Wednesday 27 May 2015

`कोकण मीडिया कन्सल्टन्सी`च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी – येथील कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसच्या रत्नागिरी संपर्क कार्यालयाचे मंगळवारी (ता. 26) उद्घाटन झाले. साहित्यिक डॉ. दिलीप पाखरे, ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे आणि डॉ. उमेश केळकर यांनी उद्घाटन केले.
कोकणातील व्यक्ती, संस्था आणि संघटनांसाठी प्रसारमाध्यमांशी संबंधित सेवा देण्याच्या उद्देशाने कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस संस्थेची नुकतीच खेडशी (ता. रत्नागिरी) येथे स्थापना झाली. या संस्थेचे रत्नागिरी संपर्क कार्यालय मारुती मंदिर येथे डॉ. उमेश केळकर यांच्या दवाखान्याजवळ सुरू झाले आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वृत्तपत्रांसह विविध माध्यमांशी संपर्क साधताना सर्वसामान्यांबरोबरच विशेष व्यक्ती आणि संस्थांनाही अडचणी येतात. प्रसिद्धीपत्रके, निवेदने, कार्यक्रमांच्या बातम्या, प्रासंगिक लेख तयार करून देताना त्या लिहिणे सर्वांनाच जमतेच, असे नाही. परिणामी माध्यमांच्या या युगात देशविदेशातील बातम्या सहज उपलब्ध होत असताना आजूबाजूच्या परिसरातल्या छोट्याशा पण महत्त्वाच्या घटनाही दुर्लक्षित राहतात. अनेकदा महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहतो. अशा स्थितीत संस्था आणि व्यक्तींना मदत करणे आणि त्या बातम्या, छायाचित्रे वृत्तपत्रांपर्यंत पोहोचविणे असे संस्थेच्या कार्याचे स्वरूप आहे. याशिवाय माध्यमविषयक अन्य सेवाही पुरविल्या जाणार आहेत. एडीझेड नाइन्टीवन या मोबाइल जाहिरात अॅपविषयीची माहितीही यावेळी देण्यात आली.
कोकणातील गावे आणि शहरांचा विकास होत असताना माध्यमविषयक सुरू झालेली ही सेवा तसेच एडीझेड नाइन्टीवन ही नव्या युगातील जाहिरात सेवाही निश्चितच उपयुक्त असल्याचे मत डॉ. पाखरे, डॉ. केळकर आणि श्री. कोकजे यांनी यावेळी व्यक्त केले.

      समारंभाला संचालक प्रमोद कोनकर, एडीझेड नाइन्टीवनचे ओंकार अभ्यंकर, उमेश आंबर्डेकर इत्यादी उपस्थित होते.
कोकण मीडियाविषयी बोलताना डॉ. दिलीप पाखरे

रत्नागिरी – कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी एडीझेड नाइन्टीवनचे उमेश आंबर्डेकर, डॉ. उमेश केळकर, अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, डॉ. दिलीप पाखरे, ओंकार अभ्यंकर

...........................

संपर्क कार्यालयाचा पत्ता –
कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस,
हॅवेल्स गॅलरी, साईकृपा अपार्टमेंट,
श्री धन्वंतरी आयुर्वेदनजीक, स्वा. सावरकर नाट्यगृहाजवळ,
नाचणे रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी-415612



Tuesday 12 May 2015

जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा कुरतडे येथे शुक्रवारी वर्धापनदिन



रत्नागिरी – कुरतडे (ता. रत्नागिरी) येथील जीर्णोद्धारित संतोषीमाता मंदिराचा दुसरा वर्धापनदन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. ग्रामस्थांना एकत्रितरीत्या उपासना करता यावी, यासाठी बांधलेल्या या मंदिराच्या वर्धापनदिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालवकरवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
कुरतडे गावातील महिला दर शुक्रवारी संतोषीमातेची पूजा करत असत. गावातील सर्व महिलांना एकत्रित पूजा आणि व्रतवैकल्ये करता यावीत, तसेच ग्रामस्थांनाही उपसना करता यावी, यासाठी कुरतडे गावाच्या पालवकरवाडीतील ग्रामस्थ आणि मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन संतोषीमातेचे छोटेसे मंदिर बांधले. दोन वर्षांपूर्वी या मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा झाला.  तेव्हा ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला. त्यासाठी मुंबईतील चाकरमान्यांनीही पुढाकार घेऊन निधी संकलित केला. कुरतडे दशक्रोशीत संतोषीमातेचे मंदिर नसल्याने या मंदिराचा भक्तांना लाभ झाला. मंदिरात दैनंदिन पूजाआरती केली जाते. जीर्णोद्धारानंतर गेली दोन वर्षे वर्धापनदिन साजरा केला जातो. गावातून संतोषीमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून जोगवा मागितला जातो. त्यामधून उत्सवाचा खर्च केला जातो. यावेळी ज्येष्ठ ग्रामस्थ, विशेष कामगिरी बजावलेले ग्रामस्थ तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो.
यावर्षीचा वर्धापनदिन येत्या शुक्रवारी (ता. 15) होणार आहे. सकाळी आठ वाजता विधिवत पूजेने उत्सवाला प्रारंभ होईल. सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर आरती-महाप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी पालखी मिरवणूक, भजन, रात्री आठ वाजत मान्यवरांचा सत्कार केला जाईल. रात्री साडेदहा वाजता लांजा येथील मांडवकरवाडीतील बहुरंगी नमन सादर केले जाईल. विलास पालवकर, महेश पालवकर, विजय पालवकर, रामचंद्र पालवकर, गोपाळ पालवकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य निमंत्रक नारायण पालवकर यांनी केले आहे.




प्रेषक – नारायण पालवकर, कुरतडे, ता. रत्नागिरी फोन – 9403614782

Monday 11 May 2015

पुरुषोत्तमशास्त्री फडकेंना श्रद्धांजलीसाठी सभा

रत्नागिरी - रत्नागिरीतील संस्कृतचे गाढे अभ्यासक पुरुषोत्तम नारायण तथा अप्पाशास्त्री फडके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संस्कृत पाठशाळेनं मंगळवारी (१२ मे २०१५) सभेचं आयोजन केलं आहे. ही श्रद्धांजली सभा रत्नागिरीत संस्कृत पाठशाळेत सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सभेला रत्नागिरीतील नागरिक, तसंच संस्कृतप्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. वयाच्या शताब्दीपूर्तीला अवघा आठवडा राहिला असताना, गेल्या २४ एप्रिल रोजी पुरुषोत्तमशास्त्रींचं रत्नागिरीत निधन झालं होतं.

Friday 8 May 2015

कारवांची वाडी येथे बँक ऑफ इंडियाची `ई-गॅलरी`



पैसे भरणे, काढणे, पासबुक प्रिंटिंगची चोवीस तास सेवा
रत्नागिरी – कारवांची वाडी (ता. रत्नागिरी) येथे आज (ता. 8) बँक ऑफ इंडियाच्या ई-गॅलरीचे उद्घाटन झाले. बँकेचे पश्चिम विभागाचे महाप्रबंधक आर. एस. चौहान, मुंबई विभागाचे महाप्रबंधक तरलोचन सिंग, रत्नागिरीचे झोनल मॅनेजर वि. वि. बुचे आणि बँकेच्या कारवांची वाडी शाखेचे व्यवस्थापक विवेक शेंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ झाला.
                यावेळी श्री. सिंग आणि श्री. चौहान यांनी बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला. अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा बँकेचा प्रयत्न असतो. ई-गॅलरी सेवा हा त्याचाच एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. बुचे म्हणाले की, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाने या दोन्ही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन जिल्हयांमध्ये सर्व तालुका शाखांसह एकूण 35 शाखांमध्ये ई-गॅलरी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून कारवांची वाडी शाखा त्यापैकी बारावी आहे. येत्या दोन महिन्यांत इतर ठिकाणी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
      शाखा व्यवस्थापक श्री. शेंडे यांनी शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गेल्या तीन वर्षांत ग्राहकांकडून सर्व सेवांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक जलद आणि केव्हाही उपलब्ध होणाऱ्या नव्या ई-गॅलरी सेवेचा उपयोग ग्राहकांनी करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
      दरम्यान, बँकेच्या लांजा शाखेतही आज ई-गॅलरी सेवेचे उद्घाटन झाले.



काय आहे `ई-गॅलरी`?

      बँकेच्या ई-गॅलरीमध्ये पैसे भरणे, काढणे आणि पासबुक प्रिंटिंगची सेवा चोवीस तास उपलब्ध असेल. त्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेच्या कामकाजाच्या वेळेत बँकेत जाण्याची गरज नाही. बचत, करंट आणि कॅश क्रेडिट खातेधारकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे. ज्या व्यावसायिक आणि नोकरदारांना बँकेच्या वेळेत बँकेत जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त आहे.
  • एटीएमद्वारे केव्हाही पैसे काढण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे.
  • आता ई-गॅलरीमध्ये दिवसभरातील चोवीस तासात केव्हाही पैसे भरणेही शक्य होणार आहे. पैसे भरण्याच्या यंत्रात 50 रुपये ते एक हजार रुपयांपर्यंतच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. बँकेतील खात्याचा अकौंट नंबर टाईप केल्यानंतर खातेधारकाचे नाव स्क्रीनवर दिसेल. त्याची खात्री केल्याचे बटन दाबल्यानंतर पैसे भरता येतील. एका वेळी जास्तीत जास्त दोन लाख रुपये स्वीकारले जातील. त्याहून अधिक रक्कम भरायची असल्यास पुन्हा खाते क्रमांक टाईप करण्यापासून सुरवात करावी लागेल.
  • पासबुक प्रिंटिंगसाठी स्वतंत्र यंत्र आहे. त्याचा उपयोग करण्यापूर्वी बँकेच्या शाखेकडून पासबुकावर बारकोड प्रिंटिंग करून घेणे आवश्यक आहे.