Sunday 25 December 2016

केबीबीएफमुळे रत्नागिरी कोकणची आर्थिक राजधानी होईल - राहुल पंडित

रत्नागिरी – आपल्या व्यवसायातील अनुभव केबीबीएफच्या सदस्यांना सांगताना नगराध्यक्ष राहुल पंडित.
रत्नागिरी – कऱ्हाडे ब्राह्मण बिझनेस फोरममुळे (केबीबीएफ) रत्नागिरीची ओळख कोकणची आर्थिक राजधानी अशी होईल, असा विश्वास रत्नागिरीचे नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी येथे व्यक्त केला.
      केबीबीएफची सातवी मासिक बैठक कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात नुकतीच पार पडली. बैठकीत केबीबीएफचे सदस्य आणि नूतन नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
      श्री. पंडित म्हणाले, ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन जास्तीत जास्त जणांनी व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सर्वांनी स्वतःचा कौशल्यविकास करून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून आपल्या व्यवसायाचे आणि उत्पादनांचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करावा. अशाच प्रयत्नांतून केबीबीएफमुळे रत्नागिरीची ओळख कोकणाची आर्थिक राजधानी अशी होऊ शकेल. नगराध्यक्ष म्हणून व्यवसायाभिमुख सुविधा उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.  आपल्या योगिता टायपिंग आणि कॉम्प्युटरच्या व्यवसायातील अनुभवही त्यांनी सदस्यांना सांगितले. 
     
केबीबीएफचे सदस्य योगेश मुळ्ये,    सुहास ठाकूरदेसाई, संदेश शहाणे, पुरुषोत्तम पाध्ये, श्री. जायदे, श्रीमती भागवतयांनी यावेळी मनोगत व्यक्त केले आणि नगराध्यक्षांनी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
      नगराध्यक्षांच्या हस्ते केबीबीएफच्या अँड्रॉइड ॲपचे उद्घाटन तसेच नव्या वर्षाच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. केबीबीएफचे सदस्य आणि रत्नागिरीतील सॉफ्टवेअर डेव्हलपर आर्यक सोल्युशन्स प्रा. लि. चे प्रशांत आचार्य आणि ऋषिकेश सरपोतदार यांनी हे अँड्रॉइड ॲप विकसित केले आहे. त्यात रत्नागिरीतील सदस्यांची आणि त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती संकलित करण्यात आली आहे. हे ॲप सर्वांना मोफत उपलब्ध आहे.आर्यक सोल्युशन्सचे संचालक प्रशांत आचार्य यांनी आपल्या व्यवसायाची यशोगाथा यावेळी सांगितली.
...

Thursday 24 November 2016

मनोरंजनाचा खेळ


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सध्या नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांचा संग्राम सुरू आहे. युती आणि आघाडीसाठी राज्यात एकत्र आलेले पक्ष स्थानिक पातळीवर एका शहरात मित्र म्हणून तर अवघ्या तीस किलोमीटवरच्या दुसऱ्या शहरात एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे म्हणत चाललेल्या या खेळामुळे मतदारांचे मात्र मनोरंजन होत आहे.

...........


रत्नागिरीतील मैदानांच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देणार- कौस्तुभ सावंत

                रत्नागिरी, २४ नोव्हेंबर, (हिं. स.) : गुणवंत खेळाडूंना पोषक वातावरण तयार करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असून त्यासाठी सर्वप्रथम मैदानाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची घोषणा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी केली आहे.
याविषयी बोलताना श्री. सावंत म्हणाले की, मुलांचे मैदानी खेळ कमी होताहेत अशी ओरड सगळेच करताना दिसतात. विशेषतः राष्ट्रीय, ऑलिम्पिक स्पर्धा सुर झाल्या की आपल्या या काळजीला विशेष धार येते. पण काही प्रश्न आपण स्वतःला तर काही प्रशासनाला विचारायला हवेत. सर्वप्रथम मुलांना खेळायला आपण मैदाने शिल्लक ठेवली आहेत का? आपल्या शहरातही एखादा धोनी, तेंडुलकर तयार व्हावा, असे आपल्याला वाटते जरूर, पण त्यासाठी गरज आहे ती परिपूर्ण मैदानांची, खेळाडूंना योग्य सुविधा, प्रोत्साहन उपलब्ध करून देण्याची, मैदानाच्या सुरक्षिततेची. यातल्या कोणत्या गोष्टीची जबाबदारी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून आपण आणि जबाबदार स्थानिक स्वराज संस्था म्हणून नगर परिषद उचलते? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, रत्नागिरीत पूर्वी शिवाजी क्रीडांगणावर अनेक लोक रोज क्रिकेट खेळायचे. पण जेव्हा तेथील खेळपट्टी तयार केल गेली, तेव्हा अनेकांना सरावाला जागाच उरली नाही. मैदानासाठी आरक्षण दिसते पण मैदान दिसत नाही. दुर्दैव म्हणजे यात बदल व्हावा, असे णालाही वाटत नाही. सध्या रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडियममध्ये मुलांना खेळता येत नाही आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल तर बांधकामापासूनच वेगवेगळे उत्सव, शॉपिंग एक्सिबिशन, कार्यक्रम, समारंभ, सभा, मेळावे, फन फेअर यांच्यासाठीच बनवलेय की काय अशी शंका येते. खरतर रत्नागिरीसारख्या मोठ्या वस्तीच्या शहरात वरच्या भागात आणि खालच्या भागात प्रत्येकी एकेक मैदान असायला हवे, जे केवळ खेळाडूंसाठी उपलब्ध असेल.

रत्नागिरीची व्याप्ती पहता रणजी किंवा अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील असे स्टेडियम हवे आहे आणि स्थानिक तरुणांना सराव करता येईल असेही मैदान हवे आहे. हे मैदान फक्त खेळासाठी असेल. तथे सभा, कार्यक्रम होणार नाहीत. तथून खेळाडूंना हुसकावून लावले जाणार नाही. तथे गुरे चरायला येणार नाहीत, थे गवताची कापणी वेळेत होईल. विशेष म्हणजे या मैदानाच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद स्वतःहून प्रयत्न करेल. रत्नागिरीतल्या खेळाडूंना उत्तम, सुसज्ज क्रीडांगण उपलब्ध करून देण्यासाठी, मैदानाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,शी ग्वाही श्री. सावंत यांनी दिली. या प्रकल्पाला इच्छाशक्तीची जोड असल्यामुळे आम्ही ते पूर्णत्वाला नेऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Wednesday 23 November 2016

रिक्षाचालकांनी कौस्तुभ सावंत यांच्याकडे मांडल्या आपल्या व्यथा




    
  रत्नागिरी : वडाप वाहतुकीचा त्रास होत असल्याने तेवढे बंद करता आले तर पहा आणि रत्नागिरीतल्या रस्त्यांची अवस्था सुधारली तर आम्हांला बराच फायदा होऊ शकेल, या रस्त्यांवर गाड्या चालवणं अगदी कठीण होऊन बसलंय अशा शब्दांत ऑटोरिक्षा चालकांनी आपली व्यथा जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांच्याशी बोलताना व्यक्त केली. यावर काही तोडगा काढता आला तर पहा अशी विनंतीही त्यांनी यावेळी श्री. सावंत यांच्याकडे केली.
      जनजागृती संघाने पाठिंबा दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी आज आपल्या प्रचारफेरीदरम्यान ऑटोरिक्षा चालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे यावेळी काही चालकांनी आपण ग्रामीण भागात राहत असल्याने आमचे प्रश्न तुमच्यासमोर कसे मांडावे, अशी शंका उपस्थित केली. मात्र कौस्तुभ सावंत यांनी त्याचे निराकरण करत आपण व्यवसाय रत्नागिरी नगर परिषद हद्दीत करत असल्याने तुमची सोय पाहणे हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे रिक्षाचालकांनी कौतुक केले.
      रत्नागिरी शहरात रिक्षा व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना चालकांनी प्रामुख्याने खराब रस्त्यांचा आणि वडापचा मुद्दा मांडला. शहरातले रस्ते खराब असल्याने वाहतुकीदरम्यान बरेच इंधन वापरले जाते. शिवाय खड्डयांचा त्रास जाणवतो तो भाग वेगळाच! रस्ते सुधारण्याची मागणी त्यांनी यावेळी प्रामुख्याने मांडली. शहरात सुरू असलेल्या अनधिकृत वडापचा फटकासुद्धा आपल्या व्यवसायाला बसत असून वडाप बंद व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
      शहरातील रिक्षांची संख्या ध्यानात घेता रिक्षा थांबे कमी आहेत. त्यामुळे निर्धारित रिक्षसंख्येपेक्षा अधिक रिक्षा थांब्यांवर लावल्या जातात आणि त्याचा परिणाम व्यवसायावर होतो असेही रिक्षाचालकांनी आपले म्हणणे श्री. सावंत यांच्याकडे मांडले. रिक्षसंदर्भातील शासकीय कागदपत्रे, टॅक्स वगैरे संदर्भातील पूर्ततेमध्ये सुलभता यावी असे मत रिक्षाचालकांनी यावेळी व्यक्त केले.
      यावेळी त्यांना दिलासा देताना श्री. सावंत म्हणाले की, रिक्षासंदर्भातील कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी आपण नक्की लक्ष घालू. शहरातील मोक्याच्या जागा हेरून रिक्षा थांबे वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. राम आळीत होणारा ट्रॅफिक जाम लक्षात घेता तेथे रिक्षाचालक व नागरिक दोघांच्या दृष्टीने सोयीची ठरेल अशी एखादी विशेष योजना राबवण्याचा आपला मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय रिक्षाचालकांच्या कामाचं स्वरूप लक्षात घेता त्यांच्यासाठी टॉयलेट बांधण्याचा आपला मानस असल्याचे सांगुन कौस्तुभ सावंत यांनी रिक्षाचालकांना दिलासा दिला.

Sunday 20 November 2016

शहर विकासाच्या १७० योजना तीन वर्षांत पूर्ण करणार – देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी : राज्यातल्या शहर विकासाच्या ८६ हजार कोटी रुपयांच्या १७० प्रलंबित योजना तीन वर्षांच्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण केल्या जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २०) रत्नागिरीत दिली.
जिल्ह्यातल्या चार पालिका आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने शहरांची अनिर्बंध वाढ झाल्याचे सांगून ते म्हणाले की, एकीकडे गावे ओस पडत असताना नियोजबद्ध विकासाच्या अभावामुळे शहरे बकाल होत आहेत. वाढते शहरीकरण म्हणजे विकासाची संधी असल्याचे मानून शहरांचा विकास करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारानुसार देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातील ६५ टक्के वाटा शहरांकडून मिळतो. त्यामुळे शहरीकरण म्हणजे शाप समजू नये. ती एक संधी समजावी. शहरे रोजगार, आरोग्य देणारी शहरे बनवा, असे पंतप्रधानांचे म्हणणे आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा निचरा आणि वीज इत्यादी मूलभूत सुविधा शहरांमधील नागरिकांना हव्या असतात. त्या देण्यासाठी नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता आहे. राज्यात शहर विकासाचे आराखडे वर्षानुवर्षे प्रलंबित राहत असत. आधीच्या १५ वर्षांत केवळ ५० आराखडे मंजूर झाले. विलंबामुळे शहरे म्हणजे काँक्रीटची जंगले बनतात. गेल्या दोन वर्षांमध्ये मात्र ७० आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. रत्नागिरी शहराचे दोन टप्प्यांमधील आराखडे तीस वर्षे प्रलंबित आहेत. आता मात्र अत्यंत कमी वेळेत ते मंजूर होतील. चिपळूणच्या विकास आराखड्याला तर तब्बल दोन हजार ६०० आक्षेप घेण्यात आले. विकास आराखडे म्हणजे परस्पर सहभागाची प्रक्रिया असते. लोकांचे आक्षेप लक्षात घेऊन आराखडे मंजूर केले जातील. कोकणातील २१ हजार कोटी रुपयांच्या २७ प्रलंबित योजना येत्या दोन वर्षांत पूर्ण केल्या जातील. योजना मंजूर झाल्यानंतर एका महिन्यात निविदा प्रक्रिया आणि १०० दिवसांत वर्कऑर्डर निघाली पाहिजे. दिलेल्या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याचे लेखापरीक्षण त्रयस्थ यंत्रणेमार्फत केले जाणार आहे.  खेड, चिपळूण आणि राजापूरच्या पाणी योजनाही लवकरात लवकर मंजूर केल्या जातील. प्रदूषणामध्ये कारखान्यांचा वाटा अवघा दहा टक्के असतो. उर्वरित प्रदूषण शहरांमधून होते. ही स्थिती बदलण्यासाठी नथिंग इज वेस्ट, एव्हरिथिंग इज वेल्थ असे मानून काम करण्याची गरज आहे. प्रत्येक शहराचे सांडपाणी प्रक्रिया करूनच बाहेर पाठविले जाईल. घनकचऱ्यापासून खत आणि गॅसची निर्मिती करून शहरे स्वच्छ ठेवण्य़ावर भर दिला जाईल. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरीसारख्या शहरात भुयारी गटार योजना राबविण्याची गरज सांगून ते म्हणाले की, शहर येत्या दोन वर्षांत वाय फाय करावे. त्याचा मोठा फायदा होतो. कारभारात पारदर्शकता राहते. भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. संपूर्ण डिजिटल गव्हर्नन्सचा वापर करतानाच दोषी अधिकाऱ्यांना शिक्षेची तरतूद केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देश नव्या आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
केद्रात आणि राज्यात ज्या पक्षाचे सरकार असेल, त्याच पक्षाचे सरकार नगरपालिकेत असेल, तर विकास वेगाने होऊ शकतो. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे सर्व उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी शेवटी केले.
सभेला महेंद्र मयेकर (रत्नागिरी), रवींद्र बावधनकर (राजापूर), सौ. सुरेखा खेराडे (चिपळूण) आणि मिलिंद जाडकर (खेड) हे भाजपचे जिल्ह्यातील नगराध्यक्षपदाचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष बाळ माने, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
.................................................................................................




Saturday 19 November 2016

पालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री रविवारी रत्नागिरीत



      रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि. २० नोव्हेंबर) रत्नागिरीत येत आहेत. रत्नागिरीत स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे होणार असलेल्या त्यांच्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
     
मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. यावेळच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत असल्याने त्यांच्या मागे ताकद उभी करण्यासाठी मुख्यमंत्री प्रचाराला येत आहेत. जिल्ह्यात चार पालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
      जिल्ह्यात सर्व पालिका निवडणुकीमध्ये भाजपने रणनीती आखली आहे. काही ठिकाणी अनुभवी उमेदवार असून नवोदित आणि सुसंस्कृत, सुशिक्षित उमेदवारांनाही संधी दिली आहे. मुख्यमंत्री त्यांच्या सभेमध्ये या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत. सबका साथ सबका विकास या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचा विकास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे उद्दिष्ट आहे. राज्य शासनाच्या योजना अधिक सक्षमतेने रत्नागिरी जिल्ह्यातही राबवण्याचे प्रयत्न आहेत. यादृष्टीने पालिकांवर सत्ता मिळवणे महत्त्वाचे असून याकरिता सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे त्याला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी व्यक्त केली.
      दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्र मयेकर यांच्या जोरदार प्रचारफेर्‍या सुरू आहेत. आता प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार करण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवार, नेत्यांच्या मुलाखती व मतदानासाठी आवाहन गाड्यांमधील एलईडी स्क्रीनवर दाखविले जात आहे. शहरासाठी केल्या जाणार्‍या नव्या योजनांची माहितीही यात दिली जात आहे. रत्नागिरी शहराच्या विकासात भाजपने यापूर्वी मोठे योगदान दिले आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासासाठी नव्या योजना घोषित केल्या आहेत. नळपाणी योजना, रस्त्यांचे डांबरीकरण इत्यादींचा फायदा रत्नागिरीकरांना मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारने व विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष घातल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. तसेच कोकणचे खास व केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कल्पकतेमुळे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण सुरू झाले आहे. कोकण विकासासाठी भाजप सरकारच महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे यातून सिद्ध होत आहे. त्याचा भाजपला नक्कीच उपयोग होईल व भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर व सरचिटणीस उमेश कुळकर्णी यांनी केला.
      रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीतही भाजप सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. मतदारांपर्यंत पोहोचून माहिती सांगणे, विकासयोजना पोहोचवणे, जाहीरनामा सांगणे असा प्रचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांची सभा हायटेक प्रचारातून प्रचाराला खरी धार येणार आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक प्रभागात हायटेक प्रचार सुरू करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर हा प्रचार सुरू होणार आहे. आता निवडणुकीसाठी एकच आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून प्रचार करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.
..........


सभेचे थेट प्रक्षेपण
      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा आविष्कार रत्नागिरीतही घडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेचे थेट प्रक्षेपण सकाळी ११ वाजल्यापासून मोबाइलद्वारे कोठेही पाहता येणार आहे. त्याकरिता मोबाइलधारकांना  http://185.105.4.126/tgc  या लिंकवर लॉग इन करावे. ही सुविधा उपलब्ध करून देणारे ग्लोबल कनेक्ट सर्व्हिसेसचे प्रतिनिधी सचिन घोलप यांनी ही माहिती दिली.
.......................
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी तयार करण्यात आलेला मंडप