Sunday 17 April 2016

संस्कृत भाषेच्या नव्हे, भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न हवेत – पंडित धायगुडे


            रत्नागिरी  : पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे भारतीय संस्कृती विसरली गेली आहे. अशा वेळी केवळ संस्कृत भाषा टिकवून ठेवण्यासाठी नव्हे, तर भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मत प्रतिपादन पुण्यातील पंडित शिवराम कृष्ण धायगुडे यांनी येथे व्यक्त केले.
संस्कृत पाठशाळा शतक महोत्सवात बोलताना नगराध्यक्ष महेंद्र मयेकर.
येथील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे, विनायक पोखरणकर गुरुजी, धनंजय चितळे आदी उपस्थित होते. श्री. धायगुडे यांनी पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्यामुळे भारतीय संस्कृती कशी बिघडली आहे, यावर  प्रकाश टाकला. आपण लोकशाहीत राहत असलो, तर आपणच चांगले बदल घडवले पाहिजेत. शब्द म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द हे वाहक आहेत. त्यांचा उपयोग करून ज्ञान मिळविले पाहिजे. म्हणूनच भाषेवर नव्हे तर संस्कारांवर प्रेम करावे. संस्कृती शिकवणारी भाषा म्हणजे संस्कृत. त्यासाठी पाठशाळेचा उपयोग करून घ्यावा. संस्कृती टिकवली तरच राष्ट्र टिकू शकते. संस्कृतीचे रक्षण करायचे असेल तर आपणच पुढे आले पाहिजे. इंग्रजांनी भारतीय संस्कृतीचा बुरखा घेऊन भारतीय संस्कृती बुडवायचा प्रयत्न केला. त्याची सुरवात १८३४ साली मॅक्समुल्लरने सुरू केलेल्या नव्या शिक्षणपद्धतीमुळे झाली. ते इंग्रजांचे षड्यंत्रच होते. स्वातंत्र्य मिळाले, तरी आपण भारतीय झालो नाही. त्यामुळेच संस्कारहीनता निर्माण झाली असून अनाचार वाढले आहेत. ही स्थिती बदलायची असेल, तर केवळ संस्कृत भाषेचे नव्हे, भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. भारतात पूर्वी दोन हजार संस्कृत पाठशाळा होत्या. पाठशाळा या प्रयोगात्मक शिक्षण देतात. मात्र ब्रिटिशांनी या शाळा बंद पाडून पाश्चिमात्य संस्कृती येथे रुजवली. यामुळेच आपण बिघडलो आहोत. संस्कृती शिकण्यासाठी पाठशाळांचा उपयोग करून घेतला पाहिजे. या पाठशाळांचे जतन केल्यास शतक महोत्सवच नव्हे तर सहस्र महोत्सवही साजरा करता येईल.
        
              यावेळी माजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. (कै.) पुरुषोत्तमशास्त्री फडके, बाळकृष्ण हर्डीकर आणि कै. दा. गो. जोशी या माजी शिक्षकांच्या वतीने अनुक्रमे आशा गुर्जर, विजय हर्डीकर आणि विजयानंद जोशी यांनी पुरस्कार स्वीकारला. माधव जोशी, अच्युत फडके, मनोहर फडके, कीर्तनकार नाना जोशी, अनंत मराठे, सुनील भाटवडेकर, महेश बोंडाळे, प्रकाश साधले, श्री. कापरे, पद्मनाभ जोशी, श्रीकृष्ण पाध्ये, प्रवीण पाटणकर, श्रीपती सिधये, चंद्रकांत नामजोशी, दिनकर सायनेकर, गजानन हर्डीकर हे माजी विद्यार्थी आणि संस्कृत अध्यापिका मधुरा बोंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. देणगीदार राजाराम प्रभुदेसाई यांच्या वतीने डॉ. शरद प्रभुदेसाई, दिलीप वैद्य, बापू जोशी, बाळासाहेब पित्रे, सौ. नीला भिडे या देणगीदारांचाही सत्कार केला.
            शतक महोत्सवानिमित्त काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन श्री. धायगुडे यांनी केले. त्यानंतर सीए ऋषीकेश फडके, स्मरणिकेसाठी मदत करणारे संतोष खडपे आणि ज्ञानेश्वर मुद्रणालयाचे दादा जोशी यांचा सत्कार केला. सौ. निशा काळे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकृष्ण जोशी यांनी प्रास्ताविकात शाळेची माहिती दिली.
           संस्कृत पाठशाळेत सर्वांनी यावे, असे आवाहन अध्यक्षीय भाषणात वैद्य रघुवीर भिडे यांनी केले. पद्मनाभ जोशी यांनी आभार मानले.
  नगराध्यक्ष श्री. मयेकर म्हणाले, रत्नागिरी शहराची शान वाढवणाऱ्या या संस्कृत पाठशाळेला पालिकेकडून दोन लाख रुपयांचा निधी दिला आहे. या पाठशाळेत ब्राह्मण विद्यार्थीच येतात, असा गैरसमज आहे. मात्र येथे आल्यानंतर मला संस्कृतबद्दल प्रेम व आकर्षण वाटू लागले आहे. परदेशी लोक संस्कृत शिकून येथे येत आहेत. आपण मात्र संस्कृतकडे दुर्लक्ष करत आहोत. भारतात नावलौकिक होईल, असे विद्यार्थी या शाळेतून घडावेत, याच सदिच्छा.
................

Saturday 16 April 2016

रत्नागिरीत ३० एप्रिलला सिटिझन जर्नालिझम कार्यशाळा



रत्नागिरी  : मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे येत्या ३० एप्रिल रोजी रत्नागिरीत सिटिझन जर्नालिझमविषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण भोंदे यांनी आज (दि. १६ एप्रिल) रत्नागिरीत ही माहिती दिली.
                सामाजिक समस्या सोडविणे हे पत्रकारितेचे प्रमुख कार्य असते. संपादकीय आणि अन्य लेखांमधून वृत्तपत्रे तसेच अलीकडच्या काळात विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमधून विविध समस्या, घटना-घडामोडींविषयी भाष्य केले जाते. सामान्य वाचकही त्याबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया वृत्तपत्रांमधील वाचकांच्या पत्रांमधून व्यक्त करत असतो. अनेक सजग वाचक पत्रांमधून समस्या मांडतात. तसेच अग्रलेख आणि लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अलीकडे वृत्तपत्रांची बदललेली संपादकीय धोरणे आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे वृत्तपत्रीय पत्रांचे प्रमाण कमी झाले असून स्वरूपही बदलले आहे. तरीही समाजमन समजून घेण्यासाठी वाचकांची पत्रे हे महत्त्वाचे माध्यम असते. अशी पत्रे लिहिणाऱ्या लेखकांचे संघ मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये कार्यरत आहेत. छोट्या शहरांमध्ये मात्र पत्रलेखन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे प्रतिक्रिया व्यक्त होत नाहीत. मुळातच पत्र लिहिणे ही एक कला असून मुंबईसारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच छोट्या शहरांमध्येही ही अभिव्यक्ती वाढीला लागावी, या उद्देशाने विश्व संवाद केंद्रातर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे श्री. भोंदे यांनी सांगितले.
                कार्यशाळा तीन तासांची असेल. त्यामध्ये व्हॉट्स अपसारख्या समाजमाध्यमांवर व्यस्त असणाऱ्या आजच्या पिढीतील तरुण-तरुणींबरोबरच अनुभवी आणि समाजहितैषी ज्येष्ठ नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाईल. पत्रकारिता म्हणजे काय, वाचकांची पत्रे मोजक्या शब्दांत कशी लिहावीत आणि ब्लॉग, ट्विटर, फेसबुकसारख्या प्रभावी समाजमाध्यमांवर नेमकेपणाने कसे लिहिता येईल, याविषयीचे प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाईल.
                तरुण-तरुणी, पत्रकार आणि ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच कार्यशाळेत प्रवेश खुला आहे. सहभागासाठी इच्छुकांनी प्रशांत कदम (मोबाइल ७७६८०७४२०१) किंवा रवींद्र भोवड (९१५८१३५८८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.........

Friday 15 April 2016

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाची शनिवारी चतुःषष्टी राजोपचार पूजन



रत्नागिरी  :  मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने उद्या (दि. १६) चतुःषष्टी राजोपचार पूजन होणार आहे.
पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचा गाभारा, कळस आणि मंडपाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा पहिला वर्धापनदिन शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. षोडशोपचार पूजनानंतर राजोपचार पूजा केली जाते. त्यामध्ये मंगलाचरण, गायन, कीर्तन, नाट्य आदी कलांचा आविष्कार, तसेच छत्र, चामरांसह हत्ती, घोडे, रथातून मिरवणूक काढली जाते. पूर्वी राजेरजवाडे आणि संस्थानिकांकडे असे पूजन केले जात असे. आता दुर्मिळ झालेल्या राजोपचाराद्वारे पल्लीनाथाचे पूजन केले जाणार आहे.
वर्धापनदिनानंतर दुसऱ्या दिवशीपासून सहा दिवस पल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यासाठी पंचायतन याग, सौरयाग, मंत्रजागर, रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार,  दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम तसेच कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रमा आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील संस्कृत पाठशाळेचा रविवारपासून शतक महोत्सव



रत्नागिरी :  रत्नागिरीतील गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा शतक महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या रविवारपासून (दि. १७ एप्रिल) करण्यात आले आहे. पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष वैद्य रघुवीर भिडे यांनी आज (दि. १५ एप्रिल) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
रत्नागिरीच्या वेदशाळेत १९१४ साली पाठशाळेची सुरवात झाली. गोविंद कृष्ण रानडे यांच्या भरीव देणगीतून विश्वस्त मंडळाने २२ जून १९१६ रोजी संस्कृत पाठशाळेची रीतसर नोंदणी केली. त्याला शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता सत्कार समारंभ, स्मरणिका प्रकाशन आणि निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर आणि पुण्यातील संस्कृत विद्वान पं. शिवराम कृष्ण धायगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. सायंकाळी ६ वाजता चिपळूणचे धनंजय चितळे यांचे भाषासु मुख्या मधुरा या विषयावर प्रवचन होईल. सोमवारी (दि. १८ एप्रिल) सकाळी वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, सायंकाळी ५ वाजता हभप प्रा. नरहर चिंतामणी अपामार्जने यांचे कीर्तन होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपरंपरेनुसार बाळशास्त्री गाडगीळ, व्याकरणाचार्य पुरुषोत्तम नारायण फडके, व्याकरणरत्न बाळकृष्णशास्त्री हर्डीकर, काव्यतीर्थ दामोदर गोपाळ जोशी, काव्यतीर्थ विनायक नारायण पोखरणकर इत्यादी विद्वानांनी पाठशाळेत संस्कृत अध्यापन केले. कालौघात गुरुपरंपरा आणि संस्कृतचे अध्यापनही पाठशाळेत होत नाही. मात्र पाठशाळेच्या शतकोत्सवाच्या औचित्याने संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. शाळामहाविद्यालयांमध्ये मराठी माध्यमातून संस्कृत शिकविले जाते. अभ्यासक्रमानुसार प्रश्नोत्तरेही मराठीतच दिली जातात. त्यामुळे हमखास गुण मिळवून देणारा विषय एवढेच संस्कृतचे महत्त्व राहिले आहे. परिणामी मूळ संस्कृत ग्रंथ वाचले आणि अभ्यासले जात नाहीत. त्यासाठी पाठशाळेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत. मूळ संस्कृत भाषेचे ज्ञान घेण्याची प्रवृत्ती वाढावी, यासाठी हे प्रयत्न असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. पाठशाळेत जुने २०० संस्कृत ग्रंथ असून त्यापैकी सुमारे ५० ग्रंथ दुर्मिळ आणि जीर्ण झाले आहेत. त्या सर्वांचे डिजिटायझेशन केले जाणार आहे. त्या सर्व प्रकल्पांसाठी संस्कृतप्रेमींनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
पत्रकार परिषदेला प्रा. कल्पना आठल्ये आणि श्री. श्रीकृष्ण जोशी उपस्थित होते.

Sunday 10 April 2016

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव १७ पासून


       रत्नागिरी :  मठ (ता. लांजा) येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा शतकोत्सवी चैत्रोत्सव येत्या १७ एप्रिलपासून सुरू होत असून तो २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे.
लक्ष्मीपल्लीनाथ हे जागृत देवस्थान असून तो चाळीस कुळांचा स्वामी आहे. मूळ मंदिरात सेवा करताना येणाऱ्या अडचणींमुळे पल्लीनाथाच्या कुलोपासकांनी मठ येथे दोन एक जागा घेऊन तेथे चार वर्षांपूर्वी स्वतंत्र मंदिर उभारायचे ठरविले. त्यानुसार मंदिराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मंदिराचा गाभारा म्हैसूरमधील ग्रॅनाइटमध्ये, तर रेखीव कळसाचे काम कोकणातील जांभ्या दगडात करण्यात आले आहे. गेल्या मंदिरात पंचकुंडी यज्ञासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराचा वर्धापनदिन १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे.
पल्लीनाथाचा चैत्रोत्सव १९१५ साली सुरू झाला. यावर्षी उत्सवाचा शतकोत्सव साजरा होत आहे. त्यासाठी पंचायतन याग आणि चतुःषष्टी राजोपचार पूजा केली जाणार आहे. रविवारी (ता. १७) सौरयाग आणि मंत्रजागराने उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी रुद्रस्वाहाकार, गणेशयाग, लघुविष्णु स्वाहाकार, दत्तयाग आणि नवचंडी असे धार्मिक कार्यक्रम आणि २२ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता स्वप्नील गोरे (सावंतवाडी) यांचा अभंग आणि नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल. उत्सवकाळात रात्री कैलासबुवा खरे (रत्नागिरी) आणि मकरंदबुवा रामदासी (पुणे) यांची कीर्तने होणार आहेत. शास्त्र काय सांगते या विषयावर १९ एप्रिल रोजी विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) यांचे प्रवचन होणार आहे. अखेरच्या दिवशी २३ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता मकरंदबुवा रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.
      चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
      उत्सवकाळात निवासाची व्यवस्था, वैयक्तिक श्रीपूजा, अभिषेक, लघुरुद्र आदी उपासना कार्यक्रमासाठी उत्सवापूर्वी किमान आठ दिवस संपर्क साधावा. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. : (०२३५२) २४९०११, २४९३६४. मोबाइल क्र. – ९४२२६४६७६५, ७८७५८९३२९, ७८७५९९३६९९.