती, मंत्रपुष्प होईल.

या सर्व कार्यक्रमांना भक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री टेंब्ये स्वामी पादुका मठ भजन मंडळाने केले आहे.

बारामतीजवळच्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याचे आवाहन

सुरेश खोपडे यांचा उपक्रम : विद्यार्थी, पर्यटक, अभ्यासकांसाठी उपयुक्त


रत्नागिरी – बारामती (जि. पुणे) येथे नव्याने साकारणार असलेल्या संग्रहालयासाठी शंखशिंपले पाठविण्याचे आवाहन माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.
श्री. खोपडे महाराष्ट्राला परिचित आहेत. भिवंडी येथील जातीय दंगली थांबविण्यासाठी त्यांची केलेले मोहल्ला कमिटीचे प्रयोग जगभरात वाखाणले गेले आहेत. पोलिस दलाची कार्यपद्धती बदलून लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी पोलिस सेवेत असताना मोठा लढा दिला आहे. निवृत्त झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. याचाच एक भाग म्हणून श्री. खोपडे बारामती तालुक्यातील मोरगावजवळील ढोलेमळा येथील त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करीत असतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी असे विविध वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचा त्यांचा मानस आहे. अश्मयुगापासूनचा जगाचा इतिहास याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची कल्पना आहे. त्यामध्ये खडकांचे विविध नमुने, विविध वाद्यांचे नमुने, क्रीडासाहित्य, नाण्यांचे आणि नोटांचे संकलन असेल. हा संग्रह संबंधित व्यक्तीच्या नावाने या संग्रहालयात ठेवला जाणार आहे. हे संग्रहालय अष्टविनायकांपैकी एक गणपती असलेले मोरगाव तसेच खंडोबाची जेजुरी या दोन तीर्थक्षेत्रांपासून जवळ असेल. तेथे येणारे भाविक तसेच विद्यार्थी आणि अभ्यासकांनाही या विविध वस्तुसंग्रहालयाचा फायदा होणार आहे.
याच संग्रहालयात प्रामुख्याने कोकणात समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या शंखशिंपल्याचे विविध नमुने ठेवले जाणार आहेत. कोकणात किंवा अन्यत्र राहणाऱ्यांकडे शंखशिंपल्यांचा असा संग्रह असेल, त्यांनी ९८८१०९८१३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. खोपडे यांनी केले आहे.

Friday, 10 July 2015

यशवंतराव चव्हाण पारितोषिकासाठी नावे सुचविण्याचे आवाहन

रत्नागिरी - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव सुचविण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पहिल्या स्मृतिदिनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची मुंबईत स्थापना झाली. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिष्ठानचे कामकाज चालते. प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तीला किंवा दरवर्षी दोन लाख रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिकही दिले जाते. यावर्षी कृषी-औद्योगिक समाजरचना व्यवस्थापन किंवा प्रशासन, सामाजिक एकात्मता, ग्रामीण विकास, मराठी साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रात महाराष्ट्रात भरीव आणि पथदर्शी कार्य करणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला हे पारितोषिक दिले जाणार आहे. रोख दोन लाख रुपये आणि मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप आहे.
      या पारितोषिकासाठी सुयोग्य व्यक्ती किंवा संस्थेचे नाव विहित पद्धतीनुसार सुचविण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाशी (जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई-२१) संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कोकण विभागाचे अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले आहे. नावे सुचविण्याची अंतिम मुदत येत्या ३० सप्टेंबरपर्यंत आहे.
.............
प्रेषक – राजाभाऊ लिमये, कोकण विभाग अध्यक्ष, रत्नागिरी. (फोन - ९४२३०५१९७४))

Sunday, 5 July 2015

गीतारहस्य शताब्दीनिमित्ताने निबंध स्पर्धांचे आयोजन

रत्नागिरी – लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असून शताब्दी साजरी करण्याचा निर्णय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोकण विभागाने गीता मंडळाच्या सहकार्याने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
       स्पर्धेचे गटवार विषय असे :  पहिला गट (खुला आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी) – लोकमान्य टिळकांचे लेखन आणि संशोधन. दुसरा गट (कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी) – गीतेचे महत्त्व आणि लोकमान्य टिळकांची भूमिका, तिसरा गट (आठवी ते दहावी) – लोकमान्य टिळक जीवनदर्शन. पहिल्या गटातील विजेत्यांना 750, 500 आणि 250 रुपये, दुसऱ्या गटाला 500, 300 आणि 200 रुपये, तर तिसऱ्या गटाच्या विजेत्यांना अनुक्रमे 300, 200 आणि 100 रुपयांची बक्षिसे दिली जातील. स्पर्धेकरिता येत्या 20 जुलैपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, गणपती मंदिरासमोर, टिळक आळी, रत्नागिरी या पत्त्यावर निबंध पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
       दरम्यान, येत्या 1 आणि 2 ऑगस्ट रोजी गीतारहस्याचा सांगोपांग परिचय करून देणारे चर्चासत्र रत्नागिरीच्या गीता भवनात आयोजित करण्यात आले आहे. निवडक 100 अभ्यासकांनाच चर्चासत्राला प्रवेश दिला जाणार असून इच्छुकांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा.



संपर्क - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, टिळक आळी, रत्नागिरी फोन (02352) 221701






Thursday, 25 June 2015

मठ येथील पल्लीनाथ मंदिरात अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग

रत्नागिरी – मठ (ता. लांजा) येथील लक्ष्मीपल्लीनाथाच्या नूतन मंदिरात अधिक आषाढ मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. येत्या शनिवार-रविवारी (ता. 27 आणि 28 जून) हा याग होणार आहे.
चाळीस कुळांचे कुलदैवत असलेल्या लक्ष्मीपल्लीनाथाचे मंदिर मठ येथे अलीकडेच बांधण्यात आले आहे. देवस्थानाच्या कुलोपासकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर साकारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार मंदिराची उभारणी सुरू असून म्हैसूरच्या काळ्या ग्रॅनाइटच्या कोरीव कामाने गाभाऱ्याचे, तर स्थानिक जांभ्या दगडाने घुमट आणि कळसाचे काम पूर्ण झाले आहे. या मंदिरात ध्यानमंत्राप्रमाणे पल्लीनाथ, गणेश आणि महालक्ष्मीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा नुकतीच पंचकुंडी प्रकाराने झाली आहे. त्यानंतर प्रथमच आलेल्या अधिक मासानिमित्ताने पुरुषोत्तम याग आयोजित करण्यात आला आहे. अधिक मास म्हणजे श्रीकृष्णाचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. त्यानिमित्ताने श्रीकृष्णाची आराधना करण्यासाठी हा याग केला जाणार आहे.
शनिवारी (ता. 27) दुपारी 3 वाजता पुण्याहवाचनाने यागाचा प्रारंभ आणि रात्री अष्टोपचार सेवा केली जाईल. रविवारी हवन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी या यागाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.