Saturday 30 July 2016

एसटीचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी

रत्नागिरी एसटीच्या रत्नागिरी विभागाचे मावळते विभाग नियंत्रक कैलास देशमुख गुरुस्थानी असल्याची कृतज्ञता अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. एखाद्या अधिकाऱ्याबद्दल अशी कृतज्ञता व्यक्त झालेली पाहताना अनेकांना गहिवरून आले.
एसटी विभागातून जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार शनिवारी (ता. ३० जुलै) स्वयंवर मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यामध्ये विभाग नियंत्रकर कैलास देशमुख यांचाही समावेश होता. श्री. देशमुख यांना आमदार उदय सामंत आणि अधीक्षक अशोक यांच्या हस्ते मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आला. या वेळी विवेक भागवत, प्रमोद घाग, अंकुश पवार, अनिलकुमार जाधव, सतीश जोशी, मेहबूब दर्शवाल, सदानंद खरात, राजाराम लिंगायत, सूर्यकांत जाधव, प्रदीप सावंत, गजानन फडणीस, समाधान आखाडे या कर्मचार्‍यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे मुंबई प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, माजी महाव्यवस्थापक आर. सी. पाटील, मुंबईचे विभाग नियंत्रक श्री. सुपेकर व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुरेश मराठे, सौ. ज्योती देशमुख उपस्थित होते. आमदार श्री. सामंत म्हणाले की, मी पहिलाच असा अधिकारी पाहतो आहे की, सर्व कर्मचार्‍यांनी मिळून सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार केला. श्री. देशमुख यांनी लोकांशी चांगले नातेसंबंध जोपासले आहेत. ते एसटीतून निवृत्त होत असले तरी सार्वजनिक जीवनात त्यांची नवी इनिंग सुरू होणार आहे.
कार्यक्रमात अनेकांनी मनोगतामध्ये देशमुख यांच्या गुणगान केले. ते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जातात. यामुळेच ते गुरुस्थानी असल्याचे अनेकांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना श्री. देशमुख यांनी सांगितले की, आर. सी. पाटील हे गुरुस्थानी आहेत. सर्वांच्या सहकार्यामुळेच ३० वर्षे नोकरी करू शकलो.

सौ. राजलक्ष्मी सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला मुंबई, नगर, भोर, पुणे, मोहोळ, सटाणा, नाशिक, कोल्हापूर या एसटी आगारातून अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते.
.........................................................................................................
रत्नागिरी : एसटीतील सेवानिवृत्त झालेले कर्मचारी. त्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी मागे उभे आमदार उदय सामंत, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एसटीचे प्रादेशिक व्यवस्थापक राहुल तोरो, कैलास देशमुख आदी.

'मेरी सडक' निष्प्रभ करणारा महामार्ग

Wednesday 27 July 2016

अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी मंडळातर्फे रत्नागिरीत श्रावण कीर्तन सप्ताह


         रत्नागिरी - येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे श्रावण महिन्याचे औचित्य साधून
कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. कीर्तन सप्ताह ३ ते ९ ऑगस्टदरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३०
या वेळेत मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार आहे.
        सप्ताहाच्या पहिल्या दिवशी ३ ऑगस्टला आंजर्ले-दापोली येथील विजय निजसुरे यांचे कीर्तन होईल.
बुलंद बुरूज या आख्यान विषयावर कीर्तन करतील. त्यांनी (कै.) संजय जोशी (मुर्डी) यांच्या प्रेरणेने सन २००२
पासून  कीर्तनाचा अभ्यास केला. आजपर्यंत त्यांची ३८७ कीर्तने केली.
        चिपळूणचे प्रसिद्ध कीर्तनकार महेश काणे हे दत्तभक्त शेतकरी विषयावर ४ ऑगस्टला कीर्तन करतील.
हभप कै. नरेंद्र हाटे हे त्यांचे कीर्तनातील गुरू, डॉ. कविता गाडगीळ गायनातील गुरू. संगीत विशारद, देवर्षी
 नारद, कीर्तन केसरी, कीर्तन विशारद, कीर्तन भास्कर या पदव्यांनी ते सन्मानित आहेत. आकाशवाणी मुंबईचे
बी ग्रेड कलाकार आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांत सुमारे
दोन हजार कीर्तने केली आहेत.
        देवरूखचे युवा कीर्तनकार हभप कुमार विष्णू भाट्ये यांचे सुधन्वा चरित्र यावर ५ ऑगस्टला आख्यान
होईल. त्यांचे एमएपर्यंतचे शिक्षण झाले. ते काही वर्षांपासून कीर्तनाचा व्यासंग उत्तमरीत्या सांभाळत आहेत.
अनेक ठिकाणी कीर्तनसेवा केली आहे.
        पुण्याचे प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या शिष्या सौ. रेशीम मुकुंद खेडकर (मरकळे) यांचे
संत सावतामाळी या विषयावरचे कीर्तन ६ ऑगस्टला होईल. सौ. खेडकर बीकॉम, जीडीसी अँड ए असून
एमए-संगीत, हार्मोनियम विशारद पदव्या प्राप्त आहेत. १९९९ पासून त्या कीर्तन शिक्षण घेत असून श्री हरी
कीर्तनोत्तेजक सभा, पुणे येथे पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. २००३ पासून आफळे यांच्याकडे कीर्तनाचे
शिक्षण सुरू झाले. त्या पायपेटी, ऑर्गनची उत्तम साथसंगत करतात. युवती, गानकोकिळा, संगीत प्रमोदिनी
या कीर्तनातील पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आत्तापर्यंत त्यांची महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, लखनौ,
कोलकाता, अहमदाबाद, बडोदा, ग्वाल्हेर, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथे ५५० कीर्तने झाली.
        पुण्याच्या युवा कीर्तनकार हभप सौ. संज्योत संजय केतकर (पूर्वाश्रमीच्या उत्कर्षा जावडेकर) यांचे
महानंदा यावर आख्यान ७ ऑगस्ट रोजी होईल. सौ. केतकर यांना बीए-संस्कृत ही पदवी प्राप्त असून
तबलावादनाच्या पाच परीक्षा उत्तीर्ण आहेत. १२ वर्षे चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार उद्धव
जावडेकर, हभप भिडे, नारद मंदिर, पुणे येथे त्यांचे कीर्तनाचे शिक्षण झाले आहे. तसेच आई, बहीण,
पं. शरद गोखले यांच्याकडून गायनाचे मार्गदर्शन मिळाले. नारद मंदिराचा युवती कीर्तनकार हा पुरस्कार
त्यांना प्राप्त आहे. त्यांनी आतापर्यंत १०० कीर्तन केली आहेत.
        मीरा रोड, ठाणे येथील कीर्तनकार भालचंद्र पटवर्धन यांचे ८ ऑगस्टला पार्थरथी हनुमान यावर
कीर्तन होईल. ते इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून मध्य प्रदेश विद्युत मंडळ, टेक्स्टाईल मिलमध्ये त्यांनी नोकरी केली.
सन २००३ ते २००६ पर्यंत अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर (मुंबई) येथून हभप श्रीधर भागवत यांच्या
मार्गदर्शनाखाली कीर्तनालंकार हा पाठ्यक्रम पूर्ण केला. गोवा, महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरातमध्ये
त्यांची ४०० कीर्तने, प्रवचने झाली. २००८ मध्ये लंडन, २०१० मध्ये स्वित्झर्लंड येथे कीर्तने केली.
        राजापूरचे कीर्तनकार दत्तात्रय रानडे हे मानाची पालखी या विषयावर ९ ऑगस्टला कीर्तन करतील.
ग्रंथ हेच गुरू समजून कीर्तन तरंगिणी शिरवळकर बुवांची पुस्तके व अन्य ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी
कीर्तनविद्या आत्मसात केली. दत्तदास घाग, आफळेबुवा, रामचंद्र भिडे, नाना जोशी, पाटणकरबुवा,
वीरकरबुवा यांना त्यांनी कीर्तनातील आदर्श मानले आहे.
        कीर्तन सप्ताहाला ऑर्गनची साथ वाटद-खंडाळा येथील प्रसिद्ध वादक राजेंद्र भडसावळे,
तबलासाथ कशेळी-राजापूर येथील वादक आनंद ओळकर करणार आहेत. कीर्तन सप्ताहातील सर्व
कीर्तनांच्या लाभ सर्व कीर्तनप्रेमींनी कुटुंबीय व मित्रमंडळींसह उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे
कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य व मंडळाचे सर्व
पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
......................
 

Tuesday 19 July 2016

सौ. सुहासिनी भडभडे यांचे निधन

रत्नागिरी : येथील सौ. सुहासिनी सुभाष भडभडे (वय  ६६) यांचे शनिवारी (ता. १६ जुलै) सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या व मनमिळाऊ होत्या. माणगाव (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयातील निवृत्त शिक्षक, रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालय, गीतामंडळ, कोकण मराठी साहित्य परिषद आणि सर्वोदय छात्रालयाचे सक्रिय पदाधिकारी सुभाष दत्तात्रय भडभडे यांच्या त्या पत्नी होत.
कै. सौ. सुहासिनी भडभडे यांचे पूर्वाश्रमीचे नाव मालती शेवडे (निवेंडी). विवाहानंतर त्या पतीसमवेत माणगावला राहायला गेल्या. तेथील वासुदेवानंद सरस्वती ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. श्री. भडभडे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब रत्नागिरीतील टिळक आळीत स्थायिक झाले.
सौ. भडभडे यांना गेले काही महिने मधुमेह, हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या विकाराचा त्रास होत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच गेल्या शनिवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातत पती, मुलगा, मुलगी, सून, नाती असा परिवार आहे.


Sunday 17 July 2016

‘निशिगंध ते प्राजक्त’ने रत्नागिरीची सांस्कृतिक उंची वाढवली : ॲड. विलास पाटणे

रागसमय चक्रावर आधारित बारा तासांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम

रत्नागिरी - निशिगंध ते प्राजक्त हा संपूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करून सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या शिष्यांनी रत्नागिरी शहराची सांस्कृतिक उंची वाढविली आहे, असे गौरवोद्गार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ड. विलास पाटणे यांनी काढले.


-    रत्नागिरी - निशिगंध ते प्राजक्त कार्यक्रमाचे उद्घाटन करताना
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष ड. विलास पाटणे,
प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एच. कांबळे, सोबत सौ. मुग्धा भट-सामंत,
राजू बर्वे, दिलीप केळकर
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सौ. मुग्धा भट-सामंत यांचे वडील गजानन भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सौ. सामंत यांनी आणि त्यांच्या शिष्य परिवाराने निशिगंध ते प्राजक्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात तब्बल बारा तास चाललेल्या शास्त्रीय संगीतावर आधारित या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ड. पाटणे बोलत होते. शास्त्रीय संगीत हा भारताचा ठेवा असून पॉप संगीताच्या आजच्या काळातही त्याला जगभरात मानाचे स्थान आहे, असेही ते म्हणाले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. रमेश कांबळे यांनीही कार्यक्रमाचे कौतुक करून संगीताच्या विद्यार्थ्यांनी नियमित रियाज करून यश मिळवावे, असे आवाहन केले. ड. पाटणे, डॉ. कांबळे यांच्यासह ध्वनिसंयोजक राजू बर्वे आणि छायाचित्रकार दिलीप केळकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
-    कार्यक्रमात गीते सादर करताना विद्यार्थी
शास्त्रीय संगीत कसे मनोरंजक असू शकते हे समजावे, त्याची गोडी मुलांना लागावी, यासाठी कार्यक्रम आयोजित केल्याचे सौ. मुग्धा भट-सामंत यांनी सांगितले. गायनापेक्षाही संगीताची माहिती आणि अभ्यास त्यांनी करावा, हाच त्यातील हेतू आहे. तरुण पिढीने पारंपरिक शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करावा, म्हणून असेच माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण कार्यक्रम करत राहण्याचा आपला संकल्प असल्याचे त्या म्हणाल्या.
निशिगंध ते प्राजक्त हा संपूर्ण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम शनिवारी (ता. १६) सायंकाळी ६ ते रविवारी (ता. १७) सकाळी ६ या वेळेत सादर करण्यात आला. रागसमय चक्रावर आधारित या कार्यक्रमात ६ ते ६० वयोगटातील शिष्य सहभागी झाले. निशिगंध सायंकाळी हळुवार उमलत जातो आणि प्राजक्ताचा सडा सकाळी पडतो. तेच औचित्य साधून सायंकालीन रागांपासून प्रातःकाळापर्यंत वेगवेगळ्या प्रहरात नेमून दिलेले राग या कार्यक्रमात सादर झाले. त्या त्या वेळात राग गायला गेल्यानंतर साधलेल्या परिणामांचा अभ्यास सौ. सामंत यांच्या प्रारंभिक ते अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी केला. तोच यावेळी सादर करण्यात आला. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत गायले जाणारे व विशेष न गायले जाणारे राग या कार्यक्रमात सादर झाले. कार्यक्रमात सूत्रसंचालन-निवेदनाची बाजू विद्यार्थ्यांनीच सांभाळली. सर्व रागांचे विद्यार्थ्यानी अभ्यासपूर्ण निवेदन केले. रागाच्या रसनिष्पत्तीमध्ये समयाचा मोठा वाटा असतो. त्या त्या समयी तो तो राग सादर झाला तर अधिक परिणाम साधू शकतो का याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. राग, रस, स्वर, रंगय, समय या सगळ्यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. खमाज, काफी, भूप, दुर्गा, बागेश्री, विहाग, देस, जोग, नंद, हंसध्वनी, जयजयवंती, शंकरा, मियामल्हार, मालकंस, दरबारी कानडा, नायकी कानडा, चंद्रकंस, मधुकंस, बसंत, बहार, ललत, बिभास, अहिरभैरव, नटभैरव, भैरवी हे राग या कार्यक्रमात सादर केले गेले. रागांच्या वादी आणि संवादी स्वरांच्या रंगांचे पोषाख गायकांनी परिधान केले होते. कार्यक्रमाला प्रसाद वैद्य, राजू धाक्रस, केदार लिंगायत, निखिल रानडे (तबला), तर संतोष आठवले, वैभव फणसळकर, चैतन्य पटवर्धन, मधुसूदन लेले (हार्मोनिअम) यांनी संगीतसाथ केली.

राग आणि समय या विषयासंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रश्नावली तयार करून या कार्यक्रमात संगीत शिकणाऱ्या आणि न शिकलेल्या रसिकांकडून भरून घेण्यात आली.
.................................
-    निशिगंध ते प्राजक्तमधील गायक कलाकार आणि शिक्षकांसह सौ. मुग्धा भट-सामंत.

Wednesday 13 July 2016

रत्नेश्वर ग्रंथालय रुग्णवाहिकेमुळे वाचले ३८ जणांचे प्राण

रत्नागिरी : धामणसे (ता. रत्नागिरी) येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाला दानशूर (कै.) तात्या अभ्यंकर यांनी दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे गेल्या वर्षभरात ३८ जणांचे प्राण वाचले. यात ६ अपघातग्रस्त आणि सर्प, विंचूदंश झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. २५ आजारी रुग्णांना नेण्यासाठी व ७ जणांचे मृतदेह नेण्यासाठी उपयोग झाला. धामणसे पंचक्रोशीत ही रुग्णवाहिका खऱ्या अर्थाने आधार देणारी आधार देणारी ठरली आहे. ही रुग्णसेवा १४ जुलै रोजी दोन वर्षांची होत आहे.
दोन वर्षांपूर्वी रत्नागिरीतील दानशूर व्यक्तीमत्त्व तात्यासाहेब अभ्यंकर यांनी आई-वडील कै. नलिनी व गोविंद अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथालयास आठ लाख रुपये खर्चून रुग्णवाहिका दिली. दानशूर तात्यांचेही गतवर्षी निधन झाले. मात्र तात्या आपल्या कार्यातून आजही धामणसे पंचक्रोशीवासीयांच्या हृदयात आहेत. ग्रंथालय रुग्णवाहिका चालवते ही कोकणातील नव्हे महाराष्ट्रातील एकमेव गोष्ट म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धामणसे दशक्रोशीमध्ये ही रुग्णवाहिका खूपच उपयुक्त ठरत आहे. रुग्णवाहिकेने सर्पदंश झालेल्या अनिता लोगडे व अपघातग्रस्त तुषार शिंदे यांना कमी वेळेत रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. याबद्दल या दोघांनीही (कै.) तात्या व अभ्यंकर कुटुंबीयांबद्दल ऋण व्यक्त केले.
रुग्णवाहिका ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवली जाते. धामणसे पंचक्रोशीतील नेवरे, धामणसे, खरवते, ओरी, निवेंडी या गावातील रुग्णांना रत्नागिरी, गणपतीपुळ्यातील रुग्णवाहिकेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामस्थांना चांगलाच उपयोग होत आहे. रुग्णवाहिकेवर विनय पांचाळ, महेश पांचाळ, विजय निवेंडकर, विजय इरमल, वैभव वारशे, नेवरे येथील प्रणिल शिंदे, सागर कोलगे, प्रवीण आयरे यांनी चालक म्हणून सेवा बजावली. रुग्णवाहिकेचे व्यवस्थापन ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद जोशी, सदस्य मोहन पवार, प्रशांत रहाटे, सुनील लोगडे, सौ. स्मिता कुलकर्णी यांच्यासह ग्रंथपाल केशव कुळकर्णी, अविनाश लोगडे, सुरेश लोगडे हे करत आहेत.
..............
रुग्णवाहिका मागविण्याकरिता संपर्क क्रमांक –
१)      अविनाश लोगडे – ७७९८५४०५८५
२)      केशव कुलकर्णी – ९७६४२१४४३३

....................

Tuesday 5 July 2016

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन



रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१६ मध्ये घोषित होणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांसाठी पुस्तके मागविण्यात आले आहेत. हे सर्व पुरस्कार कोमसापचे कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत.
प्रथम श्रेणीचे सात पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहेत. कादंबरी, कथा, कविता, समीक्षा, ललित गद्य, चरित्र, आत्मचरित्र, चित्रपटविषयक पुस्तकांकरिता पुरस्कार दिले जातील. र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कवितासंग्रह पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्रभाकर पाध्ये समीक्षा पुरस्कार, धनंजय कीर चरित्र पुरस्कार, भाई भगत चित्रपट, नाट्यविषयक पुरस्काराचा समावेश आहे. सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी गोवा, कारवार, बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाईल.
विशेष सात पुरस्कार प्रत्येकी तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र अशा स्वरूपाचे असून त्यामध्ये कादंबरी, कथा, कविता, बालवाङ्मय, संकीर्ण गद्य, नाटक-एकांकिका, वैचारिक पुस्तकांचा समावेश आहे. त्यात वि. वा. हडप कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत कवितासंग्रह पुरस्कार, श्रीकांत शेट्ये चरित्र, आत्मचरित्र पुरस्कार, प्र. श्री. नेरूरकर बालवाङ्मय पुरस्कर, वि. कृ. नेरूरकर संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, अरुण आठल्ये संकीर्ण वाङ्मय पुरस्कार, रमेश कीर नाटक, एकांकिका पुरस्कार, वैचारिक साहित्यासाठी फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार आहेत.
पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती ३० सप्टेंबर २०१६ पूर्वी अरुण नेरूरकर, ९९९, पार्वती सदन, मसुरेकरनगर, जेलरोड, रत्नागिरी यांच्याकडे पाठवाव्यात. त्यासाठी लागणारा अर्ज आणि माहितीपत्रकासाठी keshavsutsmarak@rediffmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. पुस्तके १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत. पूर्वी पाठवलेली पुस्तके पुन्हा पाठवण्याची गरज नाही. मुदत असेपर्यंत वा मुदत संपेपर्यंत एकदा पाठवलेले पुस्तक पुरस्कारासाठी विचारात घेतले जाईल.