रत्नागिरी : पूर्वसंध्येला
निघालेल्या भव्य शोभायात्रेसह रत्नागिरीत १४ ते १६ डिसेंबर या काळात झालेली तीन
दिवसांची जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी झाली. शिस्तबद्धता आणि
पर्यावरणस्नेह हे या परिषदेचे वैशिष्ट्य होते. प्रदूषणमुक्तीसाठी
प्लास्टिकमुक्तीचा संदेश परिषदेतून दिला जात असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर
निमकर यांनी उद्घाटन समारंभात सांगितले. तसेच तो उद्देश साध्य झाल्याचे त्यांनी
समारंभ संपल्यानंतरही आवर्जून नमूद केले.
रत्नागिरीच्या प्रमोद महाजन
क्रीडा संकुलात उभारलेल्या आर. सी. काळे नगरीमध्ये ही परिषद झाली. जगभरातून सुमारे
तीन हजार प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. अमेरिकेतील सीटी ग्रुपचे डायरेक्टर
प्रशांत जुवेकर उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एआय,
डेटा ॲनलिसिस, बिग डेटा, अशा स्वरूपाचे नवे
अभ्यासक्रम येत आहेत. त्याचा उपयोग बँकिंग, विमा व वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे
करिअरसाठी नव्या संधी आहेत. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि आयटी कंपन्या येथे येत आहेत.
विद्यार्थ्यांनी विचार करून याचा फायदा उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की,
मी रसायन अभियांत्रिकी
शिकलो. सिटी ग्रुपच्या ग्लोबल केमिकलचा मॅनेजिंग हेड आहे. माझी टीम लंडन, हाँगकाँगमध्ये काम करते.
जगभरातील पेट्रोकेमिकल उद्योगांचा आम्ही सर्वांगीण अभ्यास करतो. ब्राझीलमध्ये
मक्यापासून इथेनॉल निर्माण करतात आणि ते लिटरमागे दहा टक्के या प्रमाणात वापरतात.
मात्र पेट्रोलमुळे मोठे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक कार्स
वापरणार्यांरची संख्या वाढणार आहे. येत्या २०२५ पर्यंत ही संख्या दहा टक्क्यांवर
पोहोचेल.
यावेळी खासदार विनायक राऊत
यांनी रत्नागिरी शहर दर्जेदार बनवण्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न
असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबई
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, विद्यार्थी साहाय्याक संस्था व परिषदेचे अध्यक्ष डॉ.
चंद्रशेखर निमकर, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी, सतीश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी,
राजू भाटलेकर, अभिनेत्री संपदा
जोगळेकर-कुलकर्णी दिवाकर निमकर, श्रीनिवास कानडे, इंद्रनील भोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद जोशी, श्रीकांत मुकदम, वीणा ढापरे, प्रशांत जोशी, सुरेश शितूत, दीपक निमकर, उल्हास मुळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल पिंपुटकर, ॲड. श्रीनिवास भोळे, जयंत चापेकर, वृंदा निमकर, अरुण जोशी, समीर निमकर, पत्रकार अरविंद कोकजे,
यांचा यावेळी सत्कार करण्यात
आला.
कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले
की, मुंबई
विद्यापीठाअंतर्गत आठशे महाविद्यालयांत नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
रत्नागिरी उपकेंद्राची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. उपकेंद्र सक्षम
नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर आणि वेंगुर्ले येथे
नवीन उपकेंद्रे सुरू केली जाणार असून तेथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
ते म्हणाले की, १६१ वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न, एक राष्ट्रपती आणि पंतप्रधान
दिले. अशा विद्यापीठाला झपाट्याने बदलणाऱ्या जगाचीही दखल घेणे आवश्यक आहे. चौथी
औद्योगिक क्रांती होत आहे. आणखी वीस वर्षांनंतर इंटरनेटवर आधारित ५० टक्के डिजिटल
जॉब असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातही डेटा,
थ्रीड डी प्रिंटिंग
रोबोटिक्स, एआय असे अभ्यासक्रम
सुरू झाले पाहिजेत. विद्यापीठात एआय मास्टर सायन्स सुरू केले आहे. मुंबईत
विद्यापीठाच्या कलिना कँपस येथे इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. जर्मनीत
कौशल्यावर आधारित पाच दशलक्ष, तर चीनमध्ये २० दशलक्ष नोकर्याम उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढेल.
त्यांच्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू होतीलच. पण आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख झाली
पाहिजे आणि समाज आणि देशासाठी शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणार्याओ जगात
नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन
द्यावे, असेही कुलगुरू
म्हणाले.
देशात असिष्णुता वाढली
म्हणून पुरस्कार परत केले जातात. दुसरीकडे लोक रस्त्याला विरोध करतात. गंभीर हल्ले
करायला तयार होतात. अंतर्गत आणि बाह्य मार्गाने ही संकटे देशावर आघात करत असतात.
देशाच्या प्रगतीच्या आड न येता विकासात्मक भूमिका लोकांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सरकारी
वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी परिषदेत केले.
जागतिक देवरुखे ब्राह्मण
परिषदेमध्ये श्री. निकम लेखक अच्युत गोडबोले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वकील
बाळकृष्ण जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी निकम यांनी आपली
सडेतोड मते मांडली. वकिलीचा प्रवास, विविध खटले व तपास यासंदर्भात त्यांनी दिलखुलास मुलाखत
दिली.
निकम म्हणाले की, हल्ल्यांसाठी काही वेळा काही
कारणांचे भांडवल केले जाते, त्यांना राजकीय हवापाणी मिळते. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये,
यासाठी नागरिकांनी लक्ष
ठेवले पाहिजे. ट्रंप यांनी अमेरिकेत व्हिसासंदर्भात निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंद वाटला.
कारण भारतीय हुशार विद्यार्थी तेथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरतात. त्यांनी
भारतातच राहून विकासासाठी आपली बुद्धी वापरावी. आपण नेहमी चांगले राहिले पाहिजे.
अच्युत गोडबोले म्हणाले,
३२ वर्षे आयटी क्षेत्रात
सीईओ, परदेशांत नोकरी
केली. कोट्यवधी रुपये मिळवले. पण फक्त पैसे मिळवून काही नाही. त्यामुळे मराठी
ज्ञानभाषा होण्यासाठी ३२ पुस्तके लिहिली. मला वाचकांचे भरपूर प्रेम मिळते, त्यामुळे समाधान वाटते. माझी
पुस्तके वाचून १४ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले, हे माझ्यासाठी खूप आहे.
बाळकृष्ण जोशी यांनी
सांगितले की मी १९८५ मध्ये मुलुंडमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो.
बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रभावित झालो होतो आणि शिवसैनिक बनलो. बाबरी मशीद पाडली
त्यावेळी बाळासाहेबांवरही खटला सुरू होता. खटला लढवायला लखनौला गेलो होतो. मी
तिकडून येईपर्यंत बाळासाहेब जेवलेसुद्धा नव्हते. मला मुंबईत परत पाहिल्यावर ते
जेवले. या प्रसंगामुळे मी भारावून गेलो.
दरम्यान, प्रकट मुलाखतीनंतर
पत्रकारांशी संवाद साधताना श्री. निकम यांनी नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील
संशयित आरोपींना जामीन मिळाल्याबद्दल तपास यंत्रणेला फटकारले. ते म्हणाले की,
तपास यंत्रणांनी याचा
गंभीरपणे विचार करावा. काल पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील अटक
करण्यात आलेल्या तीन संशयितांना जामीन दिला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात
सीबीआयने ९० दिवसांत आरोपत्र दाखल केले नसल्याने या तिघांना पुणे न्यायालयाने जामन
मंजूर केला. अशा प्रकराच्या हत्या कटातून निर्माण होत असतात. त्यासाठी तपास
यंत्रणेला वेळ लागतो. पण अशा घटनांमध्ये तपासयंत्रणांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल
करणे आवश्यक असते. तसे झाले नसल्याने आरोपींनी जामीन मिळाला, असे श्री. निकम यांनी स्पष्ट
केले.
गांधीवादामुळे ७० वर्षांत
देश अपयशी ठरला आहे. मात्र आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच
भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार
त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
परिषदेत बोलताना ते म्हणाले
की, स्वातंत्र्यवीर
सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले,
तेथे बोलताना मला नेहमीच
भरून येते. पतितपावन मंदिर असो वा कारागृहातील स्मारकात नतमस्तक कोणीही व्हावे.
खरा इतिहास नेहरूंपासून सार्यांबनी लपवून स्वा. सावरकरांना बदनाम केले. भारत १९४७
मध्ये स्वतंत्र झाला तरी सावरकरांना १९६३ पर्यंत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध
करण्यासाठी प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव. स्वा. सावरकरांना हिंदुत्ववादी सरकार अजूनही भारतरत्न देत नाही,
यापेक्षा दुर्दैव कोणते?
देशाने ७० वर्षे गांधीवाद
जोपासला. नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वा. सावरकरांनी काही सूचनांचे
पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलीस आणि शिक्षणकार्य
करणार्या शिक्षकांना समाधानी ठेवा. ही
सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. शिक्षक
मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे
आपल्या दलामध्ये सामील करा, या सूचनेचेही पालन केली नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या
माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्यायला हवी
होती. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने व रक्ताने देशाच्या सीमा
सुरक्षा करायल्या हव्या होत्या.
कस्तुरबा गांधी आणि स्वा.
सावरकर व त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी व
सावरकर यांची दीड तास चर्चा झाली पण दोघांची मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी
सौ. सावरकरांना वंदन केले आणि ते म्हणाले, मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो. तू यांच्याशी संसार
कसा करतेस, असा प्रसंग श्री.
पोंक्षे यांनी सांगितला.
दोन दिवसांची परिषद
संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद
साधला. ते म्हणाले, पर्यावरणस्नेही, प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद झाली. आर. सी.
काळेनगरी अर्थात प्रमोद महाजन क्रीडासंकुलची फारशी स्वच्छता करावी लागली नाही.
खऱ्या अर्थाने हे संमेलन आनंददायी आणि पर्यावरणस्नेही झाले. देश-विदेशातील
ज्ञातिबांधवांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन संवादातून संपन्नतेकडे नेणारे ठरेल.
प्लास्टिकमुक्त परिषदेचा संकल्प शंभर टक्के यशस्वी झाला. प्लास्टिक पिशव्या,
बाटल्यांचा वापर केला नाही.
परिषद संपल्यानंतर तासाभरातच आर. सी. काळे नगरीची साफसफाई करण्यात आली. पतितपावन
मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेच्या शेवटी स्वच्छता पथक कार्यरत होते. त्यामुळे
कोणत्याही कचऱ्याचा त्रास रत्नागिरीकरांना झाला नाही. फटाके टाळले आणि ध्वनी,
वायुप्रदूषण टाळण्यात यश
आले.
मी परिषदेच्या निमित्ताने ७५
गावे, शहरांना भेट दिली.
तेथील ज्ञातिबांधवांना परिषदेची माहिती दिली. संस्थेला अनेकांनी केलेल्या दानाचा
विनियोग अधिक चांगल्या प्रकारे केला जाणार आहे. परिषदेच्यानिमित्त शंभर दिवस
पत्राच्या माध्यमातून लिहीत होतो. कित्येक जणांनी या पत्रांचे पुस्तक प्रकाशित
करण्याची सूचना केली आहे. परिषदेकरिता भेटलेले ज्ञातिबांधव, कामाचा आढावा, आलेल्या अडचणी सोडवल्या. जागतिक परिषदेच्या
निमित्ताने समोर ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे.
पुढच्या वर्षी जे काम करायचे आहे, त्याची ही सुरवात आहे. आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत. त्यासाठी
यापुढेही ज्ञातीबांधवांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. देवरुखे ज्ञातिबांधवांची जनगणना
गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. अजून काही दिवस ती सुरू राहणार आहे. आपण एकत्र
राहणे महत्त्वाचे आहे. काम करताना मतभेद असले त्या त्या वेळी चर्चा करून प्रश्नस
सोडवले पाहिजेत. यामुळेच आपला अधिक विकास होईल, असेही डॉ. निमकर म्हणाले. सामाजिक बांधिलकीच्या
नात्याने परिषदेत शंभर जणांनी रक्तदान केले.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण
विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेतच. पण कला,
क्रीडा, इतर छंद याप्रमाणे करावेसे
वाटेल त्यात विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला असेल. परिषद यशस्वी
करण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद
जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर परिषदेच्या
बातम्यांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.
...................................
https://youtu.be/IkvDKT3o09c