Saturday, 27 February 2016

सौ. लक्ष्मी पटवर्धन यांचे निधन



रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील सौ. लक्ष्मी नरहरी पटवर्धन (वय ६५) यांचे २५ फेब्रुवारी रोजी पहाटे निधन झाले. दुपारी अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पावस दशक्रोशीतील अनेक लोक उपस्थित होते. आप्त, स्नेहीजनांनी पटवर्धन कुटुंबीयांचे सांत्वन केले. लक्ष्मी पटवर्धन यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, जावई, नातवंडे, दीर, जाऊ, पुतण्या, पुतणी असा मोठा परिवार आहे.

Friday, 26 February 2016

शालेय शिक्षण जीवनाला दिशा देणारे - प्रशांत दामले



देवरूख - आई वडील आपल्यावर संस्कार करतातच मात्र शाळा आणि गुरुजन जे काही शिकवतात, ते शिक्षण जीवनाला दिशा देणारे ठरते. शाळेत मिळालेली शिक्षा म्हणजे पट्टी बोलते, अंगठे धरलेले लक्षात राहते, अशा चुकांमधून काय चांगले करावे ते समजते, म्हणून चुका करा, नवनवीन चुका करा म्हणजे चांगले काय ते तुम्हाला समजेल आणि तुम्ही चांगले नागरिक बनाल, असे मत सुप्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले.
ताम्हाने माध्यमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रसिद्ध
अभिनेते प्रशांत दामले, शेजारी समीर सप्रे, अशोक सप्रे, बाळासाहेब पाटील आदी.

देवरूखजवळच्या ताम्हाने पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यामंदिरातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दामले उपस्थित होते. त्यांच्यासोबत पनवेलचे उद्योजक आणि दुनियादारी समहाचे प्रमुख समीर सप्रे, कोल्हापूरचे राजन गुणे, ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संचालक प्रमोद कोनकर, कोकण रेल्वेचे अधिकारी महेश पेंडसे, कौस्तुभ कागलकर, प्रसिद्ध ऑर्गन वादक बाळासाहेब दाते, संस्थाध्यक्ष शशिकांत सप्रे, सचिव अशोक सप्रे, मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, अप्पा पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दामले प्रत्यक्ष जीवनातील अनुभव कथन करीत आपल्या शालेय जीवनाला उजाळा दिला. प्रत्येक नागरिक हा जन्मजात कलाकार असतो. शाळा ही संस्कार देणारी आहे, आपण काय आहोत हे शाळेतच आपल्याला समजते, आपल्या शाळेचा निकाल १०० टक्के लागणारच आहे तरीही खरे जीवन काय हे इथून बाहेर पडल्यावरच समजणार आहे, इथे मिळालेले शिक्षण हे बाहेरचे जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपले म्हणणे ठामपणे मांडणे हे आपल्याला शाळेतच शिकवले जाते, मी शालेय जीवनात अभ्यासात फार काही करू शकलो नाही पण शाळेच्या संस्कारामुळे मी चांगला कलाकार होऊ शकलो असे त्यांनी आवर्जून नमुद केले. आज मी शाळेचा अभ्यास शिकवू शकत नाही मात्र ४०० मुलांना मी आत्मविश्वासपूर्वक वागणे, जगात कसे वागावे, जगावे, हे शिकवू शकतो. ते कार्य मी करीतच आहे, शाळेतून बाहेर पडलात तरी शिकत राहा, वाचत राहा विशेषतः वर्तमानपत्र आणि त्यातील संपादकीय जरूर वाचा. यातून तुमच्या वागण्या बोलण्यात खूपच रक पडेल आणि जीवनात प्रगती होईल, असा सल्ला त्यांनी दिला. स्वागतगत सादर करणाऱ्या सानिका नावाच्या विद्यार्थिनीला तू चांगली नृत्यकलाकार होशील असा आशीर्वाद त्यांनी दिला. त्यांचे भाषण सुरू असताना विद्यार्थ्यांनी त्यांना मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं हे लोकप्रिय गाणे सादर करण्याची विनंती केली मात्र दामले यांनी विद्यार्थ्यांना संदेश देण्यासाठी कविवर्य मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता आपल्या मधुर आवाजात सादर करीत विद्यार्थ्यांची मने qजकली.

यावेळी दहावीच्या मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित राहिलेल्या प्रशांत दामले यांचे शाळेच्या वतीने ढोल, ताशे आणि झांज पथकातून स्वागत करण्यात आले. संस्थेच्या वतीने शाल, श्री, सन्मानचिन्ह देऊन प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला. तर दहावीच्या विद्यार्थ्यांकडूनही दामले यांना भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सप्रे यांनी तर सूत्रसंचालन सनगरे सर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 21 February 2016

संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा



रत्नागिरी : शहरातील गोविंवद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतकमहोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०१६ आहे.
गेल्या शंभर वर्षांपासून रत्नागिरीत ही पाठशाळा संस्कृतची ज्ञानगंगा अखंड प्रवाहित राहावी या हेतूने अध्यापन करत आहे. यंदा शतकमहोत्सवी वर्षात नानाविध उपक्रमांचे आयोजन पाठशाळा करत आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ,  वरिष्ठ महाविद्यालयीन व मुक्त गटासाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी दिली.
स्पर्धा तीन गटांत होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी संस्कृतिः संस्कृताश्रिता (संस्कृतभाषा आणि संस्कृती) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ५०० आहे. यातील विजेत्यांना ५००,  ४०० व ३०० रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. वरिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी आधुनिकयुगे संस्कृतम् (आधुनिक काळात संस्कृत) हे विषय आहेत. शब्दमर्यादा ७५० आहे. यातील विजेत्यांना ७००,  ६०० व ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. मुक्त गटासाठी संस्कृतस्य महत्त्वम् (संस्कृतचे महत्त्व) हे विषय आहेत. शब्दमर्यादा १००० असून विजेत्यांना ७००,  ६०० व ५०० रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धकांनी ३१ मार्च २०१६ पर्यंत निबंध पाठवावेत. निबंध पाठविण्याच पत्ता असा - श्रीकृष्ण पाध्ये,  द्वारा रानडे संस्कृत पाठशाळा,  वेदाचार्य फाटक गुरुजी चौक, सावरकर मार्ग,  रत्नागिरी.
निबंधाच्या पहिल्या पानावर निबंधाचे नाव, लेखकाचे नाव, पूर्ण पत्ता, संपर्कक्रमांक लिहावा. निबंध मराठी किंकवा संस्कृत भाषेतून लिहिता येईल. निबंध सुवाच्च अक्षरात लिहावा किंवा टंकलिखित करावा. संस्कृत निबंधांचा विशेष विचार केला जाईल. १७ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारितोषिक वितरण कार्यक्रमात निकाल जाहीर केला जाईल. अधिक माहितीसाठी संस्कृत पाठशाळा ०२३५२-२२४१७० किंवा ९४४२२६३०४०३, ९४०३०५६५६३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.