Monday 17 July 2017

मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन

`रागार्पण`चे औचित्य :  रागसमयचक्रावर आधारित बारा तासांचा कार्यक्रम

रत्नागिरी – गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी (ता. १६) रत्नागिरीत पार पडलेल्या गजानन भट स्मृती रागार्पण कार्यक्रमात सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटन नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते झाले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
मुग्धनाद संगीत ॲकॅडमीच्या उद्घाटनप्रसंगी सौ. मुग्धा भट-सामंत, सौ. स्मिता सातपुते,
श्रीमती सुजाता भट, नगराध्यक्ष राहुल पंडित, श्री. सातपुते, योगेश सामंत
गजानन भट यांची कन्या आणि ज्येष्ठ गायिका सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या सहा ते ६० वयोगटातल्या ८५ शिष्यांनी रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वळावे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या वर्षी याच दिवशी निशिगंध ते प्राजक्त हा रागसमयचक्रावर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग पार पडला. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ अशा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांचे सादरीकरण झाले. त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर करण्यात आला. यावेळी दिवसाच्या बारा तासांच्या रागांवर आधारित सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मावशी सौ. स्मिता सातपुते, श्री. सातपुते यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. बिलासखानी तोडी रागाने सौ. सामंत यांनी कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमात भैरव, शिवमत भैरव, नट भैरव, अहिर भैरव, अल्हय्या बिलावल, रामकली, कालिंगडा, बैरागी, बिभास, आसावरी, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मधमाद सारंग, गौड सारंग, सामंत सारंग, नूज सारंग, मियाँकी सारंग, भीमपलासी, काफी असे विविध राग सादर करण्यात आले. त्यातील बंदिशी विलंबित एकताल, विलंबित तिलवाडा, मध्यलय झपताल, मध्यलय मत्तताल, द्रुत एकताल, द्रुत त्रिताल या तालातील होत्या. अखेरच्या सत्रात हिंडोल गावत सब ही रागमाला सादर करण्यात आली. राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पोषाखात मुलांनी भैरवी रागात सादर केलेल्या मिले सुर मेरा तुम्हारा या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके यांनी तबलासाथ,  मधुसूदन लेले,  चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले यांनी हार्मोनियम साथ केली. वैभव फणसळकर यांनी सिंथेसाइजरसाथ आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार केली.
रागार्पण कार्यक्रम सादर करणारे कलाकार.
मध्यंतरी एका तासाचे चर्चासत्र झाले. सौ. सामंत यांनी सर्व शिष्य आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधला. मुले आणि पालकांनी अनेक शंकांचे प्रश्न विचारून निरसन करून घेतले. एरवी मुले आणि पालकांशी निवांत गप्पा मारता येत नाहीत. त्यासाठी अशा गप्पांचे आयोजन केले होते. चर्चासत्रात रियाज कसा करायचा, ख्याल कसा मांडायचा, तालाचा अभ्यास कसा केला पाहिजे, इत्यादी मुद्द्यांची चर्चा झाली.
समारोपाच्या सत्रात सौ. सामंत यांच्या मातोश्री सुजाता भट, मावशी सौ. स्मिता सातपुते, काका श्री. सातपुते, यांचा सत्कार सौ. सामंत यांचे पती योगेश सामंत यांनी केला. लवकरच मुग्धनाद संगीत ॲकॅडमीतर्फे संगीताच्या पुस्तकांची आणि सीडीची लायब्ररी सुरू करणार असल्याची माहिती सौ. सामंत यांनी यावेळी दिली.
............

रियाज केला असता, तर राजकारणात आलोच नसतो – राहुल पंडित
मला लहानपणी गायक बनण्याची इच्छा होती. तेव्हापासून रियाज सुरू ठेवला असता, तर मी राजकारणात आलोच नसतो. संगीताच्या क्षेत्रातच मी राहिलो असतो. आता मुग्धनाद ॲकॅडमीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा संगीताशी जोडला गेलो आहे, हे माझे भाग्यच आहे, असे उद्गार रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रागार्पण कार्यक्रमाच्या समारोप सत्रात काढले. मुग्धनाद संगीत ॲकॅडमीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. संगीताची पार्श्वभूमी असलेल्या रत्नागिरीत संगीताच्या विद्यार्थ्यांना रियाजाकरिता आणि कार्यक्रमाकरिता नगरपालिकेने वास्तू बांधून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी सौ. स्मिता सातपुते यांनी नगराध्यक्षांना केली. संगीताची आवड असलेल्या नगराध्यक्षांनी कर्तव्य म्हणून हे काम मनावर घ्यावे, असे सौ. सातपुते यांनी सांगितले. सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट यांनी सहा ओळींची कविता सादर केली.
...........
राष्ट्रध्वजाच्या रंगातील वेषात भैरवी सादर करताना विद्यार्थी. (छायाचित्रे – दिलीप केळकर)

रागार्पण नव्हे, अमृतानुभव!!!

      गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची कन्या सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांच्या शिष्यांनी रविवारी (ता. १६ जुलै) रत्नागिरीत रागार्पण हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका रसिकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया.

      'शास्त्रीय संगीत हे गंभीर स्वभावाच्या आणि रागाचं ज्ञान असणाऱ्यानंच पहायचा कार्यक्रम' असं सर्वसामान्यांप्रमाणे माझंही मत होतं, पण माझी संकल्पना बदलून गेली ती सौ. मुग्धा भट-सामंत यांच्या 'रागार्पण' या कार्यक्रमानं!!
सौ. मुग्धा भट-सामंत यांना शुभेच्छा अमित सामंत
   निमित्त होतं कै. गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहातील 'रागार्पण' कार्यक्रमाचं!! माझ्या परिचयाच्या एका सहावर्षीय बालिकेच्या ठाम आग्रहावरून खरं तर मी कार्यक्रमाला गेलो, अन्यथा मला गाण्यातल्या रागाचं फार ज्ञान नाही. गाणी ऐकायला मात्र आवडतात..
    तिथला माहोल म्हणजे निव्वळ तृप्ती!! अमृतानुभव होता. सहा ते साठ वर्षं वयाचे शिष्यगण असणाऱ्या मुग्धा भट-सामंत यांचं गाणं जरी मला एकता आलं नाही तरी त्यांच्या शिष्यानीं केलेली कमाल पाहण्याचं भाग्य मात्र लाभलं!! रागसमयचक्रावर (त्या त्या वेळी तो तो राग) आधारित कार्यक्रम, श्रोत्यांनी तुडुंब भरलेला हॉल, शेवटपर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद यावरून कार्यक्रमाचं यश लक्षात येतं.
   प्रत्येक शिष्याचा रियाजानं तयार झालेला सूर, प्रत्येक रागाची माहिती देणारं निवेदन आणि संयोजनातील शिस्त यामुळे कार्यक्रम नादमधुर बनला!! बाहेर भर जुलै महिन्यात आकाश कोरडं असताना हॉलमध्ये मात्र मधुरस्वरधारा अक्षरशः बरसत होत्या!! शेवटी ६-७ वर्षांच्या चिमुकल्यानी म्हटलेलं भैरवीतलं मिले सूर मेरा तुम्हारा हे गीत तर कार्यक्रमाला चार चाँद लावून गेलं!!
  अप्रतिम वाद्यवृंद, वक्त्यांच्या बोलण्यातून समजलेला मुग्धाताईंचा प्रवास, त्यांचे परिश्रम, शिस्त आणि त्यांना मिळालेली त्यांचे पती योगेश सामंत यांची साथ हे सर्वच प्रेरणादायी आहे. (मुग्धताईंचे पती आपली डबल ड्युटी करून कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी सहापासून ते कार्यक्रम सायंकाळी संपेपर्यंत अविश्रांत मेहनत घेत होते, ही माहितीही एका वक्त्यानं सांगितली.)
एकूणच गायनातलं समर्पण, गुरू-शिष्य परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयोग, पित्याविषयी कृतज्ञता आणि कुटुंबीयांची समर्थ साथ या सगळ्या पायावर उभा राहिलेला आणि शिष्यांच्या सुरेल गायनानं आणि श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादानं कळस गाठणारा 'रागार्पण' हा केवळ एक सांगीतिक कार्यक्रम न राहता अमृतानुभव बनला!!
-    अमित सामंत, रत्नागिरी

.............


सौ. मुग्धा भट-सामंत यांना आणखी एका रसिकाने कवितेतून दिलेली दाद

तू साक्षात गुरू...

स्वरांसारखी किती माणसं,
जवळ केली मुग्धा!
स्वर्गामधून कौतुक करत
असतील देवसुद्धा!

धाग्यामधे फुलं तशी,
माणसं ओवतेस स्वरात!
गंधर्वांचा वावर असेल,
नक्की तुझ्या घरात!

छप्पर सगळा पाऊस देतं,
ओंजळ भरून मातीत!
तुझं तेज उजळू लागतं,
शिष्यांच्याही वातीत!

हातचं राखल्याशिवाय जे
देणं ठेवतात सुरू!
त्यांना कसं माणूस म्हणू,
तूच साक्षात गुरू!

                     प्रमोद जोशी, देवगड

Saturday 15 July 2017

अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी योगेश मुकादम




      रत्नागिरी – अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनाच्या रत्नागिरी जिल्हा शाखेच्या अध्यक्षपदी रत्नागिरीतील वैद्य योगेश मुकादम यांची निवड झाली आहे.
      अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन ही संस्था पदेशास्त्री यांनी १९०७ साली स्थापन केली. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. त्रिगुणा हे निती आयोगाचे सदस्य असून राष्ट्रपतींच्या वैद्यकीय सल्लागार मंडळात त्यांचा समावेश आहे. संस्थेचा आता प्रसार करण्यात येणार आहे. त्याकरिता रत्नागिरीच्या शाखेचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून अध्यक्षपदी वैद्य योगेश मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ही निवड करण्यात आली. अ. भा. आयुर्वेद संमेलनाचे अध्यक्ष वैद्य दीनानाथजी उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वैद्य मुकादम यांना त्यांच्या निवडीचे पत्र संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड (कोपरगाव), राज्य कार्यकारिणीचे स्वानंद पंडित, प्रवीण जोशी (धुळे) आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
      अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन या संस्थेने गेल्या ११० वर्षांमध्ये आयुर्वेद प्रसाराचे कार्य केले असून आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणे, स्वस्त दरातील औषधे आणि उपचार उपलब्ध करून तळागाळातील छोट्या आणि गरीब रुग्णांपर्यंत आयुर्वेद पोहोचविणे, आयुर्वेद पदवीधर असणाऱ्या पण आधुनिक लोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यवर्गाला सहकार्य करून त्यांनीही आयुर्वेद प्रॅक्टिस सुरू करण्यास मार्गदर्शन करणे इत्यादी उद्दिष्टे घेऊन संस्था कार्य करणार आहे. संस्थेची रत्नागिरीची शाखा पुनरुज्जीवित करण्यात आली असून जिल्ह्याची कार्यकारिणी लवकरच तालुकास्तरावर विस्तारित करण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष योगेश मुकादम यांनी सांगितले.
(संपर्क - 9421229045)
........
शिर्डी - अखिल भारतीय आयुर्वेद संमेलन संस्थेच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र योगेश मुकादम यांना प्रदान करताना संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष वैद्य रामदास आव्हाड (कोपरगाव). सोबत अन्य मान्यवर.

आर्मी, पोलीस, मॉडेलिंगचे स्वप्न मनात ठेवून तिचे संगीतात मुग्ध अवगाहन

मुग्धा भट-सामंत यांना रागार्पण कार्यक्रमासाठी बंधूंच्या शुभेच्छा

            आजच्या आघाडीच्या शास्त्रीय गायिका ज्यांनी रत्नागिरीचे नाव आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने संपूर्ण महाराष्ट्रात केलेले आहे, त्या मुग्धा भट-सामंत यांचा माझा परिचय साधारण २-३ वर्षांपूर्वी बाळकृष्ण बुवांच्या नावे असलेल्या hike वरील ग्रुपच्या माध्यमातून झाला. त्यापूर्वी त्यांचे मंडळात गाणेही झाले होते. मात्र ते ऐकायचा योग मला आला नव्हता. ग्रुपवर बरेच गायक आणि गायिका व इतर सदस्य असल्याने आणि ग्रुपवर केवळ सांगीतिक आदानप्रदान होत असल्याने त्यांचा-माझा वैयक्तिक संबंध अगर परिचय नव्हता.
योगेशशी २००० मध्ये लग्न झाले. त्यानंतर २००१ मध्ये तिला मुलगा झाला. त्यामुळे तिचे गाणे जवळपास ५ वर्षे बंद होते. पण तिने ते पुन्हा हिमतीने चालू केले, इतकेच नाही तर त्याचा आपल्या भागात प्रचार आणि प्रसार सुरू केला. गाणे शिकवायला सुरवात केली. आज तिच्याकडे खूप मुले शिकतात.
        मला मुग्धाकडे जाण्याचा आणि तिचा संसार आणि तिचे गुरुकुल बघण्याचा योग आला. अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटकी वास्तू, भारावून जावे असे स्वागत व आदरातिथ्य. मी गेलो त्यादिवशी ती खूप गडबडीत आणि व्यस्त होती. पण ती जिथे शिकवते तो हॉल आणि तेथील वातावरण अत्यंत प्रसन्न. कुमार गंधर्वांपासून ती ज्यांना मानते, त्यांच्या तसबिरी अतिशय सुंदर पद्धतीने लावलेल्या, वातावरणात केवळ गाणे आणि गाणे, भारावूनच जावे. काही मुलांची शिकवणी चालू होती.
       मला प्रत्यक्ष मुग्धाचे गाणे ऐकण्याचा योग्य अद्याप आलेला नाही. पण मी तिची जी रेकॉर्डिंग्ज ऐकली आहेत, ती निव्वळ अप्रतिम आहेत. ती खूप आर्ततेने गाते, तिचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा लवकर योग यावा, असे वाटते.
       
         मी पुन्हा एकदा तिला १६ जुलैच्या रागार्पण कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो.
आपल्या आईवडिलांविषयी आपल्याला कृतज्ञता असते. मात्र आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १२-१२ तासाचे अनोख्या संकल्पनेचे कार्यक्रम करणारी मुग्धा एकटीच. मुग्धाविषयी मी अमर्याद लिहू आणि बोलू शकतो, पण आतापुरते थांबतो. मुग्धाला आपले सर्व यश योगेशच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आहे, याची जाणीव आहे. तिचा मुलगा ध्रुव खूप हुशार आणि थोडा खोडकर आहे (मामावर गेलाय!) ती आपल्या संसारात खूप सुखी आहे, याचा एक भाऊ म्हणून मला खूप आनंद आहे.
    एके दिवशी राखी पौर्णिमेला त्यांचा अत्यंत आपुलकीचा एक मेसेज आला, त्याने मी हळवा झालो  आणि त्यानंतर मुग्धा कधी माझी बहीण झाली कळलेच नाही. आमचे एक घट्ट अनुबंध निर्माण झाले आणि मी जसा मुग्धाच्या जवळ आलो आणि मला तिच्याविषयीची माहिती मिळाली, त्याने मात्र मी अवाक् झालो. एका चांगल्या, संस्कारित घरातील ही मुलगी केवळ तिच्या आई आणि आजीमुळे गाणे शिकली. आजची आघाडीची शास्त्रीय गायिका आणि एका गुरुकुलची संस्थापिका बनली. खरे तर तिला आर्मीमध्ये जायचे होते. पोलीस व्हायचे होते. मॉडेलिंग करायचे होते. ती शाळेत NCC  मध्ये होती, ती वॉटर पोलो खेळत असे. स्विमिंगला तर ती नॅशनलपर्यंत गेली होती. तिने काही नाटकांतून कामे केलेली आहेत. नाटक करतानाच तिथे तिला तिच्या आयुष्याचा हिरो आणि जोडीदार योगेश मिळाला.



-    . भैयासाहेब कुलकर्णी, इचलकरंजी
(9822299505)

Thursday 13 July 2017

रत्नागिरीत रविवारी गजानन भट स्मृती शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम - रागार्पण


                रत्नागिरी - गजानन भट स्मृतिप्रीत्यर्थ येत्या रविवारी (ता. १६) रत्नागिरीत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुग्धा भट-सामंत आणि त्यांचा शिष्यवर्ग रागार्पण हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल बारा तास चालणारा रागसमयचक्र कार्यक्रमाचा हा दुसरा भाग आहे.
                आईवडील हे सर्वांचेच पहिले गुरू असतात. त्यांच्यामुळेच त्यांची मुले यश संपादन करू
शकतात. सौ. मुग्धा भट-सामंत यांचीही तशीच धारणा असून त्यांचे वडील कै. गजानन भट यांच्या स्मृतीला अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या संगीताची अधिकाधिक गोडी लागावी व हिंदुस्थानी गायन संस्कृतीचा पाया असलेल्यां रागदारी संगीताकडे जास्तीत जास्त विद्यार्थी वळावा, यासाठी हा कार्यक्रम करण्यात  आला आहे. गेल्या वर्षी १६ जुलै रोजी रागसमयचक्रावर आधारित अशा या कार्यक्रमाचा पहिला भाग अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला. गेल्या वर्षी निशिगंध ते प्राजक्त हा संध्याकाळी ६ ते सकाळी ६ असा रात्रीच्या १२ तासांवर आधारित रागांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. रागसमयचक्रावर आधारित त्याच कार्यक्रमाचा रागार्पण हा दुसरा भाग यावर्षी सादर केला जाणार आहे. त्यामध्ये कोणीही व्यावसायिक कलाकार नाहीत. रत्नागिरीत शास्त्रीय संगीताची साधना करणारे विद्यार्थी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सौ. मुग्धा भट-सामंत आणि त्यांचे ८५ शिष्य गायन सादर करतील. संपूर्ण कार्यक्रमाला दहा साथीदार साथसंगत करतील. त्यामधे रत्नागिरीतील राजू धाक्रस, केदार लिंगायत, पांडुरंग बर्वे आणि मुंबईतील प्रतीक चाळके तबलासाथ, तर मधुसूदन लेलेचैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले हार्मोनियम साथ करतील. सिंथेसाइजरसाथ वैभव फणसळकर आणि ऑक्टोपॅडची साथ प्रवीण पवार करणार आहेत.

                सकाळी ६ ते संध्याकाळी ६ असा दिवसभराच्या १२ तासांचा हा रागार्पण कार्यक्रम येत्या रविवारी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे.

Monday 19 June 2017

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाची राणी लक्ष्मीबाईंना ग्रंथरूप आदरांजली



रत्नागिरी :  रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने झाशीच्या राणीला १५९ व्या पुण्यतिथीला ग्रंथरूप आदरांजली वाहिली. क्रांतिज्वालानामक या गीतसंग्रहाचे प्रकाशन करतानाच या संग्रहातील सर्व गीते सादर करून दुहेरी औचित्य साधले.
          
क्रांतिज्वालाच्या प्रकाशन समारंभात बोलताना अ‍ॅड. विलास कुवळेकर.
व्यासपीठावर उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, माधव हिर्लेकर,  नगराध्यक्ष राहुल पंडित,
 डॉ. श्रीकृष्ण जोशीमाजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे
कर्‍हाडे ब्राह्मण संघातर्फे रविवारी (दि. १८ जून) झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या १५९ व्या पुण्यस्मरणानिमित्त
क्रांतिज्वालापुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यातील राणी लक्ष्मीबाईंचे शौर्य राष्ट्रभक्ती शिकवते. अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी कोणत्याही अपेक्षेशिवाय भारतराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करले. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी आपल्या सर्वांनाच राष्ट्रभक्ती म्हणजे काय हे शिकवण्याची वेळ यावी, हे दुर्दैवच. अशा स्थितीत राणी लक्ष्मीबाईंवर क्रांतिज्वालाया गीतसंग्रहातून डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी समाजाला निश्‍चितच शौर्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव करून दिली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. विलास कुवळेकर यांनी यावेळी केले.
      या वेळी व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, डॉ. जोशी, नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे आदी उपस्थित होते.
      नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्या भाषणात राणी लक्ष्मीबाईंचा पुतळा लवकरच उभारू, अशी ग्वाही दिली. लक्ष्मी चौक या नावाने चौक असला तरी साळवी स्टॉप परिसरामध्ये पुतळा झाला पाहिजे. यातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आठवण व राणी लांज्यातील असल्याने तिच्या शौर्याचे स्मरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
      डॉ. जोशी यांनी मनोगतामध्ये सांगितले, लहानपणी माझे वडील (कै.) सखाराम व आई (कै.) शकुंतला यांनी मला लक्ष्मीबाईंच्या कोट येथील गावी नेले होते. तेव्हा जाणीवपूर्वक दोघांनी लक्ष्मीबाईंची कथा सांगितली. तू राणीवर कविता लिही, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांची इच्छा व माझे स्वप्न पूर्ण होण्याचा योग इतक्या वर्षांनी आला. लक्ष्मीबाईंचे आयुष्य धगधगते होते. तिच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यांचे स्मरण, वाचन पुढच्या पिढीने केले पाहिजे, याकरिता हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक विक्रीतील सर्व फायदा कर्‍हाडे ब्राह्मण संघाला देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
      श्री. हिर्लेकर यांनी स्वागत केले. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. पराग आंबेकर यांनी आभार मानले.
    
उत्तरोत्तर रंगत गेलेली मैफल
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राणी लक्ष्मीबाईंचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडणार्‍या गीतांची
क्रांतिज्वालाही सुरेल मैफलही रंगली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्य, स्वातंत्र्यलढ्याचे धगधगते चित्र या गीतांमधून समोर उभे राहिले. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सुरेख शब्दरचनेला संगीत दिग्दर्शक आनंद प्रभुदेसाई यांनी स्वरसाज चढवला. राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणातून श्रोत्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागविली गेली. राम तांबे आणि सौ. श्‍वेता तांबे-जोगळेकर यांनी गायिलेल्या या गीतांचे संगीत दिग्दर्शन आनंद प्रभुदेसाई यांनी केले होते. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी स्वतःच निवेदन केले. मैफलीत  तबलासाथ राजू धाक्रस, संवादिनी विनय वळामे, सिंथेसायजर वैभव फणसळकर, ऑक्टोपॅड प्रवीण पवार यांनी केली. हरेश केळकर यांनी तालवाद्यांची बाजू सांभाळली. अभिजित नांदगावकर, सुनील बेंडखळे यांनी समूहसाथ केली. आधी नमन विघ्नराजाला, छळ कपट साहती गुलाम अंधारात, करी हिन्दभूध्वजा आणून द्यावी खास, कुठून लाभले काही कळेना पंख विहंगांचे, तुम्ही अंबारीत, हे सदन सुखाचे भरले आनंदाने, घन तिमिराचे, निमिषात कोसळे तिमिराचा घनलोळ, कोसळे आपदा कालगती संपेना, क्षुब्ध जनांचे उष्ण उसासे चेतविती हृदयास, ही कथा क्रांतिज्वालेची आदी गीतांमधून लक्ष्मीबाईंचे संघर्षमय जीवन मैफलीत उलगडले गेले.
मैफलीत रंगून गेलेले श्रोते