Thursday 5 May 2016

बीएडच्या प्रवेशासाठी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे आवाहन



रत्नागिरी : येत्या १२ जून रोजी शिक्षणशास्त्र पदवी (बीएड) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश चाचणीचे अर्ज भरण्याचा प्रारंभ ४ मे रोजी झाला आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
                केवळ महिलांसाठी असलेल्या या महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थिनी वसतिगृहाची व्यवस्था आहे. शैक्षणिक शुल्कासाठी बँकेचे कर्ज मिळण्याची तसेच शैक्षणिक शुल्क हप्त्यानुसार भरण्याचीही सुविधा आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींना सरकारी नियमानुसार शिष्यवृत्ती मिळेल. या महाविद्यालयात शालेय व्यवस्थापन पदविकेचा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. इच्छुकांना (०२३५२) २३३४९९, २३२१५५, ९४२०२७४११९ या दूरध्वनीवर संपर्क साधल्यास अधिक माहिती मिळू शकेल.

Saturday 23 April 2016

साटवली जिल्हा परिषद शाळेचा रविवारी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

लांजा : तालुक्यातील साटवली येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा क्र. १ चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव रविवारी (ता. २४) साजरा होत आहे.
       शिवकालीन ऐतिहासिक गढी असलेल्या साटवली गावात स्वातंत्र्यापूर्वी ८० वर्षे शाळा सुरू झाली. लोकमान्य टिळकांच्या जन्माच्या वर्षीच सुरू झालेल्या या शाळेत राष्ट्रीय विचाराचे विद्यार्थी तयार व्हावेत, हा उद्देश ठेवण्यात आला होता. इंग्रजांच्या राजवटीत सर्वत्र इंग्रजी शिकविणाऱ्या शाळा असताना साटवलीतील या मराठी शाळेने वेगळा इतिहास निर्माण केला होता. स्वातंत्र्यानंतर ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाली. शाळेचा फारसा इतिहास माहीत नसला, तरी यावर्षी शाळेला दीडशे वर्षे होत आहेत. हा महोत्सव साजरा करण्याकरिता प्रसाद पंडित यांच्या अध्यक्षतेखाली शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. आदेश आंबोळकर उपाध्यक्ष, तर महेंद्र आंबोळकर समितीचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.
       शाळेत साठ वर्षांपूर्वी शिकणाऱ्या आणि साठी पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. साटवलीच्या बाजारपेठेतील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात रविवारी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. आमदार राजन साळवी, शिक्षण समिती सभापती विलास चाळके, जिल्हा परिषद सदस्या वृषाली कुरूप, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, लांजा पंचायत समितीच्या उपसभापती प्रियांका रसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, माजी आरोग्य सभापती दत्ता कदम, माजी उपसभापती आदेश आंबोळकर, शिक्षण समन्वय समितीचे संदीप दळवी, लीला घडशी इत्यदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. साटवलीच्या या शाळेविषयी, माजी विद्यार्थ्यांविषयी कोणाला माहिती असेल, तर ती त्यांनी या समारंभाच्या निमित्ताने सादर करावी आणि समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीने केले आहे.
...........

(संपर्क – प्रसाद पंडित - ९४२०९१०२०६)

Monday 18 April 2016

संस्कृत समजत नाही हा आपला पराभव – धनंजय चितळे



रत्नागिरी : संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची मूळ भाषा म्हणजेच जननी आहे. ती समजायला कठीण नाही. तरीही ती आजकाल आपल्याला समजत हा आपला पराभव आहे, असे मत प्रवचनकार धनंजय चितळे (चिपळूण) यांनी येथे व्यक्त केले.
     
रत्नागिरी – गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या
शतक महोत्सव समारंभात प्रवचन करताना धनंजय चितळे.
शेजारी विनायक पोखरणकर सर आणि पुण्याचे पं. शिवराम कृष्ण धायगुडे.
रत्नागिरीच्या गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पहिल्या दिवशीच्या (ता. १७) दुसऱ्या सत्रात प्रवचन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विनायक पोखरणकर सर आणि पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे उपस्थित होते. भाषासु मुख्या मधुरा हा चितळे यांच्या प्रवचनाचा विषय होता. ते म्हणाले, संस्कृत शिकण्यासाठी इंग्लंड, जर्मनीतून लोक येतात. भारतात शिकून जातात आणि स्वदेशी जाऊन संशोधन करतात. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करतो. हे दुर्दैवी आहे. संस्कृत ही देशाभिमान जागृत करणारी भाषा आहे. संस्कृत साहित्यामध्ये अभ्यास
करण्यासाठी भरपूर सूत्रे उपलब्ध आहेत. यज्ञवेदी कशी अशावी, ती चौकोन, त्रिकोण इत्यादी आकारात कशी उभारावी. जमिनीचे उतार, चढाव कसे असावेत, या उल्लेख शास्त्रात आहे. त्यावरूनच भूमिती या विषयाचा विस्तार झाला. सध्या भूमितीमध्ये पायथॅगोरस, युक्लिड इत्यादी पाश्चात्यांचे उल्लेख येतात. पण सर्वप्रथम भूमिती शिकविणाऱ्या भारतीय भास्कराचार्यांचा उल्लेख नाही. कोपर्निकस, गॅलिलिओ हे खगोलशास्त्राचे जनक असल्याचे मानले जाते. त्याआधी ज्ञानेश्वरीत 'जैसे सूर्याचे न चालण्यावाचून चालणे' असा उल्लेख आहे. त्याचाच  अर्थ कोपर्निकसच्या कितीतरी आधी ज्ञानेश्वरांना सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याभोवती फिरते, हे माहीत होते.
      संस्कृतमधील भूगोलाच्या अभ्यासाविषयी श्री. चितळे म्हणाले, भूगोलाविषयी विविध विषय हल्ली शाळांमधून शिकविले जातात. ते पाश्चात्य ज्ञानावर आधारित असतात. परंतु पराशर ऋषींनी ढगांचे आवर्त, संवर्त इत्यादी ९ प्रकार सांगितले आहेत. त्यातील ३ प्रकारचे ढग पाऊस पाडतात. हे संशोधन आज उपलब्ध आहे. विहिरी, नद्या, कालवे, मेघ यांच्या गर्जना, पाऊस पाडण्याचे ज्ञान असणाऱ्या सर्वांना नमस्कार केल्याचा उल्लेख रुद्र संहितेते आहे. याचाच अर्थ त्या काळी पाऊस पाडणे आणि थांबवण्याचे ज्ञान असणारे तज्ज्ञ होते. आज हे ज्ञान उपलब्ध नाही. या क्षेत्रात संशोधनाला वाव आहे. संस्कृतमधील ग्रंथांचा अभ्यास करून हे संशोथन करणे शक्य आहे.
      आज माहितीचे मायाजाल उपलब्ध आहे. पण भारतीय आपल्या संस्कृतीमध्ये स्वानुभवीत ज्ञानाला महत्त्व असल्याचे सांगून श्री. चितळे म्हणाले, जे अभ्यासाने प्राप्त होते ते खरे ज्ञान होय. ओपनहायमर आणि रॉबर्ट यांनी प्रथम अणुचाचणी घेतली, तेव्हा त्यांना भगवद्गीतेतील श्लोकाचाच अनुभव मिळाला. सहस्र सूर्य एकाच वेळी आकाश प्रकाशित झाले आहेत, असा उल्लेख गीतेत आहे. तसेच भासल्याचा उल्लेख त्यांनी अशा ब्रायटर दॅन वन थाउजंड सन्स शब्दांत आपल्या पुस्तकात केला आहे. हा अनुभव जयंत नारळीकरांनी आपल्या पुस्तकात लिहिला आहे. आपण सध्या झाडे लावण्याबाबत जनजागृती करतो. पण जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये झाडे लावण्याचे आवाहन अनेकदा केलेले आढळते.
      संस्कृतमुळे वाणी शुद्ध होते. भाषा शुद्ध होते. कोण्या एखाद्या वर्णाची नसून सर्वांना खुली असलेल्या या भाषेत गोडवा आहे. संस्कृतमधील हजारो सुभाषिते आजही व्यवहारज्ञान शिकवितात. अशी थोरवी असलेली संस्कृत भाषा शिकण्याचा, अभ्यास करण्याचा आणि ती व्यवहारात आणण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केला पाहिजे, असे श्री. चितळे यांनी सांगितले.
...........

Sunday 17 April 2016

संस्कृत भाषेच्या नव्हे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न हवेत – पंडित धायगुडे


            रत्नागिरी  : पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती विसरली गेली आहे. अशा वेळी केवळ संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत प्रतिपादन पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे यांनी येथे व्यक्त केले.
संस्कृत पाठशाळा शतक महोत्सवात बोलताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर.
येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे, विनायक पोखरणकर गुरुजी, धनंजय चितळे आदी उपस्थित होते. श्री. धायगुडे यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे भारतीय संस्कृती कशी बिघडली आहे, यावर  प्रकाश टाकला. आपण लोकशाहीत राहत असलो, तर आपणच चांगले बदल घडवले पाहिजेत. शब्द म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द हे वाहक आहेत. त्यांचा उपयोग करून ज्ञान मिळविले पाहिजे. म्हणूनच भाषेवर नव्हे तर संस्कारांवर प्रेम करावे. संस्कृती शिकवणारी भाषा म्हणजे संस्कृत. त्यासाठी पाठशाळेचा उपयोग करून घ्यावा. संस्कृती टिकवली तरच राष्ट्र टिकू शकते. संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर आपणच पुढे आले पाहिजे. इंग्रजांनी भारतीय संस्कृतीचा बुरखा घेऊन भारतीय संस्कृती बुडवायचा प्रयत्न केला. त्याची सुरवात १८३४ साली मॅक्समुल्लरने सुरू केलेल्या नव्या शिक्षणपद्धतीमुळे झाली. ते इंग्रजांचे षड्यंत्रच होते. स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण भारतीय झालो नाही. त्यामुळेच संस्कारहीनता निर्माण झाली असून अनाचार वाढले आहेत. ही स्थिती बदलायची असेल, तर केवळ संस्कृत भाषेचे नव्हे, भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. भारतात पूर्वी दोन हजार संस्कृत पाठशाळा होत्या. पाठशाळा या प्रयोगात्मक शिक्षण देतात. मात्र ब्रिटिशांनी या शाळा बंद पाडून पाश्चिमात्य संस्कृती येथे रुजवली. यामुळेच आपण बिघडलो आहोत. संस्कृती शिकण्यासाठी पाठशाळांचा उपयोग करून घेतला पाहिजे. या पाठशाळांचे जतन केल्यास शतक महोत्सवच नव्हे तर सहस्र महोत्सवही साजरा करता येईल.
        
              यावेळी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. (कै.) पुरुषोत्तमशास्त्री फडके, बाळकृष्ण हर्डीकर आणि कै. दा. गो. जोशी या माजी शिक्षकांच्या वतीने अनुक्रमे आशा गुर्जर, विजय हर्डीकर आणि विजयानंद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. माधव जोशी, अच्युत फडके, मनोहर फडके, कीर्तनकार नाना जोशी, अनंत मराठे, सुनील भाटवडेकर, महेश बोंडाळे, प्रकाश साधले, श्री. कापरे, पद्मनाभ जोशी, श्रीकृष्ण पाध्ये, प्रवीण पाटणकर, श्रीपती सिधये, चंद्रकांत नामजोशी, दिनकर सायनेकर, गजानन हर्डीकर हे माजी विद्यार्थी आणि संस्कृत अध्यापिका मधुरा बोंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. देणगीदार राजाराम प्रभुदेसाई यांच्या वतीने डॉ. शरद प्रभुदेसाई, दिलीप वैद्य, बापू जोशी, बाळासाहेब पित्रे, सौ. नीला भिडे या देणगीदारांचाही सत्कार केला.
            शतक महोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. धायगुडे यांनी केले. त्यानंतर सीए ऋषीकेश फडके, स्मरणिकेसाठी मदत करणारे संतोष खडपे आणि ज्ञानेश्वर मुद्रणालयाचे दादा जोशी यांचा सत्कार केला. सौ. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविकात शाळेची माहिती दिली.
           संस्कृत पाठशाळेत सर्वांनी यावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात वैद्य रघुवीर भिडे यांनी केले. पद्मनाभ जोशी यांनी आभार मानले.
  नगराध्यक्ष श्री. मयेकर म्हणाले, रत्नागिरी शहराची शान वाढवणाऱ्या या संस्कृत पाठशाळेला पालिकेकडून दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. या पाठशाळेत ब्राह्मण विद्यार्थीच येतात, असा गैरसमज आहे. मात्र येथे आल्यानंतर मला संस्कृतबद्दल प्रेम व आकर्षण वाटू लागले आहे. परदेशी लोक संस्कृत शिकून येथे येत आहेत. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करत आहोत. भारतात नावलौकिक होईल, असे विद्यार्थी या शाळेतून घडावेत, याच सदिच्छा.
................

Saturday 16 April 2016

रत्नागिरीत ३० एप्रिलला सिटिझन जर्नालिझम कार्यशाळा



रत्नागिरी  : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे येत्या ३० एप्रिल रोजी रत्नागिरीत सिटिझन जर्नालिझमविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण भोंदे यांनी आज (दि. १६ एप्रिल) रत्नागिरीत ही माहिती दिली.
                सामाजिक समस्या सोडविणे हे पत्रकारितेचे प्रमुख कार्य असते. संपादकीय आणि अन्य लेखांमधून वृत्तपत्रे तसेच अलीकडच्या काळात विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून विविध समस्या, घटना-घडामोडींविषयी भाष्य केले जाते. सामान्य वाचकही त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया वृत्तपत्रांमधील वाचकांच्या पत्रांमधून व्यक्त करत असतो. अनेक सजग वाचक पत्रांमधून समस्या मांडतात. तसेच अग्रलेख आणि लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अलीकडे वृत्तपत्रांची बदललेली संपादकीय धोरणे आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे वृत्तपत्रीय पत्रांचे प्रमाण कमी झाले असून स्वरूपही बदलले आहे. तरीही समाजमन समजून घेण्यासाठी वाचकांची पत्रे हे महत्त्वाचे माध्यम असते. अशी पत्रे लिहिणाऱ्या लेखकांचे संघ मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. छोट्या शहरांमध्ये मात्र पत्रलेखन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त होत नाहीत. मुळातच पत्र लिहिणे ही एक कला असून मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्येही ही अभिव्यक्ती वाढीला लागावी, या उद्देशाने विश्व संवाद केंद्रातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे श्री. भोंदे यांनी सांगितले.
                कार्यशाळा तीन तासांची असेल. त्यामध्ये व्हॉट्स अपसारख्या समाजमाध्यमांवर व्यस्त असणाऱ्या आजच्या पिढीतील तरुण-तरुणींबरोबरच अनुभवी आणि समाजहितैषी ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाईल. पत्रकारिता म्हणजे काय, वाचकांची पत्रे मोजक्या शब्दांत कशी लिहावीत आणि ब्लॉग, ट्विटर, फेसबुकसारख्या प्रभावी समाजमाध्यमांवर नेमकेपणाने कसे लिहिता येईल, याविषयीचे प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल.
                तरुण-तरुणी, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच कार्यशाळेत प्रवेश खुला आहे. सहभागासाठी इच्छुकांनी प्रशांत कदम (मोबाइल ७७६८०७४२०१) किंवा रवींद्र भोवड (९१५८१३५८८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.........