Sunday 2 August 2015

लोकमान्य टिळकांनी मराठी गद्याला आधुनिक बनवले

गीतारहस्य चर्चासत्रातील डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण

रत्नागिरी - ``लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहून मराठी गद्य साहित्याला आधुनिक बनवले``, असे मत घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
गीतारहस्य ग्रंथाच्य शताब्दीनिमित्ताने आयोजित चर्चासत्राचे बीजभाषण करताना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे. शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये, बापू काणे, अॅड. मिलिंद पिलणकर
लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या `गीतारहस्यया ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (1 ऑगस्ट) सुरू झाले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच कोकण विभाग आणि गीता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गीता भवनमध्ये झाला. या चर्चासत्राचे बीजभाषण डॉ. मोरे यांनी केले. लीळाचरित्राचा अपवाद वगळला, तर गीतारहस्यापूर्वी सहाशे वर्षांहून अधिक काळ मराठीतले सर्व साहित्य पद्यातच लिहिले गेले, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ``पारतंत्र्यातील मराठी समाजाला कार्यप्रवण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी `गीतारहस्यचे लेखन केले. महाराष्ट्राच्या वैचारिक विकासातला `गीतारहस्यहा फार मोठा टप्पा असून मराठी भाषा घडवण्यातसुद्धा त्याचा मोठा वाटा आहे. 1915 मध्ये लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ छापला. त्याला 100 वर्षे पूर्ण होत आहे. महाराष्ट्राच्या लोकांना भगवद्गीता कळावी म्हणून टिळकांनी गीतारहस्य लिहिले. गीतारहस्य हे मराठी भाषेला मिळालेले फार मोठे योगदान आहे. त्यावेळी लोकांना अल्प दरात ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी टिळकांनी विशेष प्रयत्न केले. आधुनिक गद्यलेखनाचा वस्तुपाठ या ग्रंथाने दिला.``
     
पगडी घालून डॉ. मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
``यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने टिळकांच्या जन्मभूमीत हे चर्चासत्र आयोजित करून मोठे औचित्य साधले आहे. यानिमित्ताने यशवंतरावांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळात ब्राह्मणेतर चळवळ जोरात होती. खुद्द यशवंतरावांचे मोठे बंधू त्या चळवळीत अग्रस्थानी होते. यशवंतराव मात्र टिळकांना मानणारे होते. त्यांनी या चळवळीबाबत आणि टिळकांबाबत स्वतंत्र विचार केला होता.``
मराठीतील सर्वांत पहिला मोठा ज्ञानेश्वरी हा पद्यात्मक ग्रंथ भगवद्गीतेवर आधारित होता, तर सर्वांत मोठा गीतारहस्य हा गद्यग्रंथही गीतेवरच आधारित आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, ``मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांमध्ये कृष्णाच्या रासलीलांवर गीते लिहिली गेली. मराठीने मात्र कृष्णाच्या तत्त्वज्ञानाला प्राधान्य दिले, हे ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्याच्या लेखनातून स्पष्ट झाले. भगवद्गीता हा लोकमान्यांच्या चिंतन-मननाचा भाग होता. लहानपणी वडिलांच्या आजारपणात त्यांना वाचून दाखविताना त्यांची भगवद्गीता मुखोद्गत झाली. त्यानंतरच त्यांचे गीतेविषयीचे चिंतन सुरू झाले. जानेवारी 1902 मध्ये त्यांनी नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर सर्वप्रथम गीतेवर भाषण केले, तर 1904 साली संकेश्वर मठात शंकराचार्यांसमोर गीतेविषयीचे आपले विचार मांडले. मंडालेच्या तुरुंगात असताना केवळ पेन्सिलने त्यांनी हा ग्रंथ लिहिला. याचवेळी ते तुरुंगात जर्मन, फ्रान्स आणि पाली भाषा शिकले. मोठ्या चिंतनातून त्यांनी हा ग्रंथ साकार केला. त्यामुळे त्यांना गीतेचे भाष्यकार म्हणून मान्यता मिळाली. सामान्य लोक तर त्यांना भगवान टिळक म्हणूनच ओळखू लागले होते. आगरकरांसारखे विद्वान जॉन स्टुअर्ट मिल, स्पेन्सरसारख्या पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांचे सुखदायी नीतिशास्त्र मांडत असताना टिळकांनी मात्र गीतेच्या आधारे भारतीय नीतिशास्त्र श्रेष्ठ असल्याचे वारंवार ठामपणे सांगितले. गीता म्हणजे निवृत्ती सांगणारा नव्हे, तर कर्म करा, असे सांगणारा ग्रंथ आहे, हेच त्यांनी गीतारहस्यातूनही पटवून दिले. त्या काळात एकाच वेळी टिळकांना गीतेतील कर्मसंन्यासाचा पारंपरिक विचार मांडणारे, पाश्चात्त्य विचारांचा पुरस्कार करणारे आणि पारंपरिक विचार कालबाह्य झाल्याचे सांगणारे अशा तिहेरी विचारसरणीचा प्रतिकार करून वेगळा विचार मांडायचा होता. तो त्यांनी गीतारहस्यातून मांडला. ज्ञान मिळविण्यासाठी कर्म करावे आणि ज्ञानप्राप्तीनंतर संन्यास घ्यावा, असे विचार शंकराचार्य मांडत असताना ज्ञानपूर्व आणि ज्ञानोत्तरही कर्मच करत राहण्याचा उपदेश भगवद्गीतेने कसा केला आहे, हे टिळकांनी पटवून दिले.``
चर्चासत्राला उपस्थित श्रोते
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश जोशी, डॉ. कल्याण काळे, प्रतिभा बिवलकर, डॉ. विद्याधर करंदीकर, डॉ. शं. रा. तळघट्टी, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष राजाभाऊ लिमये, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
गीतारहस्य चर्चा हा बौद्धिक पातळीवरचा कार्यक्रम असल्याचे डॉ. सुरेश जोशी यांनी सांगून कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ लिमये यांनी केले. यशवंतरावांना टिळकांबद्दल आदर होता. म्हणूनच त्यांच्या नावाच्या प्रतिष्ठानमार्फत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. टिळकांचे पणतू आणि `केसरी`चे सध्याचे संपादक दीपक टिळक यांनी मात्र या चर्चासत्राच्या बाबतीत कोणताच प्रतिसाद दिला नाही, अशी खंत राजाभाऊंनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सदानंद मोरे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सौ.निशा काळे यांनी केले, तर विनायक हातखंबकर यांनी आभार मानले.
...............
चर्चासत्राला उपस्थित राहण्यापूर्वी साहित्य संमेलनाध्यक्षांनी लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्ताने आदरांजली वाहिली.
-----------------------------------------------------



आजच्या काळात गीतारहस्याच्या तत्त्वज्ञानाची अधिक गरज

दा. कृ. सोमण – गीतारहस्य ग्रंथावरील चर्चासत्राचा रत्नागिरीत समारोप

चर्चासत्राच्या समारोप सत्रात बोलताना खगोल अभ्यासक
दा. कृ. सोमण. व्यासपीठावर डॉ. सुरेश जोशी, पद्मश्री
मधू मंगेश कर्णिक, प्रकाश काणे
रत्नागिरी - ``निद्रिस्त समाजाला जागृत करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी शिस्त आणि जबाबदारीचा अभाव असलेल्या आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची अधिक गरज आहे``, असे मत पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळाने आयोजित केले होते. चर्चासत्राच्या समारोप सत्रात श्री. सोमण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर चर्चासत्राचे समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे उपस्थित होते. श्री. सोमण पुढे म्हणाले, ``गीतारहस्यावर शताब्दीच्या निमित्ताने दोन दिवस चर्चा झाली. अशा तऱ्हेची चर्चा महाराष्ट्रात सर्वप्रथम रत्नागिरीत झाली. वास्तविक ती टिळकांच्या कर्मभूमीत म्हणजे पुण्यात व्हायला हवी होती. हा ग्रंथ निवृत्तीचा नव्हे, तर सतत कार्यरत राहण्याचा संदेश देतो. म्हणूनच निवृत्तीच्या काळात नव्हे, तर तरुणांनी वाचायचा हा ग्रंथ आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीटंचाई, औद्योगिक प्रश्नांबाबत पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करायला हवे. मात्र ज्ञानाच्या अभिवृद्धीकडे प्राध्यापक लक्ष देत नाहीत, असे टिळकांनी म्हटले होते. त्यांचे ते विधान आजही खरे आहे. त्यामुळे आजचा समाज कोणीतरी अवतार घेईल आणि आपला उद्धार करील, म्हणून वाट पाहतात. बोगस महाराज आणि भोंदू साधू गल्लोगल्ली निर्माण होत आहेत. समाज त्यांच्या भजनी लागत आहे. खरा ईश्वर लोकांनी ओळखलाच नाही. अशा स्थितीत समाजात शिस्त आणि जबाबदारीचा अभाव जाणवतो. यावेळी वर्तमानात जगा, सतत कार्यरत राहा, असा संदेश देणाऱ्या लोकमान्यांच्या गीतारहस्याच्या अभ्यासाची आणि अनुकरणाची खरी गरज आहे.``
समारंभात मधू मंगेश कर्णिक, श्री. सोमण यांचा पगडी देऊन सत्कार करण्यात आला. समन्वयक प्रा. डॉ. सुरेश जोशी यांनी चर्चासत्राच्या आयोजनाचा हेतू साध्य झाल्याचे सांगितले. निबंध स्पर्धेतील बक्षिसाचे वितरण करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश काणे यांनी आभार मानले. यावेळी विनायक हातखंबकर, कृ. आ. पाटील, चंद्रमोहन देसाई यांच्यासह चर्चासत्राच्या आयोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.............

समारोप सत्रात बोलताना पद्मश्री मधू मंगेश कर्णिक.
शेजारी डॉ. जोशी, श्री. सोमण, श्री. काणे

चर्चासत्र म्हणजे राष्ट्रीय भावना - कर्णिक

``लोकमान्य टिळक आणि त्यांनी लिहिलेले गीतारहस्य लोकोत्तर आहेच, पण या ग्रंथाविषयीच्या चर्चासत्राचे आयोजन म्हणजे ऱाष्ट्रीय भावना आहे. या चर्चासत्रातून जिज्ञासा जागृत होते आणि जिज्ञासा ज्ञानापोटी जन्माला येते``, अशा शब्दांत पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी अध्यक्षीय समारोपात चर्चासत्राच्या आयोजनाचा गौरव केला. ते म्हणाले, ``लोकमान्यांनी मंडाले येथील तुरुंगात गीतारहस्याचे लेखन केले. त्यामुळे त्यांना झालेला तुरुंगवास ही इष्टापत्तीच होती, असे म्हणावे लागेल. परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. इतरांपेक्षा भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हेच त्यांनी सिद्ध केले. ते करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला पोषक अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. ``

गीतेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास लोकमान्यांनी प्रवृत्त केले

गीतारहस्य चर्चासत्र


श्रीराम शिधये – पहिल्या दिवशी शं. रा. तळघट्टी, डॉ. कल्याण काळे यांचेही निबंधवाचन


 रत्नागिरी - ``ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा उत्तम मेळ साधूनच श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले. तेच गीतेचे रहस्य असून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना लोकमान्यांनी भारतीय जनतेला ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले``, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये यांनी व्यक्त केले.

  लोकमान्य टिळक आणि गीतारहस्याविषयी
विचार मांडताना श्रीराम शिधये
टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत शनिवारी (ता. १) सुरू झाले. चर्चासत्राचा प्रारंभ घुमान येथील अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या बीजभाषणाने झाला. त्यानंतर श्री. सिधये यांनी `लोकमान्य टिळक आणि गीतारहस्य` या विषय़ावरचा आपला निबंध सादर केला. ते म्हणाले, ``टिळकांच्या विचारधारेला तत्त्वज्ञानाची पक्की बैठक होती. अव्वल इंग्रजी अमदानीत कायद्याची परीक्षा देणाऱ्या टिळकांनी इंग्रजी माणसाची वृत्ती आणि मनोधारणा पक्की ओळखली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचे पक्के आराखडे त्यांनी मनाशी बांधले होते. त्यांच्या आणि तत्कालीन भारतीय राजकारणाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्या आयुष्याचे तीन कालखंड दिसतात. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय वाटचाल करताना सोळाव्या वर्षापासून भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा त्यांनी केलेला अभ्यासही त्यांच्या कामी आला. त्यातूनच सहा वर्षांचा मंडालेच्या तुरुंगातील शिक्षेचा काळ त्यांना गीतारहस्य लिहिण्यास उपयुक्त ठरला.`` टिळकांची भाषणे, सामाजिक उपक्रम आणि राजकीय चळवळींचा मागोवाही श्री. शिधये यांनी घेतला. गीतेचे तत्त्वज्ञानच त्यांना वेळोवेळी अंगीकारल्याचे दिसते, असेही ते म्हणाले. वैज्ञानिक प्रगती आणि भोगवादामुळे निर्माण होणारा संदेह दूर करण्यासाठी टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
`आद्य शंकराचार्य आणि टिळक` या विषयावरील निबंध प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी सादर केला. ते

प्रा. डॉ. शं. रा. तळघट्टी यांनी शंकराचार्य आणि
टिळकांची तुलना करणारे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी

म्हणाले, ``आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांच्या गीतेविषयीच्या भूमिका परस्परविरोधी असल्याचे मानले जाते. प्रत्यक्षात गीतेतील तत्त्वज्ञानाकडे पाहण्याच्या दोघांच्याही भूमिका परस्परपूरकच आहेत. मात्र गीतेच्या प्रयोजनासंबंधी दोघांची मते भिन्न आहेत. मोक्ष म्हणजेच निवृत्ती हेच गीतेचे प्रयोजन आहे, असे शंकराचार्यांचे मत आहे, तर टिळकांच्या मते कर्मयोगस्वरूपाच्या धर्म या पुरुषार्थाची सिद्धी म्हणजेच प्रवृत्ती हाच गीता सांगण्याचा उद्देश आहे. गीतेचा व्यावहारिक उपयोग टिळकांनी सांगितला, जो आजही कर्माला म्हणजेच कार्य करत राहण्याला प्रवृत्त करतो.`` शंकराचार्य, टिळक, समर्थ रामदासांचे विविध दाखले देऊन त्यांनी आपल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण केले.
डॉ. कल्याण काळे यांना पगडी घालून सत्कार करताना
प्रा. चंद्रमोहन देसाई. शेजारी प्रा. डॉ. सुरेश जोशी
अखेरच्या सत्रात डॉ. कल्याण काळे यांनी `कर्मविपाक आणि कर्मयोग` या विषयावरचा निबंध सादर केला. जातीधर्म, पुरुष-स्त्री अशी मानवी जीवनातील विविध प्रकारची विषमता दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यांचा चांगला परिणाम होत असला, तरी शारीरिक व्यंगे, आर्थिक दैन्य, आकस्मिक संकटे इत्यादींमुळे होणारी सुखदुःखाची विषमता दूर करता येत नाही. अशा वेळी भारतीय लोक पूर्वजन्माशी आणि आपल्या कर्माशी त्याचा संबंध लावतात. चुकांची पुनरावृत्ती टाळतात. सावधानता बाळगतात. यातील वस्तुस्थितीचा अभ्यास टिळकांनी गीता, महाभारत, मनुस्मृती आणि वेदवाङ्मयाचा शोध घेऊन केल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. माणसाने केलेल्या कर्माचे फळ म्हणजे कर्मविपाक असे स्पष्ट करून त्यांनी याबाबत गीतेतील तत्त्वज्ञान टिळकांनी सोपे करून सांगितल्याचे नमूद केले. पापपुण्याच्या कल्पना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म, कर्माचे फळ इत्यादींची माहिती देऊन सविस्तर विवेचन त्यांनी केले.
.................

Saturday 1 August 2015

मुलांवर गीतेचे संस्कार होण्यासाठी `झोंपाळ्यावरची गीता`

सदानंद मोरे – रत्नागिरीत 98 व्या वर्षी पुनर्प्रकाशन

रत्नागिरी - ``मुलांवर गीतेचे संस्कार लहान वयातच व्हावेत, यासाठी कवी अनंततनय यांनी `झोंपाळ्यावरची गीता` लिहिली. दोनच वर्षांनी शंभर वर्षे पूर्ण करणार असलेली ही गीता पुन्हा एकदा चांगले औचित्य साधून प्रसिद्ध होत आहे. ते उपयुक्त आहे``, असे प्रतिपादन घुमान येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
`झोपाळ्यावरची गीता`चे प्रकाशन करताना साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे.
सोबत (डावीकडून)  प्रकाशक प्रमोद कोनकर, प्रा. डॉ. सुरेश जोशी, राजाभाऊ लिमये,
प्रकाश (बापू) काणे, 
अॅड. मिलिंद पिलणकर
दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ कवी अनंततनय यांनी १९१७ साली लिहिलेल्या झोंपाळ्यावरची गीता` या श्लोकसंग्रहाचे पुनर्प्रकाशन शनिवारी (ता. 1) रत्नागिरीत झाले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळातर्फे सुरू झाले. तेच औचित्य साधून झोपाळ्यावरच्या गीतेचे पुनर्प्रकाशन श्री. मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ``दत्तात्रेय आपटे हे लोकमान्य टिळकांच्या अऩुयायांपैकी एक होते. त्यांनी लोकमान्यांचे ओवीबद्ध चरित्रही लिहिले. त्याचा दुसरा भाग मात्र प्रसिद्ध होऊ शकला नाही. लोकमान्यांचे गीतारहस्य 1915 साली प्रसिद्ध झाले. गीतारहस्य छापले गेल्यानंतर गीता हा महाराष्ट्रात चर्चाविषयाचा केंद्रबिंदू झाला. सगळीकडे लोक चर्चा करू लागले. टिळकभक्त अनंततनयांनाही गीतेविषयी काही लिहावे, असे वाटले आणि दोनच वर्षांनी 1917 मध्ये त्यांनी झोंपाळ्यावरची गीता लिहिली. मुळात झोपाळ्यावरची गीता म्हणजे काय, हे समजायला हवे. प्रत्यक्ष गीतेचे संस्कार लहनापणापासूनच मुलांवर व्हायला हवेत, असे त्यांना वाटले. मुलांवर आईच संस्कार करू शकते. पण आईला तरी गीता माहीत व्हायला हवी, हे लक्षात घेऊन त्यांनी त्या काळच्या महिला सीता गीताप्रमाणे ओव्या म्हणत, त्या पद्धतीने गीतेतील श्लोकांचा अर्थ लावला. त्याकाळचा हा वेगळा प्रयोग होता. झोपाळ्यावर झोका घेता घेता विशेषतः महिलांना गीतेचे तत्त्वज्ञान सांगता आले पाहिजे, यासाठी महिलवर्ग आणि मुलींना पुढे ठेवून झोपाळ्यावरची गीता त्यांनी लिहिली.``

मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आणि पुण्यातील पत्रकार अनिकेत कोनकर यांनी हे संकलन केले असून रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली आहेतरुण वयातच गीतेविषयीचे संकलन करावेसे वाटणाऱ्या अनिकेतचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असेही ते म्हणाले.


...............


Friday 31 July 2015

लोकमान्यांच्या गीतारहस्यावर रत्नागिरीत आजपासून चर्चासत्र

रत्नागिरी - लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या गीतारहस्य या ग्रंथाला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देणारे दोन दिवसांचे चर्चासत्र रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे. लोकमान्यांच्या ९५ व्या पुण्यतिथीच्या दिवशी उद्या ता. १) ते सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी चर्चासत्राचा समारोप होईल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभाग आणि गीता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल. दरम्यान, चर्चासत्राला प्रारंभ होण्यापूर्वी आयोजित केलेली शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे.
प्रा. डॉ. सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता सुरू होणाऱ्या या चर्चासत्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे बीजभाषण होईल. उद्या श्रीराम सिधये (लोकमान्य टिळक आणि गीता), डॉ. शं. रा. तळघट्टी (आद्यशंकराचार्य आणि लोकमान्य टिळक),  डॉ. कल्याण काळे (कर्मविपाक आणि कर्मयोगसिद्धांत) यांचे निबंधवाचन होईल. रविवारी (ता. २) धनंजय चितळे (गीतारहस्यातून दिसणारे अभ्यासक टिळक), प्रतिभा बिवलकर (कर्मयोगशास्त्र), डॉ. विद्याधर करंदीकर (वर्णाश्रमव्यवस्था आणि पुरुषार्थ विचार) निबंध सादर करतील. दुपारी २ वाजता दा. कृ. सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सत्र सुरू होईल. ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक अध्यक्षस्थान भूषवितील. चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध, भित्तिचित्र स्पर्धांचा निकाल

दरम्यान, चर्चासत्राच्या निमित्ताने आयोजित केलेल्या निबंध आणि भित्तिचित्र स्पर्धांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. निबंध स्पर्धेतील अनुक्रमे विजेते आणि बक्षिसे अशी - खुला गट (विषय - लोकमान्य टिळकांचे लेखन आणि संशोधन) – माधव अंकलगे (वाटद-खंडाळा, रत्नागिरी, 750 रुपये), गणेश देवजी मुळ्ये (तानाजीराव चोरगे अध्यापक महाविद्यालय, मांडकी-पालवण, चिपळूण, 500 रुपये), प्रा. सौ. मानसी मंगेश चव्हाण (गांधी-कीर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी, 300 रुपये). उच्च माध्यमिक गट – (विषय - गीतेचे महत्त्व आणि लोकमान्य टिळकांची भूमिका) – सिद्धराज सुधाकर गंगावणे (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, 500 रुपये), मुस्कान अल्ताफ पकाली (विजू नाटेकर कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी, 300 रुपये), स्नेहल प्रल्हाद बोरकर (विजू नाटेकर, रत्नागिरी, 200 रुपये). स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्घाटन समारंभात होईल. लोकमान्य टिळक जीवनदर्शन या विषयावरील भित्तिचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण चर्चासत्राच्या सांगता समारंभात होणार असून या स्पर्धेतील तिन्ही विजेते रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांची नावे आणि बक्षिसे अशी – स्वरूप संदीप जोशी (300 रुपये), नीलाक्षी सचिन पवार (200 रुपये), साक्षी संदीप बेलवलकर (100 रुपये).


‘झोंपाळ्यावरची गीता`चे आज रत्नागिरीत पुनर्प्रकाशन

रत्नागिरी - दत्तात्रेय अनंत आपटे ऊर्फ कवी अनंततनय यांनी १९१७ साली लिहिलेल्या झोंपाळ्यावरची गीता` या श्लोकसंग्रहाचे उद्या (ता. १) रत्नागिरीत ९८ वर्षांनी पुनर्प्रकाशन होणार आहे.
लोकमान्य टिळक यांचे सकालीन असलेले कवी अनंततनय (जन्म १८७९, मृत्यू १९२९) यांनी हृदयतरंग, पद्यदल, बालगीता, श्रीशारदादूतिका, पुण्याची पर्वती, कविचरित्र अशी विविध प्रकारची काव्यरचना केली. सनातन धर्माचे स्वरूप, काव्यचर्चा, विनायकाची कविता अशा विविध ग्रंथांचे संपादन आणि संकलनही त्यांनी केले. श्री हाराष्ट्र शारदामंदिर` या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. काही बंगाली गीतांचीही त्यांनी राठीत भाषांतरे केली. मूळच्या संस्कृतधील गीतगोविंद` या कृष्णकाव्याच्या बंगालीतील अनुवादाचा अनंततनयांनी राधामाधवविलास` नावाने राठीत अनुवाद केला. कवी केशवसुतांना राठीच्या नवकवितेचे जनक म्हटले जाते. शंभर वर्षांनंतरही त्यांचे राठी वाङ्यातील स्थान अढळ आहे; मात्र अनंततनय यांनी नवकवितेला कडाडून विरोध केला होता.
झोंपाळ्यावरची गीता` ही अनंततनय यांचीच रचना आहे. या श्लोकसंग्रहात भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचा आशय असलेले श्लोक त्यांनी राठीत लिहिले आहेत. मूळ भगवद्गीतेतील श्लोकांची संख्या ७०० असून `झोपाळ्यावरच्या गीतेध्ये ५४६ श्लोक आहेत. श्लोकांची संख्या कमी असली, तरी मूळ गीतेतील संपूर्ण आशय त्याध्ये अत्यंत सोप्या शब्दांत आला आहे. पूर्वी मुलींचे विवाह वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीच होत. चैत्रगौरीच्या निमित्ताने त्या माहेरी येत, त्या वेळी झाडांना किंवा अंगणात झोपाळे बांधून त्यावर त्यांचे खेळ चालत. त्या वेळी वेगवेगळी गाणी म्हटली जात. त्याबरोबरच या मुलींनी गीता म्हटली, तर लहान वयात त्यांना चांगले ज्ञान मिळू शकेल, या उद्देशाने त्यांनी झोपाळ्यावरची गीता लिहिल्याचा उल्लेख त्यांच्या प्रस्तावनेत आहे. या संग्रहाच्या तीन आवृत्त्या त्या काळात अकरा वर्षांत प्रसिद्ध झाल्या. शतकाच्या उंबरठ्यावर असलेला राठीतील श्लोकसंग्रहाचा हा दुर्मिळ आणि अनमोल ठेवा पुन्हा एकदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तिकेचे संकलन करण्यात आले आहे. मूळचे रत्नागिरीचे रहिवासी आणि पुण्यातील पत्रकार अनिकेत कोनकर (कॉपी एडिटर, हाराष्ट्र टाइम्स, पुणे) यांनी हे संकलन केले असून रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनने ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. सोबत अनंततनय यांचा परिचय, मूळ पुस्तिकेतील प्रस्तावना  आणि तुलनात्मक अभ्यासाकरिता भगवद्गीतेचे अध्यायही देण्यात आले आहेत.

लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यच्या प्रकाशनाच्या शताब्दीनिमित्त रत्नागिरीत उद्यापासून (ता. १ ऑगस्ट) दोन दिवसांचे विशेष चर्चासत्र यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि गीता मंडळातर्फे होणार आहे. तेच औचित्य साधून श्रीत् टिळक-विजयहे लोकमान्य टिळकांचे ओवीबद्ध चरित्र लिहिणाऱ्या कवी अनंततनय यांच्याच झोपाळ्यावरच्या गीतेचे पुनर्प्रकाशन केले जाणार आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते उद्या सकाळी १० वाजता गीता भवन येथे प्रकाशन समारंभ होईल.