Monday 19 June 2017

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाची राणी लक्ष्मीबाईंना ग्रंथरूप आदरांजली



रत्नागिरी :  रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने झाशीच्या राणीला १५९ व्या पुण्यतिथीला ग्रंथरूप आदरांजली वाहिली. क्रांतिज्वालानामक या गीतसंग्रहाचे प्रकाशन करतानाच या संग्रहातील सर्व गीते सादर करून दुहेरी औचित्य साधले.
          
क्रांतिज्वालाच्या प्रकाशन समारंभात बोलताना अ‍ॅड. विलास कुवळेकर.
व्यासपीठावर उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, माधव हिर्लेकर,  नगराध्यक्ष राहुल पंडित,
 डॉ. श्रीकृष्ण जोशीमाजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे
कर्‍हाडे ब्राह्मण संघातर्फे रविवारी (दि. १८ जून) झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या १५९ व्या पुण्यस्मरणानिमित्त
क्रांतिज्वालापुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य राष्ट्रभक्ती शिकवते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय भारतराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आपल्या सर्वांनाच राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे शिकवण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच. अशा स्थितीत राणी लक्ष्मीबाईंवर क्रांतिज्वालाया गीतसंग्रहातून डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी समाजाला निश्‍चितच शौर्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी यावेळी केले.
      या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, डॉ. जोशी, नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते.
      नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या भाषणात राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा लवकरच उभारू, अशी ग्वाही दिली. लक्ष्मी चौक या नावाने चौक असला तरी साळवी स्टॉप परिसरामध्ये पुतळा झाला पाहिजे. यातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आठवण व राणी लांज्यातील असल्याने तिच्या शौर्याचे स्मरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
      डॉ. जोशी यांनी मनोगतामध्ये सांगितले, लहानपणी माझे वडील (कै.) सखाराम व आई (कै.) शकुंतला यांनी मला लक्ष्मीबाईंच्या कोट येथील गावी नेले होते. तेव्हा जाणीवपूर्वक दोघांनी लक्ष्मीबाईंची कथा सांगितली. तू राणीवर कविता लिही, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांची इच्छा व माझे स्वप्न पूर्ण होण्याचा योग इतक्या वर्षांनी आला. लक्ष्मीबाईंचे आयुष्य धगधगते होते. तिच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचे स्मरण, वाचन पुढच्या पिढीने केले पाहिजे, याकरिता हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक विक्रीतील सर्व फायदा कर्‍हाडे ब्राह्मण संघाला देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
      श्री. हिर्लेकर यांनी स्वागत केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. पराग आंबेकर यांनी आभार मानले.
    
उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफल
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राणी लक्ष्मीबाईंचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणार्‍या गीतांची
क्रांतिज्वालाही सुरेल मैफलही रंगली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्य, स्वातंत्र्यलढ्याचे धगधगते चित्र या गीतांमधून समोर उभे राहिले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सुरेख शब्दरचनेला संगीत दिग्दर्शक आनंद प्रभुदेसाई यांनी स्वरसाज चढवला. राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणातून श्रोत्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागविली गेली. राम तांबे आणि सौ. श्‍वेता तांबे-जोगळेकर यांनी गायिलेल्या या गीतांचे संगीत दिग्दर्शन आनंद प्रभुदेसाई यांनी केले होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी स्वतःच निवेदन केले. मैफलीत  तबलासाथ राजू धाक्रस, संवादिनी विनय वळामे, सिंथेसायजर वैभव फणसळकर, ऑक्टोपॅड प्रवीण पवार यांनी केली. हरेश केळकर यांनी तालवाद्यांची बाजू सांभाळली. अभिजित नांदगावकर, सुनील बेंडखळे यांनी समूहसाथ केली. आधी नमन विघ्नराजाला, छळ कपट साहती गुलाम अंधारात, करी हिन्दभूध्वजा आणून द्यावी खास, कुठून लाभले काही कळेना पंख विहंगांचे, तुम्ही अंबारीत, हे सदन सुखाचे भरले आनंदाने, घन तिमिराचे, निमिषात कोसळे तिमिराचा घनलोळ, कोसळे आपदा कालगती संपेना, क्षुब्ध जनांचे उष्ण उसासे चेतविती हृदयास, ही कथा क्रांतिज्वालेची आदी गीतांमधून लक्ष्मीबाईंचे संघर्षमय जीवन मैफलीत उलगडले गेले.
मैफलीत रंगून गेलेले श्रोते

Thursday 15 June 2017

सागर निःस्तब्ध झाला!

चिपळूण (जि. रत्नागिरी येथील दैनिक `सागर`चे संपादक, चिपळूणचे माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते निशिकांत माधव ऊर्फ नाना जोशी यांचे ३ जून २०१७ रोजी निधन झाले. कोकणासाठी ती खूपच धक्कादायक घटना होती. कोकणाच्या हितासाठी लेखणीचा सातत्याने वापर करणारा सव्यसाची पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने कोकण किनारपट्टीवरचा सागरच जणू निःस्तब्ध झाला आहे.
रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध केलेला अंक.








..........