Sunday 16 June 2019

नियोजन, आत्मविश्वासाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश शक्य : मधुलिका देवगोजी

रत्नागिरी : नियोजन, आत्मविश्वास आणि भक्कम कौटुंबिक पाठिंब्याच्या जोरावर इच्छुक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश मिळू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत १९० वे स्थान मिळविलेल्या मधुलिका देवगोजी ऊर्फ सौ. मधुलिका अक्षय कदम हिने केले.
रत्नागिरी : कबीर ॲकॅडमीतर्फे मधुलिका देवगोजी हिचा सत्कार करताना
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे. शेजारी मधुलिकाच्या मातोश्री 
सौ. विजयालक्ष्मी देवगोजी, वडील विजय देवगोजी, कबीर ॲकॅडमीचे संचालक मोहन कबीर
येथील कबीर ॲकॅडमीतर्फे यूपीएससीमध्ये मधुलिकाचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते रविवारी (ता. १६ जून) करण्यात आला, त्यावेळी ती बोलत होती. तिने कबीर ॲकॅडमी आणि मार्गदर्शक संजीव कबीर यांचे प्रथम आभार मानले. हा माझा सन्मान नसून त्या परीक्षेचा आणि त्या पदाचा सन्मान आहे. स्पर्धापरीक्षेबाबत आपण मराठी माध्यमातून आल्याचा, तसेच ग्रामीण भागातून आल्याचा न्यूनगंड कोकणातील मुलांनी मनात अजिबात धरू नये, असे आवाहन तिने केले. मीही लांजा येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकले आहे, असे तिने आवर्जून सांगितले. त्यानंतर सहावीपासून दहावीपर्यंत तिने राजापूर येथे जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. याच काळात साखरपा येथे कबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून स्पर्धा परीक्षा म्हणजे काय,याची ओळख झाली. त्याचा तिला पुढे उपयोग झाला. अकरावी-बारावीसाठी ती पुण्यात गेली. त्यानंतर तिने टेलिकॉम इंजिनीअरिंग पूर्ण केले. दोन वर्षांच्या नोकरीनंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला मुलाखतीपर्यंतचे यश मिळाले. अंतिम परीक्षेत १९० गुण मिळाले. त्यामुळे तिला आयएएस होण्याची संधी मिळाली नाही. आयपीएससाठी तिची निवड झाली. मात्र त्याऐवजी तिने आयआरएस (इंडियन रेव्हिन्यू सर्व्हिस) स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा सारा प्रवास तिने उलगडला. ती म्हणाली, रत्नागिरी किनाऱ्यावर दहा वर्षांपूर्वी जहाज अडकले होते आणि त्यातून वायुगळती होत होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी यांनी ही परिस्थिती प्रशासकीय पातळीवर कशी हाताळली, हे पाहता आले. आपत्कालीन व्यवस्थापनविषयक प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांच्याशी थेट संवाद साधता आला. त्यांचे काम पाहिल्यानंतर मनात पक्के केले की आपणही स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय पातळीवर काम करायचे. यूपीएससी परीक्षा म्हणजे सायकॉलॉजीकल गेम आहे. यासाठी नियोजन, प्लॅन बी तयार असणे, आत्मविश्वास आणि कौटुंबिक आधार या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. मुलींसाठी लग्न ही गोष्ट अडसर नव्हे तर योग्य वर मिळाल्यास सपोर्ट सिस्टीमही ठरू शकते. त्यामुळे कोकणातील अधिकाधिक मुलांनी या परीक्षा द्याव्यात, मुंबई, पुणे, दिल्लीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे अनेक वर्ग असतात. पण रत्नागिरीमध्ये कबीर अॅकॅडमीने तीच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तेथे योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन मधुलिका देवगोजी हिने यावेळी केले.
दहावी-बारावीच्या परीक्षेत सतत आठ वर्षे राज्यात अव्वल असणाऱ्या कोकणातून स्पर्धा परीक्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, याकडे लक्ष वेधून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मुंढ म्हणाले, कोकणात बुद्धिमत्तेचा अभाव नाही. इच्छाशक्ती आणि मार्गदर्शनाचा अभाव आहे. मुंबईत छोटा जॉब बघण्याचा आदर्श येथील मुलांसमोर आतापर्यंत राहिला आहे. आपल्या आसपास, परिसरात जे काही घडत असेल, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. मीसुद्धा एमबीबीएसचा अभ्यास सुरू असताना माझ्या मामेभावाची यूपीएससी परीक्षेसाठी चाललेली धडपड पाहत होतो. तिच्यापासून प्रेरणा घेऊन मी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात मला यश मिळाले. स्पर्धा परीक्षेत आपणही उत्तीर्ण होऊ शकतो, असा विश्वास देणारे मधुलिका देवगोजीसारखे अनेक आदर्श कोकणात वाढले, तर भविष्यात कोकणातूनही अनेक प्रशासकीय अधिकारी मिळतील. कबीर ॲकॅडमी स्पर्धापरीक्षांसाठी उत्तम मार्गदर्शन रत्नागिरीमध्ये उपलब्ध करून देत आहे, हे चित्र आशादायी आहे.
मधुलिकाला महत्त्वपूर्ण प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आईवडिलांचाही यावेळी कबीर ॲकॅडमीतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी वडील विजय देवगोजी यांनी सांगितले की, मधुलिकाने स्वतःला त्या कोषात गुरफटून घेतले. त्याच विषयातील मित्रमैत्रिणी जमवल्या. स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे. मीही स्पर्धापरीक्षा दिली होती पण योग्य मार्गदर्शन आम्हाला नव्हते. पण माझी इच्छा माझ्या मुलीने पूर्ण केली, असे भावनिक उद्गार मधुलिकाच्या आई सौ. विजयालक्ष्मी देवगोजी यांनी काढले.
राजेंद्र देवरूखकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दीप्ती कानविंदे यांनी केले.
...........
मधुलिका देवगोजी हिने सांगितलेला अनुभव पाहण्यासाठी कोकण मीडियाच्या सोबतच्या लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/SjNukLnGlq8


Friday 7 June 2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कलाकारांची सूची


कुडाळ : स्वरसिंधुरत्नर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत क्षेत्रातील कलाकारांची सूची तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता गायन आणि वादन क्षेत्रातील सर्व कलाकारांनी आपली माहिती येत्या ३० जूनपर्यंत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
      माहिती देताना कलाकाराचे संपूर्ण नाव, कलाप्रकार, तालुका, न्मतारीख, पूर्ण पत्ता, तालुक्यापासूनचे गावाचे अंतर, फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप मोबाइल नंबर, घरचा फोन नंबर, ई-मेल आयडी, सध्या राहत असलेले ठिकाण, गुरूचे नाव, संगीत क्षेत्रातील घराणे, संगीत शिक्षण किती वर्षे घेतले, वादक कलाकारांनी आतापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध गायकांना साथ केली, मिळालेल्या पुरस्कारांची सविस्तर माहिती आणि छायाचित्रे, विशेष कार्यक्रमाचे स्थळ, कोणत्या संस्थेतर्फे विशेष कार्यक्र केले इत्यादी तपशील पाठवावा. मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतरत्र राहणाऱ्या कलाकारांनीही ही माहिती पाठवावी.
      याबाबतचा विहित नमुन्यातील अर्ज सोबत दिला आहे. त्याची प्रिंट काढून घेऊन संपूर्णपणे भरलेला अर्ज खालील ठिकाणी पाठवावा –
श्री. प्रशांत प्रभाकर धोंड,
२२७५, प्रभाकर, मु. पो. शंकरवाडी (नवीवाडी),
पिंगुळी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग – ४१६५२८
ईमेल - dhondprashantp11@gmail.com
श्री. धोंड यांच्याशी (०२३६२) २२२१६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९४२३३०९४३२ या मोबाइलवर संपर्क साधावा.
...............

Monday 3 June 2019

पवन प्रभू, सुधांशु सोमण, अक्षय जांभळे यांना स्वरसिंधुरत्न पुरस्कार

कुडाळ : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या
स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पवन उमेश प्रभू, सुधांशु समीर
सोमण आणि अक्षय मंगेश जांभळे स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले.
पवन उमेश प्रभू (कुडाळ)
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. त्यामधून प्रत्येक गटातून प्रत्येकी तीन अशा एकूण २७ स्पर्धकांची निवड अंतिम स्पर्धेसाठी करण्यात आली. स्पर्धेची दुसरी आणि अंतिम फेरी कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ जून रोजी झाली. या स्पर्धेत शालेय गटातून पवन उमेश प्रभू (कुडाळ), महाविद्यालयीन गटातून सुधांशु समीर सोमण आणि खुल्या गटातून अक्षय मंगेश जांभळे (दोघेही देवगड) स्वरसिंधुरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पार्श्वसंगीत पुरस्कार मिळविणारे विजय गवंडे, ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
सुधांशु समीर सोमण (देवगड)
स्वरसिंधुरत्न पुरस्कार हा स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता ही जिल्ह्यातील संगीत क्षेत्रासाठी एक चळवळ निर्माण करण्याचा मानस आहे, असे स्पर्धेचे संयोजक प्रशांत धोंड यांनी आपल्या ऋणनिर्देशपर भाषणात सांगितले.
दरम्यान, तिन्ही पुरस्कारविजेत्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि स्वरसिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच त्या तिघांच्याही गायनाचा कार्यक्रम १२ जुलै २०१९ रोजी वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिरात आषाढी एकादशीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळीच त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. याशिवाय १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर येथील शिवाजी मंदिरमध्येही पुरस्कारविजेत्या तिघांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाजी मंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
.........


अक्षय मंगेश जांभळे (देवगड)



स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तेजल गावडे, समृद्धी सावंत, धामापूरकर प्रथम

       
सावंतवाडी : स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेतील
सावंतवाडी केंद्रातील विजेत्यांसह परीक्षक
प्रदीप धोंड, बाळ आंबर्डेकर, प्रशांत धोंड, सतीश पाटणकर, अशोक प्रभू
सावंतवाडी : श्री शंकरा दादर (मुंबई) आणि वालावलच्या श्री लक्ष्मीनारायण भक्तांनी आयोजित केलेल्या स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धेत तीन वेगवेगळ्या गटांमध्ये तेजल गावडे, समृद्धी सावंत आणि नीतिन धामापूरकर यांनी सावंतवाडी केंद्रात पहिल्या फेरीत प्रथम क्रमांक पटकावला.
वालावल (ता. कुडाळ) येथील श्री लक्ष्मीनारायणाच्या आषाढी एकादशी उत्सवाच्या निमित्ताने दादर (मुंबई) येथील श्री शंकरा संस्था आणि श्री लक्ष्मीनारायणाच्या भक्तांनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्वरसिंधुरत्न अभंग, भक्तिगीत स्पर्धा आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत कला जोपासली गेली पाहिजे आणि त्याद्वारे गायकांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटात झाली. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीत पहिल्या फेरीची स्पर्धा पार पडली. सावंतवाडीच्या केंद्राची सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग तालुक्यांसाठीची स्पर्धा सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात झाली. स्पर्धेत एकूण ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेते असे – गट पहिला (१२ वर्षांपर्यंत) - तेजल गावडे, गीता गवंडे, श्रेया केसरकर. गट दुसरा (१८ वर्षांपर्यंत) - समृद्धी सावंत, देवयानी केसरकर, विधिता केंकरे. गट तिसरा (खुला गट) - नीतिन धामापुरकर, सौ. सिद्धी परब, गीतेश कांबळे. पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे एक हजार, ७५० आणि ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ शास्त्रीय गायक बाळ आंबर्डेकर आणि प्रदीप धोंड यांनी काम पाहिले.
...................

स्पर्धेतल्या एका स्पर्धकाचा व्हिडीओ पाहण्यासाठी सोबतची लिंक क्लिक करा -
https://youtu.be/98e6NDVisu0


Sunday 5 May 2019

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे

रत्नागिरी : अवयवदानाचे महत्त्व अनन्यसाधारण – डॉ. बोल्टे
रत्नागिरी : पूर्वी रक्तदान श्रेष्ठ दान म्हटले जात होते. आता मात्र अवयवदानाला महत्त्व आले आहे. एका देहापासून आठ ते दहा जिवांना जीवनदान मिळू शकते. अशा या अवयवदानाच्या प्रसारासाठी आयुष्यव वाहिलेल्या आपटे दांपत्याने चालविलेली चळवळ अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्टे यांनी केले.
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, अवयवदान महासंघ, जटायू आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे अवयवदानाबद्दल बोलू काही, या विषयावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्र विभागाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिल्पा रेडीज आणि रोहन सावंत या मरणोत्तर देहदान करणाऱ्या दोघांना अभिवादन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांनी प्रास्ताविकात अवयवदानाविषय़ी माहिती दिली. ते म्हणाले की, १९५० पासून अवयवदान सुरू असले, तरी त्याबाबतची जनजागृती झालेली नसल्याने लोक पुढे येत नाहीत. आता त्याची गरज आहे. प्रसिद्ध नेत्रशल्यविशारद डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांच्या आईने आपले मूत्रपिंड दिले होते. त्यामुळे पुढच्या आयुष्यात डॉ. लहाने फार मोठे कार्य करू शकले. हे महत्त्व लक्षात घेऊन लोकांनी स्वयंस्फूर्तीने देहदान आणि अवयवदानासाठी पुढे यावे.
श्रीकांत आपटे आणि त्यांच्या पत्नी सौ. नीला आपटे यांनी देहदान आणि अवयवदानाच्या उपयुक्ततेविषयी स्लाइड शो आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून माहिती दिली. बँक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाल्यानंतर गेल्या २०१६ पासून आपण या चळवळीला वाहून घेतले आहे, असे सांगून ते म्हणाले की, अवयव प्रत्यारोपणाची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात नेत्रदान, अवयवदान, देहदान करता येते. रत्नागिरीत नेत्रदान करता येते, तर डेरवणच्या वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान, देहदानाची व्यवस्था होऊ शकते. जिवंत असताना मूत्रपिंड, यकृत आणि आतड्याच्या काही भागाचे दान, तर मृत व्यक्ती, मेंदुमृत व्यक्तींचे अवयवदान करता येऊ शकते. दररोज सुमारे दोन लाख ७० हजार लोकांना जगण्यासाठी विविध अवयवांची गरज असते. जिवंत किंवा मृतांच्या अवयवदानातून अशांना मरणासन्न रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. मृतदेहाचे दहन करण्यापूर्वी शरीरावरचे दागिने काढून घेतले जातात. त्याच पद्धतीने मृताच्या अवयवरूपी दागिन्यांचेही दान करण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. नेत्र, त्वचा आणि अस्थींचे दान करता येते. मरणोत्तर देहदान केल्यास त्यावर दहा वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण होऊ शकते. नवजात बालकापासून कोणीही अवयवदान करू शकतो.
अवघ्या शंभर तासांनी मरण पावलेल्या बालकाच्या मूत्रपिंडाचे केलेले रोपण, प्रौढाच्या हातांचे एका सैनिकाला केलेले रोपण अशा काही चित्रफितीही श्री. आपटे यांनी यावेळी दाखविल्या.
.......
श्रीकृष्ण आपटे यांचे विचार आणि त्यांची अवयवदानाविषयीची कविता ऐकण्यासाठी सोबतच्या यूट्यूब लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/yJj-sz2aI1g


Wednesday 19 December 2018

रत्नागिरीतील पाचवी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी



      रत्नागिरी : पूर्वसंध्येला निघालेल्या भव्य शोभायात्रेसह रत्नागिरीत १४ ते १६ डिसेंबर या काळात झालेली तीन दिवसांची जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद यशस्वी झाली. शिस्तबद्धता आणि पर्यावरणस्नेह हे या परिषदेचे वैशिष्ट्य होते. प्रदूषणमुक्तीसाठी प्लास्टिकमुक्तीचा संदेश परिषदेतून दिला जात असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी उद्घाटन समारंभात सांगितले. तसेच तो उद्देश साध्य झाल्याचे त्यांनी समारंभ संपल्यानंतरही आवर्जून नमूद केले.
                रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात उभारलेल्या आर. सी. काळे नगरीमध्ये ही परिषद झाली. जगभरातून सुमारे तीन हजार प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते. अमेरिकेतील सीटी ग्रुपचे डायरेक्टर प्रशांत जुवेकर उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एआय, डेटा ॲनलिसिस, बिग डेटा, अशा स्वरूपाचे नवे अभ्यासक्रम येत आहेत. त्याचा उपयोग बँकिंग, विमा व वैद्यकीय क्षेत्रात केला जात आहे. त्यामुळे करिअरसाठी नव्या संधी आहेत. युरोप, अमेरिकेतील अनेक कंपन्या चीनमध्ये गेल्या आणि आयटी कंपन्या येथे येत आहेत. विद्यार्थ्यांनी विचार करून याचा फायदा उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, मी रसायन अभियांत्रिकी शिकलो. सिटी ग्रुपच्या ग्लोबल केमिकलचा मॅनेजिंग हेड आहे. माझी टीम लंडन, हाँगकाँगमध्ये काम करते. जगभरातील पेट्रोकेमिकल उद्योगांचा आम्ही सर्वांगीण अभ्यास करतो. ब्राझीलमध्ये मक्यापासून इथेनॉल निर्माण करतात आणि ते लिटरमागे दहा टक्के या प्रमाणात वापरतात. मात्र पेट्रोलमुळे मोठे प्रदूषण होत आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक कार्स वापरणार्यांरची संख्या वाढणार आहे. येत्या २०२५ पर्यंत ही संख्या दहा टक्क्यांवर पोहोचेल.
                यावेळी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी शहर दर्जेदार बनवण्यासाठी सर्व सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष राहुल पंडित यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, विद्यार्थी साहाय्याक संस्था व परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी, सतीश शेवडे, नगरसेवक उमेश कुलकर्णी, राजू भाटलेकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी दिवाकर निमकर, श्रीनिवास कानडे, इंद्रनील भोळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. आनंद जोशी, श्रीकांत मुकदम, वीणा ढापरे, प्रशांत जोशी, सुरेश शितूत, दीपक निमकर, उल्हास मुळे, सुरेंद्र कुलकर्णी, अनिल पिंपुटकर, ॲड. श्रीनिवास भोळे, जयंत चापेकर, वृंदा निमकर, अरुण जोशी, समीर निमकर, पत्रकार अरविंद कोकजे, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
                कुलगुरू डॉ. पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाअंतर्गत आठशे महाविद्यालयांत नऊ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रत्नागिरी उपकेंद्राची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. उपकेंद्र सक्षम नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर आणि वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्रे सुरू केली जाणार असून तेथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. ते म्हणाले की, १६१ वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न, एक राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिले. अशा विद्यापीठाला झपाट्याने बदलणाऱ्या जगाचीही दखल घेणे आवश्यक आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. आणखी वीस वर्षांनंतर इंटरनेटवर आधारित ५० टक्के डिजिटल जॉब असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातही डेटा, थ्रीड डी प्रिंटिंग रोबोटिक्स, एआय असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजेत. विद्यापीठात एआय मास्टर सायन्स सुरू केले आहे. मुंबईत विद्यापीठाच्या कलिना कँपस येथे इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. जर्मनीत कौशल्यावर आधारित पाच दशलक्ष, तर चीनमध्ये २० दशलक्ष नोकर्याम उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढेल. त्यांच्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू होतीलच. पण आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख झाली पाहिजे आणि समाज आणि देशासाठी शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणार्याओ जगात नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही कुलगुरू म्हणाले.
                देशात असिष्णुता वाढली म्हणून पुरस्कार परत केले जातात. दुसरीकडे लोक रस्त्याला विरोध करतात. गंभीर हल्ले करायला तयार होतात. अंतर्गत आणि बाह्य मार्गाने ही संकटे देशावर आघात करत असतात. देशाच्या प्रगतीच्या आड न येता विकासात्मक भूमिका लोकांनी घ्यावी, असे आवाहन ज्येष्ठ सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी परिषदेत केले.
                जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेमध्ये श्री. निकम लेखक अच्युत गोडबोले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वकील बाळकृष्ण जोशी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी निकम यांनी आपली सडेतोड मते मांडली. वकिलीचा प्रवास, विविध खटले व तपास यासंदर्भात त्यांनी दिलखुलास मुलाखत दिली.
                निकम म्हणाले की, हल्ल्यांसाठी काही वेळा काही कारणांचे भांडवल केले जाते, त्यांना राजकीय हवापाणी मिळते. देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये, यासाठी नागरिकांनी लक्ष ठेवले पाहिजे. ट्रंप यांनी अमेरिकेत व्हिसासंदर्भात निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंद वाटला. कारण भारतीय हुशार विद्यार्थी तेथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरतात. त्यांनी भारतातच राहून विकासासाठी आपली बुद्धी वापरावी. आपण नेहमी चांगले राहिले पाहिजे.
                अच्युत गोडबोले म्हणाले, ३२ वर्षे आयटी क्षेत्रात सीईओ, परदेशांत नोकरी केली. कोट्यवधी रुपये मिळवले. पण फक्त पैसे मिळवून काही नाही. त्यामुळे मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी ३२ पुस्तके लिहिली. मला वाचकांचे भरपूर प्रेम मिळते, त्यामुळे समाधान वाटते. माझी पुस्तके वाचून १४ जण आत्महत्येपासून परावृत्त झाले, हे माझ्यासाठी खूप आहे.
                बाळकृष्ण जोशी यांनी सांगितले की मी १९८५ मध्ये मुलुंडमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक झालो. बाळासाहेबांच्या भाषणांनी प्रभावित झालो होतो आणि शिवसैनिक बनलो. बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळासाहेबांवरही खटला सुरू होता. खटला लढवायला लखनौला गेलो होतो. मी तिकडून येईपर्यंत बाळासाहेब जेवलेसुद्धा नव्हते. मला मुंबईत परत पाहिल्यावर ते जेवले. या प्रसंगामुळे मी भारावून गेलो.
                दरम्यान, प्रकट मुलाखतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना श्री. निकम यांनी नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना जामीन मिळाल्याबद्दल तपास यंत्रणेला फटकारले. ते म्हणाले की, तपास यंत्रणांनी याचा गंभीरपणे विचार करावा. काल पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना जामीन दिला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसांत आरोपत्र दाखल केले नसल्याने या तिघांना पुणे न्यायालयाने जामन मंजूर केला. अशा प्रकराच्या हत्या कटातून निर्माण होत असतात. त्यासाठी तपास यंत्रणेला वेळ लागतो. पण अशा घटनांमध्ये तपासयंत्रणांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असते. तसे झाले नसल्याने आरोपींनी जामीन मिळाला, असे श्री. निकम यांनी स्पष्ट केले.
                गांधीवादामुळे ७० वर्षांत देश अपयशी ठरला आहे. मात्र आज सावरकरवाद स्वीकारण्याची गरज असून तो स्वीकारला तरच भारत हिंदू राष्ट्र म्हणून यशस्वी ठरेल. विज्ञानाची कास, भाषाशुद्धी, संरक्षण सज्जता आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार त्यांनी मांडला होता, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले.
                परिषदेत बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या भूमीत स्थानबद्ध होते आणि त्यांनी राष्ट्राला वंदनीय कार्य केले, तेथे बोलताना मला नेहमीच भरून येते. पतितपावन मंदिर असो वा कारागृहातील स्मारकात नतमस्तक कोणीही व्हावे. खरा इतिहास नेहरूंपासून सार्यांबनी लपवून स्वा. सावरकरांना बदनाम केले. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला तरी सावरकरांना १९६३ पर्यंत स्वातंत्र्यसैनिक म्हणून सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागले, हे दुर्दैव. स्वा. सावरकरांना हिंदुत्ववादी सरकार अजूनही भारतरत्न देत नाही, यापेक्षा दुर्दैव कोणते?
                देशाने ७० वर्षे गांधीवाद जोपासला. नेहरूंनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर स्वा. सावरकरांनी काही सूचनांचे पत्र पाठवले होते. विज्ञानवादी राहा आणि सुरक्षा व्यवस्थेतील सैनिक, पोलीस आणि शिक्षणकार्य करणार्या  शिक्षकांना समाधानी ठेवा. ही सूचना न ऐकल्यामुळेच आज सैनिक किंवा पोलिसांबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. शिक्षक मनापासून शिकवत नाहीत. गुरुकुल शिक्षण पद्धत अमलात आणा. सर्वाधिक संहारक शस्त्रे आपल्या दलामध्ये सामील करा, या सूचनेचेही पालन केली नाही. त्यामुळे चीनविरुद्ध आपण हरलो. दुबळ्या माणसाच्या तोंडी अहिंसा शोभून दिसत नाही. त्यामुळे सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. चरख्यावरच्या सुताने नव्हे तलवारीच्या पात्याने व रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षा करायल्या हव्या होत्या.
                कस्तुरबा गांधी आणि स्वा. सावरकर व त्यांच्या पत्नीची भेट रत्नागिरीतील वास्तव्यात झाली होती. गांधी व सावरकर यांची दीड तास चर्चा झाली पण दोघांची मते भिन्न होती. त्यानंतर गांधीजींनी सौ. सावरकरांना वंदन केले आणि ते म्हणाले, मी आज यांच्या मतांमध्ये पोळून निघालो. तू यांच्याशी संसार कसा करतेस, असा प्रसंग श्री. पोंक्षे यांनी सांगितला.
               
                दोन दिवसांची परिषद संपल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पर्यावरणस्नेही, प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद झाली. आर. सी. काळेनगरी अर्थात प्रमोद महाजन क्रीडासंकुलची फारशी स्वच्छता करावी लागली नाही. खऱ्या अर्थाने हे संमेलन आनंददायी आणि पर्यावरणस्नेही झाले. देश-विदेशातील ज्ञातिबांधवांच्या उपस्थितीमुळे हे संमेलन संवादातून संपन्नतेकडे नेणारे ठरेल. प्लास्टिकमुक्त परिषदेचा संकल्प शंभर टक्के यशस्वी झाला. प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा वापर केला नाही. परिषद संपल्यानंतर तासाभरातच आर. सी. काळे नगरीची साफसफाई करण्यात आली. पतितपावन मंदिरापासून निघालेल्या शोभायात्रेच्या शेवटी स्वच्छता पथक कार्यरत होते. त्यामुळे कोणत्याही कचऱ्याचा त्रास रत्नागिरीकरांना झाला नाही. फटाके टाळले आणि ध्वनी, वायुप्रदूषण टाळण्यात यश आले.
                मी परिषदेच्या निमित्ताने ७५ गावे, शहरांना भेट दिली. तेथील ज्ञातिबांधवांना परिषदेची माहिती दिली. संस्थेला अनेकांनी केलेल्या दानाचा विनियोग अधिक चांगल्या प्रकारे केला जाणार आहे. परिषदेच्यानिमित्त शंभर दिवस पत्राच्या माध्यमातून लिहीत होतो. कित्येक जणांनी या पत्रांचे पुस्तक प्रकाशित करण्याची सूचना केली आहे. परिषदेकरिता भेटलेले ज्ञातिबांधव, कामाचा आढावा, आलेल्या अडचणी सोडवल्या. जागतिक परिषदेच्या निमित्ताने समोर ठेवलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आजपासून सुरवात झाली आहे. पुढच्या वर्षी जे काम करायचे आहे, त्याची ही सुरवात आहे. आजपासून खऱ्या अर्थाने कामाला लागणार आहोत. त्यासाठी यापुढेही ज्ञातीबांधवांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. देवरुखे ज्ञातिबांधवांची जनगणना गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे. अजून काही दिवस ती सुरू राहणार आहे. आपण एकत्र राहणे महत्त्वाचे आहे. काम करताना मतभेद असले त्या त्या वेळी चर्चा करून प्रश्नस सोडवले पाहिजेत. यामुळेच आपला अधिक विकास होईल, असेही डॉ. निमकर म्हणाले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परिषदेत शंभर जणांनी रक्तदान केले.
                विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेतच. पण कला, क्रीडा, इतर छंद याप्रमाणे करावेसे वाटेल त्यात विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स नक्कीच चांगला असेल. परिषद यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी साहाय्यक संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह संस्थेचे अध्यक्ष विनोद जोशी व कार्यकारिणीचे मोलाचे योगदान लाभले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर परिषदेच्या बातम्यांना चांगली प्रसिद्धी मिळाल्याबद्दल डॉ. निमकर यांनी विशेष आभार मानले.
...................................

पाचव्या जागतिक देवरुखे परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे मनोगत पाहण्यासाठी कोकण मीडिया यूट्यूब चॅनेलच्या खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/IkvDKT3o09c

Friday 30 November 2018

वेदमूर्ती जनूकाका फडके यांची जन्मशताब्दी कुर्धे-मेर्वी येथे सुरू


     
 रत्नागिरी : कुर्धे-मेर्वी गावचे माजी सरपंच वेदमूर्ती जनार्दन नारायण ऊर्फ जनूकाका फडके 
यांच्या जन्मशताब्दीच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाला आज (ता. ३० नोव्हेंबर) प्रारंभ झाला. त्यांच्या शिष्यांनी विविध धार्मिक विधींनी शताब्दी साजरी करायचे ठरविले आहे.
     
पवमान पंचसूक्त
कै. वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके गुरुजी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. काही काळ मेर्वी-कुर्धे ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच म्हणून त्यांनी काम केले. या काळात गावातील सार्वजनिक विहिरीसह विविध सामाजिक कामे त्यांनी केली. गावातील पहिले गोबर गॅस संयंत्र स्वतःच्या घरी सुरू करून त्यांनी गावाला ऊर्जेच्या नव्या स्रोताची दिशा दिली. कुर्धे गावातील शतकोत्सवी वेदपाठशाळेत त्यांनी सुमारे २५ वर्षे ८० विद्यार्थ्यांना वेदांचे शिक्षण दिले. त्यांनी कीर्तन-प्रवचनेही केली.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची तिथीनुसार जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी त्यांच्या वेदपाठशाळेत शिकलेल्या ५० विद्यार्थ्यांनी कुर्धे येथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज पहिल्या दिवशी उदकशांत, पुण्याहवाचन, व्यासपूजा, पवमान, रुद्र, सौर, ब्रह्मणस्पती आणि रुद्रसूक्ताचा जप, वेदमूर्ती प्रभाकर पाध्ये यांचे प्रवचन, मंत्रजागर, आरती-मंत्रपुष्प, आगवे येथील मुळ्ये मंडळींचे भजन इत्यादी कार्यक्रम पार पडले. कै. फडके यांचे कुटुंबीय, स्नेही, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आठवणींचे 'जनाशताब्दीहे पुस्तक आज प्रकाशित झाले. ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, पत्रकार प्रमोद कोनकर, कै. फडके यांचे सुपुत्र प्रकाश फडके यांच्या हस्ते प्रकाशन झाले. रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
     
रुद्रावर्तने
उद्या सकाळी देवतापूजन, हवन, यतेआराधना आणि तीर्थराजपूजन होणार असून कार्यक्रमाची सांगता होईल.
........

'जनाशताब्दी’ संग्रह बुकगंगावर
..................

जनाशताब्दी हा संग्रह bookganga.com या संकेतस्थळावर ई-बुक स्वरूपात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे पुस्तक पुढील लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून वाचता येईल. (बुकगंगाचा ई-बुक रीडरही डाउनलोड करावा लागेल.)




कुर्धे (ता. रत्नागिरी) : माजी सरपंच वेदमूर्ती जनूकाका फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 'जनाशताब्दी संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ लेखिका सौ. आशाताई गुर्जर, वेदमूर्ती मुंडले, प्रमोद कोनकर, प्रकाश फडके