Monday 2 April 2018

नाणारचा रिफायनरी प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण होणार



      रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नाणार (ता. राजापूर) येथे केंद्र सरकारच्या तीन तेल कंपन्या एकत्रितरीत्या उभारत असलेला रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प येत्या २०२३ सालापर्यंत कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाविषयीची माहिती आज प्रथमच रत्नागिरीतल्या प्रसारमाध्यमांना देण्यात आली, त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले. मोहन मेनन, अजित मोरये आणि अनिल नागवेकर यांनी प्रकल्पाविषयीची माहिती दिली.
      इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन कंपन्या तीन लाख कोटी रुपयांचा खर्च असलेला हा प्रकल्प उभारत आहेत. देशात २३ रिफायनरी प्रकल्प असून अशा तऱ्हेचा पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स प्रथमच उभारला जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमार्फतच प्रकल्प उभारायचे ठरल्यानंतर रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड या कंपनीची स्थापना २२ सप्टेंबर २०१७ रोजी झाली. एमआयडीसी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकार प्रकल्पाकरिता आवश्यक असलेली सुमारे पंधरा हजार एकर जमीन खरेदी करून देणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील चौदा गावांमध्ये हा प्रकल्प साकारणार असून प्रकल्पाला आतापर्यंत १४ टक्के लोकांनी प्रकल्पाला आक्षेप नोंदविले आहेत. अनेक सामाजिक संस्था प्रकल्पाबाबत अपप्रचार करत आहेत. संभाव्य प्रदूषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंग, कोयना प्रकल्पाचे अवजल इत्यादी स्रोतांमधून प्रकल्पाला आवश्यक पाणी घेतले जाणार असून या प्रकल्पातून समुद्रात टाकाऊ पाणी सोडले जाणार नाही. सर्व पाणी शुद्धीकरण करून प्रकल्पाच्या परिसरातच वापरले जाणार आहे. प्रकल्पाच्या जागेपैकी ३० टक्के जागा हरितपट्टा म्हणून विकसित केली जाणार असून आंब्याची एक लाख झाडे, तसेच काजू आणि झाडांची लागवड तेथे केली जाणार आहे. गुजरातमधील रिफायनरीच्या परिसरात केलेल्या आंब्याच्या लागवडीपासून मिळणारे उत्पन्न देशाच्या आंब्याच्या सरासरी उत्पन्नाच्या तिप्पट आहे. तेथील आंबा कॅनिंगसाठी महाराष्ट्रात पाठविला जातो. प्रकल्पात केवळ पेट्रोलियम उत्पादने नव्हेत, तर फर्निचर, टेक्स्टाइल, पॅकेजिंग, फ्रिज, वॉशिंग मशीन, ऑटोमोबाइल इत्यादीसाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांची निर्मिती होणार आहे. ही उत्पादने सर्वांत आधुनिक अशा बीएस-वीआय प्लस (युरो – सिक्स) दर्जाची असतील. त्यामध्ये फर्निचरहा संपूर्णपणे प्रदूषणविरहित प्रकल्प असेल.
      प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात दोन टक्क्यांनी, तर राज्याच्या उत्पन्नात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना सुमारे दीड लाख, तर प्रकल्प सुरू झाल्यानंतर २० हजार जणांना प्रकल्पात प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात, याकरिता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था दत्तक घेण्यात येणार असून प्रकल्पासाठी आवश्यक ती कौशल्ये तेथे शिकविली जाणार आहेत. याशिवाय लाखाहून अधिक लोकांना प्रकल्पाच्या परिसरात सुरू होणाऱ्या विविध पूरक उद्योगांमध्ये अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. प्रकल्पामध्ये वाहतुकीच्या पायाभूत सुविधा, बंदर सुविधा आणि हवाई जोडणीच्या विकासाची क्षमता आहे. रत्नागिरी ते विजयदुर्ग या दरम्यान रेल्वेमार्ग उभारण्याची तयारी कोकण रेल्वेने दाखविली असून या मार्गावर ६ ते ७ स्थानके असतील. प्रकल्पाच्या परिसरातील लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार असून जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या जातील. याशिवाय मनोरंजन, पर्यटन, मत्स्यव्यवसाय अशा विविध क्षेत्रांमध्ये तरुणांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकल्प अत्यंत सुरक्षित असून त्याकरिता जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निर्मल सागर तट महोत्सव कोळथरे येथे उत्साहात


 दापोली - दापोली तालुक्यात दोन दिवसांचा कोळथरे महोत्सव नुकताच पार पडला.

      महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या निर्मल सागरतट अभियानातून कोळथरे या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावाचा कायापालट झाला असून गावात विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारा स्वच्छ राहावा, यासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्याची माहिती पर्यटकांसह सर्वांना व्हावी, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपातळीवर अशा तऱ्हेने प्रथमच महोत्सव साजरा करण्यात आला. त्याशिवाय गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला कासव महोत्सवही पार पडला. सरपंच सौ. ज्योती दीपक महाजन यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविले गेले आणि महोत्सवही
उत्साहात पार पडला.
      अभियानाच्या निकषानुसार सर्वधर्म समभाव जोपासला जावा, पर्यटकांची संख्या वाढावी, रोजगार संधी मिळावी अशा वेगवेगळ्या हेतूने कोळथरे समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या विकासांचा व पर्यटकांना मूलभूत सुविधांचा आनंद घ्यावा या अनुषंगाने कोळथरे ग्रामपंचायत, सरपंच आणि कमिटी सदस्यांनी २४ आणि २५ मार्च २०१८ रोजी कोळथरे महोत्सव आयोजित केला होता. त्यानिमित्ताने विविध उपक्रम घेण्यात 
आले. कोळथरे गावात आनंदाचे वारे वाहताना दिसून येत होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यामुळे ग्रामस्थ, पर्यटक व आजूबाजूच्या लोकांनी संपूर्ण समुद्र किनारा दोन दिवस गजबजून गेला होता. वेगळावेगळ्या कार्यक्रमांमुळे सगळ्यांचे उत्साह वाढत होता.
      कोळथरे महोत्सवात वाळुशिल्प प्रशिक्षण देण्यात आले. किल्ले स्पर्धेत सुमारे ६० बालकलाकारांनी हजेरी लावली. महिलांचे कबड्डी
सामने, लोककला, जाखडी, चवदार खाद्य जत्रा, पतंगबाजी, नेचर ट्रॅक, कासव महोत्सवाकरिता पर्यटक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायतीने अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन केले.
................

















(चित्रफीत सौजन्य - दीपक महाजन, कोळथरे, ता. दापोली)




Sunday 1 April 2018

समाज परिवर्तनामध्ये सामाजिक संस्थांचे योगदान महत्त्वाचे : सुरेश प्रभू



                रत्नागिरी : समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांचीही तितकीच गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू यांच्या हस्ते रत्नागिरीतील महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक्सचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. प्रभू यांनी बोलत होते.

                श्री. प्रभू म्हणाले की, कोकणाचा विकास अद्यापही अपूर्ण आहे. याचे कारण येथील महिला घराबाहेर पडत नाहीत. मात्र जेव्हा महिला घराबाहेर पडतात तेव्हा समाजाच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते असा माझा विश्वास आहे. त्यातूनच १९९४-९५ च्या दरम्यान मानव साधन विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत महिला सबलीकरणाच्या निमित्ताने कोकणातील सुमारे ६० ते ७० हजार महिलांना त्यांच्या पायावर उभे राहण्याची संधी या संस्थेने दिली आहे. त्यातच पुढचे पाऊल म्हणून कोकणातील महिलांना सुमारे ४५ हजार रुपये किमतीची पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक बाइक देण्याचा प्रस्ताव हिरो ग्रुपचे ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आमच्या मानव साधन विकास संस्थेकडे आणला. त्याचाच प्रारंभ आज होत आहे. कोकण विकासासाठी शासनासोबतच अशा सामाजिक संस्थांचीही सांगड घालणे गरजेचे आहे, असेही श्री. प्रभू यांनी यावेळी सांगितले.
                कार्यक्रमाला व्यासपीठावर सौ. उमा प्रभू यांच्यासह भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार डॉ. विनय नातू, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, सौ. उल्का विश्वासराव आणि ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनचे अनिल शर्मा उपस्थित होते. महिला सबलीकरणासाठी मानव साधन विकास संस्था गेली २० वर्षे काम करीत असून याहीपुढे हे काम असेच सुरू राहील, असे सौ. उमा प्रभू यांनी सांगितले. अनिल शर्मा यांनीही ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. जाणीव फाऊंडेशनच्या वतीने श्री. प्रभू यांच सत्कार करण्यात आला.
                मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांतर्गत अनेक उपक्रम २० वर्षांपेक्षा जास्त काळ सातत्याने सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाखापेक्षा जास्त महिलांना या माध्यमातून स्वयंरोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. येणाऱ्या काळात महिलांना स्वयंरोजगारासाठी व नोकरी व्यवसायासाठी वाहतुकीची कमी खर्चात व पर्यावरणपूरक व्यवस्था व्हावी,  या हेतूने इलेक्ट्रिक बाइक्स देण्यात आल्या आहेत. ओ. पी. मुंजाळ फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सौ. उमा प्रभू यांच्या मार्गदर्शनाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने महिलांच्या सबलीकरणाकरिता ५०० इलेक्ट्रिक बाइक्सचे वितरण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केले जाणार आहे. त्यापैकी २५० सायकली रत्नागिरी जिल्ह्यात वितरित केल्या जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात रोहिता सहदेव पांचाळ (ताम्हाणे, राजापूर), मंदाकिनी महादेव माईंगडे (जाकादेवी, रत्नागिरी), योगिता योगेश पवार (कोसुंब, संगमेश्वर), शमिका संतोष रामाणी (मालगुंड, रत्नागिरी), प्रियांका प्रकाश जोशी (निवे, संगमेश्वर), दीपाली मनोज कुंभार (टेरव, चिपळूण), माधवी मंगेश किर्लोस्कर (उन्हाळे, राजापूर), साक्षी चंद्रकांत भुवड (वाकेड, लांजा) आणि रूपाली राहुल पवार (जावडे, लांजा) या महिलांना सायकलींचे वितरण करण्यात आले. हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे.



Tuesday 27 March 2018

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचे कलशारोहण थाटात

करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी स्वतः कलशारोहण केले.

कॅन्सर म्हणजे अयोग्य आचरणामुळे निर्माण झालेली विकृती – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती

मठ (ता. लांजा) : कॅन्सरला रोग म्हटले जाते. पण तो रोग नाही. कारण रोगाचे जंतू नसतात. माणसाच्या आचरणामध्ये जे अयोग्य बदल झाले आहेत, त्यामुळे निर्माण झालेली कॅन्सर ही एक विकृती आहे. सनातन धर्माच्या शिकवणीचे अनेक पुरावे विज्ञानानेही आता सिद्ध केले आहेत. म्हणून दैनंदिन शुद्ध आचरणाची शिकवण देणारा हिंदू धर्म श्रेष्ठ आणि परिपूर्ण आहे, असे प्रतिपादन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी केले.
भक्तांनी रांग लावून अभिषेकाकरिता कलश हस्तांतरित केले.
मठ येथे  मुंबई-गोवा महामार्गावर लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराचे कलशारोहण शंकराचार्यांच्या हस्ते काल (दि. २६ मार्च) झाले. त्यावेळी झालेल्या प्रवचनात ते बोलत होते. धर्माचरणात सांगितलेल्या अनेक बाबी आजच्या विज्ञानाने सिद्ध केल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की, मूल जन्माला आले की, त्याचे नामकरण केले जाते. तेव्हा सनातन वैदिक नामकर्मातील संस्कारांमध्ये बालकाला त्याचा जन्म पणजोबापासून झाल्याचे मंत्र ऐकविले जातात. आताच्या विज्ञानानेही जनुकांच्या साह्याने हेच सिद्ध केले
कलशावर अभिषेक
आहे. पूर्वीच्या लोकांनी सनातन धर्म पाळला,  त्यातून त्यांना आनंद मिळाला. आजही तो धर्म पाळला, तर आपल्यालाही समाधान होईल. परिपूर्ण धर्मामध्ये इदं न मम अशी समर्पणाची भावना सांगितली आहे. ती निर्माण होण्यासाठी आणि पापक्षालनासाठी जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करावा, नवी मंदिरे बांधावीत, असे सांगितले आहे. मंदिराच्या कळसाचे दर्शन घ्यावे, असे सांगितले जाते. पंढरपूरच्या वारीला जाणारे वारकरीही रांगांमुळे पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही, तरी कळसाचे दर्शन घेऊन परतात. कारण गाभाऱ्यातील देवतेचे अधिष्ठान कळसामध्ये निर्माण केलेले असते. सगुण मूर्तीच्या दर्शनाचे फळ कळसाच्या दर्शनाने मिळते. कळस म्हणजे निर्गुणस्वरूप, तर गाभाऱ्यातील अवयवांनी बद्ध असलेली मूर्ती म्हणजे सगुण रूप असते. कोणत्याही मंदिराचा कळस एकाच प्रकारचा शंकूच्या आकाराचा असतो. अवकाशातील सत्त्वगुण कळसाच्या बिंदूमधून खेचला जाऊन तो गाभाऱ्यातील मूर्तीपर्यंत पोहोचतो. तेथे दर्शन घेणाऱ्यांना तोच सत्त्वगुण दिला जातो, असे सांगून शंकराचार्यांनी सत्त्व, रज आणि तमो गुणांविषयी ऊहापोह केला. हिंदू विवाह संस्थेमध्येही धर्माच्या परिपूर्णतेचे दर्शन घडते. धर्माचरण करताना धर्म, अर्थ आणि काम हे तिन्ही पुरुषार्थ आपल्या संमतीनेच आचरण्याचे वचन वराकडून वधू घेते. पत्नीला
शंकराचार्यांच्या पादुकांची पाद्यपूजा
किती महत्त्व आहे, हेही त्यातून सिद्ध होते. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजासारख्या संतांनीही पतिव्रता महिलांची महती सांगितली आहे. असे धर्माचरण सांगणाऱ्या भारतीय संस्कृतीवर इतकी आक्रमणे झाली, तरी संस्कृती आहे आजही जपली गेली आहे. त्यामुळेच ती श्रेष्ठ आहे, असेही शंकराचार्यांनी सांगितले.
प्रवचनापूर्वी शंकराचार्यांच्या हस्ते कलशारोहण समारंभानिमित्ताने श्री लक्ष्मी्पल्लीनाथ संस्थानतर्फे तयार करण्यात आलेल्या गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
शंकराचार्यांच्या हस्ते गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिकेचे प्रकाशन
यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. स्मरणिकेची निर्मिती कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसतर्फे करण्यात आली आहे.
कलशारोहणापूर्वी कलशाची मिरवणूक काढण्यात आली. शंकराचार्यांनी स्वतः मंदिरावर जाऊन कलशाची स्थापना केली. तत्पूर्वी मंदिरात धार्मिक विधी पार पडले.
दरम्यान, नव्या मंदिराच्या प्रांगणातील सहावा आणि संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या असे कार्यक्रम पार पडणार आहेत. रोज रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.
......

गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची स्मरणिका चैत्रोत्सवात उपलब्ध
           स्मरणिकेचे देणगीमूल्य ५० रुपये असून स्मरणिकेच्या विक्रीतून येणारा निधी संस्थानात जमा होणार आहे. चैत्रोत्सवाच्या ठिकाणी ही स्मरणिका उपलब्ध आहे. भक्तांनी ही स्मरणिका खरेदी करून अल्पशा देणगीरूपाने संस्थानाला हातभार लावावा, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.

...............
 कळसाने सुशोभित झालेले श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर.

Sunday 25 March 2018

केबीबीएफच्या ग्लोबल मीटने दिला उद्यमशीलतेला चालना



                बेळणे (ता. कणकवली) - केबीबीएफ (कऱ्हाडे ब्राह्मण बनेव्होलंट फोरम) या संस्थेची ग्लोबल मीट निसर्गसौंदर्याने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेळणे (ता. कणकवली) १० मार्च रोजी पार पडली. वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांनी उद्यमशीलतेला चालना दिली. सिंधुदुर्ग केबीबीएफचे अध्यक्ष प्रदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा मेळावा नीटनेटक्या नियोजनामुळे संस्मरणीय ठरला. या मेळाव्याचा संक्षिप्त आढावा येथे घेतला आहे.
रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते  ग्लोबल मीटचे उद्घाटन झाले. शेजारी मान्यवर

                आपल्या समाजात व्यावसायिकतेची गोडी वाढावी, त्यात उपलब्ध होणाऱ्या संधी ज्ञातिबांधवांपर्यंत पोहोचाव्या, शिवाय ज्ञातिबांधवांना एक व्यासपीठ उपलब्ध होऊन ज्ञातीअंतर्गत संपर्ककक्षा वाढाव्यात, यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या उद्घाटनाचा छोटेखानी समारंभ झाला. यावेळी केबीबीएफ-ग्लोबलचे श्री. गुणे, सचिव अमित शहाणे, अजिता भावे, व्याख्याते डॉ. यश वेलणकर, विनोद देशपांडे, अमोल करंदीकर, मुकुंद सप्रे, रत्नागिरी केबीबीएफचे अध्यक्ष योगेश मुळ्ये, सिंधुदुर्ग केबीबीएफचे सर्व पदाधिकारी तसेच अन्य शाखांचे प्रतिनिधी मिळून सुमारे १५० जण उपस्थित होते. रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यावेळी खास उपस्थित होते. आपण आधी उद्योजक आहोत, त्यानंतर नगराध्यक्ष आणि अन्य भूमिका मी निभावत आहे. उद्योजक या नात्याने केबीबीएफला आवश्यक ती मदत आपण करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
                आयुर्वेदाचार्य यश वेलणकर यांनी भगवद्गीतेतील तीन सूत्रांच्या आधारे व्यवसाय आणि त्यातून येणाऱ्या ताणतणावांसंदर्भाची उत्तम मांडणी केली. मेंदूची रचना आणि कार्य, ताणतणावासंदर्भातील मेंदूतील केंद्रे, ताणामुळे शरीरात होणारे बदल याविषयी त्यांनी स्लाइडशोसह सविस्तर माहिती दिली. व्यवसायासाठी गाठीभेटी, संपर्क आवश्यक आहेच, पण कोणत्याही परिस्थितीत मनाचा समतोल ढळून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले. तणावमुक्त जगता यावे, अशी अपेक्षा असते. मात्र ताणतणाव आले, तरच उद्योजकाला यशस्वी होता येते. योग्य प्रमाणात तणाव असला, तर तो एक प्रकारची ऊर्जा निर्माण करत असतो. आवश्यक त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याकरिता मेंदूला एक प्रकारचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच तसे शिकविले गेले पाहिजे. व्यवसायातही तो वाढविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी माइंडफुलनेस म्हणजे पूर्णभानाची आवश्यकता असते. त्याकरिता मेंदूची कार्यक्षमता वाढविली गेली पाहिजे, सजगता आली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मनावरचा ताण कमी करण्याकरिता दोन छोट्या योगक्रिया त्यांनी यावेळी शिकविल्या.
                डोंबिवली नागरी सहकारी बँकेला मल्टीस्टेट शाखांचा परवाना मिळाला आहे. बँकेने रत्नागिरीपाठोपाठ सिंधुदुर्गातही कुडाळमध्ये शाखा सुरू केली आहे. अन्य बँकांपेक्षा काही वेगळ्या कर्जयोजना बँकेकडे आहेत, अशी माहिती बँकेतर्फे पराग नवरे यांनी दिली.
                व्यक्तिमत्त्व आणि व्यवसायवृद्धी या विषयावर बेळगावचे विनोद देशपांडे यांनी कन्नड आणि मराठी भाषेतील विविध म्हणी आणि वाक्प्रचारांचा वापर करत मार्गदर्शन केले. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्याची टाळाटाळ करणारे प्रधानमंत्री देशी-विदेशी उद्योजकांसाठी खास वेळ देतात, त्यांच्यासमवेत वेळ व्यतीत करतात. हे लक्षात घेऊन ब्राह्मण उद्योजकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमता आणि उद्योग क्षेत्रात उत्तुंगता गाठली पाहिजे, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले. उद्योग-व्यवसाय करताना आवश्यक असलेल्या अनेक बारकाव्यांचा त्यांनी तपशिलाने ऊहापोह केला. उद्योगांसाठी एखादे उत्पादन घ्यायलाच हवे असे नाही. ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्या स्वतःचे उत्पादन नसतानाही जागतिक पातळीवर आपला व्यवसाय करत आहेत. उद्योग सुरू करताना किंवा वाढविताना अशा नव्या आणि वेगळ्या संधींकडे लक्ष दिले पाहिजे. भविष्याचा वेध घेतला पाहिजे. एकत्रित सेवा देता येतील का, कोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल, तंत्रज्ञानाच्या वापरातून विस्तार कसा करता येईल, भविष्यातील गरजा यांचा वेध घेतला पाहिजे. उद्योगांच्या नवनवीन शाखा आणि नवनवी उत्पादने तयार करायला हवीत. उद्योग करताना सर्पदृष्टी आणि गरुडदृष्टी हवी. म्हणजे अल्पकालीन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण तयार केलेले एखादे उत्पादन किंवा दिलेली एखादी सेवा एका ब्राह्मण उद्योजकाने दिली आहे, त्यामुळे ती उत्तम आणि उत्कृष्टच असणार, असा विश्वास आपल्याबाबत आपल्याला निर्माण करता आला पाहिजे, असा कानमंत्री श्री. देशपांडे यांनी दिला.
                कणकवलीजवळच सुरू असलेल्या पंचगव्य थेरपीविषयी डॉ. धनंजय प्रभुदेसाई यांनी माहिती दिली. अधिक माहितीसाठी त्यांच्याशी (०२३६७) २४७८२५ किंवा ९८६०७९७२७४ या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
                पितांबरी प्रॉडक्ट्सतर्फे पराग साळवी यांनी सगुंधी कोकण या संकल्पनेची माहिती दिली. गवती चहाच्या उत्पादनावर पितांबरी उद्योगाने आता लक्ष केंद्रित केले असून साखळोली (दापोली), तळवडे (राजापूर) आणि पेढांबे (चिपळूण) या रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेली लागवड, गवती चहाची वैशिष्ट्ये, लागवडीचे चक्र इत्यादीविषयी त्यांनी सांगितले. गवती चहाच्या लागवडीपासून दरवर्षी दरएकरी ३० हजार ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. किमान सहा एकर क्षेत्रात लागवड केली गेली, तर त्याच परिसरात प्रक्रिया करता येऊ शकेल. हा सर्व माल पितांबरी उद्योग विकत घेऊ शकेल. या लागवडीसाठी कंपनीकडून मार्गदर्शन आणि लागवडीसाठी वाण मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. पराग साळवी यांचा संपर्क क्रमांक ९५४५७०७०६६.
                सायंकाळच्या सत्रात कृषी आणि उद्योजकता या विषयावर कृषी अधिकारी अमोल करंदीकर आणि जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी मार्गदर्शन केले. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, गुणनियंत्रण आणि प्रशासन या चार टप्प्यांमध्ये कशी मदत केली जाते, अभ्यास दौरे, अपघात विमा योजना, विविध पुरस्कार, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार योजना, चांदा ते बांदा योजना अशा विविध योजनांची नेमकी माहिती श्री. करंदीकर (९४२३६८४०९५) यांनी अत्यंत विनोदी निवेदनातून दिली.
                सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्राचे मुकुंद सप्रे यांनी नवउद्योजकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ आणि काजू या पिकांच्या प्रक्रिया उद्योगाच्या किती व्यापक संधी आहेत, याचा आढावा घेतला. नारळाचा काथ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या कुंड्यांमधील रोपांची निर्मिती, शोभेच्या वस्तू, खोके असे अनेक उद्योग करता येणे शक्य आहे. महिला उद्योजकांना दिला जाणारा १०० टक्के इन्सेन्टिव्ह, उद्योगांनुसार मिळणारी अनुदाने आणि पतपुरवठा याबाबत त्यांनी माहिती दिली. फळप्रक्रिया उद्योगांमध्ये प्रचंड वाव असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. बांबू प्रक्रिया उद्योगाकडेही त्यांनी लक्ष वेधले. अधिक माहितीसाठी त्यांना त्यांच्या कार्यालयीन दूरध्वनीवर (०२३६२-२२८७०५) किंवा व्यक्तिगत (८८०५८९५६५७) संपर्क साधता येऊ शकेल.
                मेळावा यशस्वी होण्यासाठी केबीबीएफ सिंधुदुर्ग चाप्टरचे अध्यक्ष प्रदीप जोशी, उपाध्यक्ष विहंग देवस्थळी, सचिव नितीन घाटे, खजिनदार संजय पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण चमूने उत्तम तयारी केली होती. त्यांना मयूरेश पुरोहित सक्रिय मदत करताना दिसत होते. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन वेळेत संपला. नियोजित कार्यक्रमापैकी कोणताही कार्यक्रम रद्द झाला नाही. एकंदरीत मेळावा यशस्वी झाल्याची पावती उपस्थितांकडून दिली जात होती.
                ...................


बेळणे (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथे केबीबीएफच्या ग्लोबल मीटमध्ये सहभागी झालेले प्रतिनिधी


Saturday 24 March 2018

मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर कलशारोहणासाठी सज्ज


रत्नागिरी : मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराचा कलशारोहण सोहळा येत्या सोमवारी (दि. २६ मार्च) होणार आहे. संस्थानाचा शतकोत्तर दुसरा चैत्रोत्सव आजपासून सुरू झाला असून तो ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. याच कालावधीत सोमवारी नूतन मंदिरावर करवीर पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते कळस चढविला जाणार आहे.


      मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात लक्ष्मीपल्लीनाथाच्या कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सहावा उत्सव आहे. चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत दरवर्षी चैत्रोत्सव होतो. यंदा कलशारोहणामुळे हा उत्सव आज सप्तमीपासूनच सुरू झाला. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. यंदाच्या उत्सवात, २६ मार्च रोजी करवीर पीठाचे श्रीमद् शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते कलशारोहण होणार आहे. त्यानंतर ते उपस्थितांना मार्गदर्शनही करणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादी धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप आदी कार्यक्रम या कालावधीत होणार आहेत. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. उद्या (दि. २५ मार्च) रात्री स्थानिक भक्तमंडळींचे भजन होणार असून, २७ मार्च रोजी रात्री वेदमूर्ती आचार्य गुरुजी आणि ब्रह्मवृंद मंत्रजागर करणार आहेत. २६ ते ३१ मार्च या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत हभप मकरंदबुवा सुमंत (रामदासी) यांची कीर्तने होणार आहेत.

      अखेरच्या दिवशी रोजी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा कार्यक्रम योगेश सोमण सादर करतील. त्यानंतर सुमंतबुवांचे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होणार आहे, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले आहे.

Thursday 8 March 2018

अचीव्हर्स ॲकॅडमीची मधुरा आठल्ये सीएस फौंडेशन परीक्षेत गुणवत्ता यादीत


मधुरा आठल्ये
              रत्नागिरी - येथील अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सीएस फौंडेशन परीक्षेसाठी मार्गदर्शन घेणारे पाच सीएस फौंडेशन परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाकडून घेतली जाते.
विद्यार्थी यशस्वी झाले असून त्यापैकी मधुरा आठल्ये ही विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आली आहे. हर्षदा वाकणकर, ऋतू गुढेकर, निधी सुर्वे आणि अभिषेक साळवी हे विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना अचीव्हर्स ॲकॅडमीमध्ये सौ. मुग्धा करंबेळकर, गौरव महाजनी, शिवानी ठाकूर, रोहिणी काटदरे, धनश्री करमरकर आणि ऋचा पित्रे यांचे मार्गदर्शन लाभले. ॲकॅडमीमध्ये सीएस व सीए या परीक्षांच्या मार्गदर्शनाबरोबरच आता अकाउंटिंग अँड फायनान्स व बीएमएस या विशेष शाखांच्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शन सुरू करण्यात येत आहे. जे विद्यार्थी जून २०१८मध्ये सीए सीपीटी ही परीक्षा
हर्षदा वाकणकर
देऊ इच्छितात, त्यांच्यासाठी लॉ आणि इकॉनॉमिक्स या विषयांचे मार्गदर्शन लवकरच सुरू होत आहे. या विद्यार्थ्यांना सीपीटीच्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन टेस्ट सिरीजदेखील देता येतील. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲकॅडमीच्या संचालिका सौ. मुग्धा करंबेळकर यांनी केले आहे.
(संपर्कासाठी दूरध्वनी : ८२३७७५३०३६, ८३८००६९३२०, ९४०४९१७०५६)
ऋतू गुढेकर

निधी सुर्वे


भिषेक साळवी