Thursday 29 September 2016

दिवाळीच्या मुहूर्तावर 'कोकण मीडिया'चे साप्ताहिक

सप्रेम नमस्कार.

आजवर ब्लॉग, फेसबुक आणि ट्विटवरून संपर्कात असलेल्या ‘कोकण मीडिया कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस’तर्फे आता साप्ताहिक प्रसिद्ध केले जाणार आहे. पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणातले विविध विषय हाताळण्याच्या मुख्य उद्देशाने हे साप्ताहिक प्रसिद्ध होणार आहे. या साप्ताहिकाचा पहिलाच अंक येत्या दीपोत्सवाच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणाची चर्चा नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून आणि वेगवेगळ्या व्यासपीठांवरून होत असते. आंबा-काजूसारखी परदेशवारी करणारी पिके, विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गसुंदर डोंगरदऱ्या आणि असेच वेगळेपण जपणाऱ्या कोकणात दीर्घ काळ टिकलेला, पण काळ बनून आलेला सावित्री नदीवरचा कोसळलेला पूल मोठ्या चर्चेचा विषय झाला. शंभर वर्षांहून अधिक काळ लोटलेला तो आणि तसेच इतर अनेक पूल, ऐतिहासिक ठिकाणे, वास्तू, वाचनालये, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आणि लोकोत्तर व्यक्ती कोकणात आहेत. त्यांच्या आठवणी जागविल्या जाव्यात आणि नव्या संदर्भात त्यांचे वेगळेपण पुन्हा चर्चेला यावे, या उद्देशाने ‘मागोवा : शतकाचा, शतकापूर्वीचा!’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला जाणार आहे.

या अंकाकरिता साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. माहितीसोबत छायाचित्रेही अपेक्षित आहेत. याशिवाय कथा, कविताही स्वीकारल्या जातील. मजकूर पाठवण्यासाठी दहा ऑक्टोबरची मुदत आहे. अंकाच्या वार्षिक वर्गणीसाठी नोंदणी सुरू असून, जाहिरातदारांचेही स्वागत आहे.

संपर्क : ९८२२२५५६२१, ९४२२३८२६२१

ब्लॉग : http://kokanmedia.blogspot.in

ई-मेल : kokanmedia@gmail.com

वेबसाइट : http://kokanmedia.webs.com

फेसबुक : https://facebook.com/kokanmedia

वार्षिक वर्गणीच्या नोंदणीसाठी फॉर्मची लिंक : https://goo.gl/forms/M1MdkiYbUNPrgFjT2

                                                                                                                       
                                                                                                                         आपला, 
                                                                                                                         प्रमोद कोनकर

Thursday 22 September 2016

गौरव की दिशाभूल?

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिल्या क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा ठरला आहे. केंद्र सरकारच्या क्वालिटी कौंसिल ऑफ इंडिया या केंद्रीय समितीच्या अहवालानुसार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्र्यांनी ही घोषणा केली. देशातील सर्वाधिक स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळणे अभिमानास्पद आहे. मात्र जिल्ह्याचा ग्रामीण भाग खरोखरीच स्वच्छ आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेची दिशाभूल तर होत नाही ना, असे वाटते.

...........

Friday 2 September 2016

प्र. ल. मयेकरांवरील लघुपटाची रत्नागिरीत निर्मिती



रत्नागिरी : प्रख्यात नाटककार, लेखक प्र. ल. मयेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने रत्नागिरीतील समर्थ रंगभूमीने त्यांच्यावरील लघुपट तयार केला आहे. दुर्गेश आखाडे यांची संकल्पना आणि पटकथा असलेल्या या लघुपटाची निर्मिती श्रीकांत पाटील यांनी केली असून रत्नागिरीतील ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे यांनी छायाचित्रणाची बाजू सांभाळली आहे. रत्नागिरीत आज (दि. २ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राजापूर (जि. रत्नागिरी) तालुक्यातील आडिवरे-कोंभेवाडी हे प्रभाकर लक्ष्मण मयेकर ऊर्फ प्र. ल. मयेकर यांचे मूळचे गाव. वडिलांच्या बेस्टमधील नोकरीमुळे ते मुंबईत गेले. कालांतराने त्यांनाही बेस्टमध्ये नोकरी मिळाली. ती सांभाळतच त्यांनी विपुल नाट्यलेखन केले. निवृत्तीनंतर सुमारे दहा वर्षे ते रत्नागिरीत राहिले होते. त्या काळात त्यांचा रत्नागिरीतील अनेकांशी स्नेह प्रस्थापित झाला. त्यापैकी पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी मयेकरांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी लघुपटाची संकल्पना मांडली. समर्थ रंगभूमीने ती उचलून धरली आणि ४७ मिनिटांचा हा लघुपट निर्माण झाला. त्यामध्ये प्रलंची व्यावसायिक नाटके, राज्य नाट्य स्पर्धेतील नाटके, एकांकिका, दूरचित्रवाणी मालिका, कथा, चित्रपट आणि लघुपट इत्यादींचा आढावा घेण्यात आला आहे. त्यांच्या मुलाखती आणि भाषणांमधील काही क्षण, रत्नगिरीतील कार्यक्रमातील दृश्ये, आडिवरे येथील त्यांचे घर, मयेकरांना राज्य नाट्य स्पर्धेत पहिले यश मिळवून देणाऱ्या मा अस साबरिनचे दुर्मिळ छायचित्र, बेस्ट कला क्रीडा मंडळाने सादर केलेल्या प्रयोगांची छायचित्रे, नाटक आणि चित्रपटांतील काही दृश्ये इत्यादींचाही समावेश आहे. लघुपटाचे संकलन धीरज पार्सेकर यांनी केले असून ध्वनिमुद्रण रत्नागिरीतील उदयराज सावंत यांनी, तर पार्श्वसंगीत योगेश मांडवकर यांनी केले आहे. सजावट विवेक वाडिये यांचे असून अविनाश नारकर, प्रमोद पवार आणि मयूरा जोशी यांनी निवेदन केले आहे. श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी दिग्दर्शन केले असून देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांनी निर्मितीसाठी साह्य केले आहे. लघुपटामध्ये अभिनेता अरुण नलावडे, संजय मोने, चिन्मय मांडलेकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, शीतल शुक्ल, माधवी जुवेकर, निर्माता कुमार सोहनी, प्रसाद कांबळी, नाट्यलेखक गंगाराम गवाणकर, पटकथाकार कांचन नायक, चंद्रलेखा संस्थेच्या पद्मश्री मोहन वाघ, डॉ. रवी बापट, विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे, ध्वनिसंयोजक अविनाश बोरकर, नेपथ्यकार प्रकाश मयेकर तसेच श्रीकांत पाटील यांनीही मयेकरांसोबतचे अनुभव कथन केले आहेत.
      लघुपटाच्या छायाचित्रणासाठी अत्याधुनिक 5 डी कॅमेरा वापरण्यात आला असून अजय बाष्टे यांनी उत्तम चित्रीकरण केले आहे.
......................
लघुपटनिर्मितीची समर्थ रंगभूमीची भूमिका
प्र. ल. मयेकर आणि समर्थ रंगभूमीचे अतिशय जवळच नाते होते. मयेकरांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी २००७ मध्ये समर्थ रंगभूमीसाठी कुंतीप र्थिवा हे नाटक लिहिले होते. त्याचबरोबर प्र. लं.च्या पाच एकांकिकांच्या पुस्तकाचे प्रकाशनही समर्थ रंगभूमीने २००७ मध्ये केले होते.
      प्र. ल. मयेकर यांचे १८ ऑगस्ट २०१५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यानंतर प्र. लं.चे जवळचे मित्र पत्रकार दुर्गेश आखाडे यांनी प्र. लं.वर लघुपट करण्याची संकल्पना मांडली. त्यांनी घेतलेल्या प्र. लं.च्या मुलाखती आणि विविध कार्यक्रमांची दृश्ये आखाडे यांनी संग्रहित केली होती. त्याचा उपयोग करून घेऊन लघुपट करण्याचा निर्णय झाला. समर्थ रंगभूमीचे श्रीकांत पाटील आणि आखाडे यांनी प्र. लं.च्या लघुपटावर काम करण्यास सप्टेंबर २०१५ मध्ये सुरुवात केली. लघुपटाची संकल्पना आणि उपलब्ध असलेले प्र. लं.चे व्हिडिओ घेऊन अभिनेता अविनाश नारकर यांची दुर्गेश आखाडे यांनी मुंबईत जाऊन भेट घेतली. नारकर यांना लघुपटाची संकल्पना आवडली. लघुपटाची कथा आणि पटकथा आखाडे यांनी लिहिली.
त्यानंतर प्र. लं.सोबत काम केलेल्या कलाकारांचे संपर्क क्रमांक मिळवण्यास सुरुवात केली. प्र. लं. ची मुलगी विशाखा मयेकर-सहस्रबुद्धे आणि मयेकरांचे स्नेही अविनाश बोरकर यांचे या कामात मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर मयेकरांच्या लघुपटाची कथा तयार करण्यात आली. छायचित्रणाची जबाबदारी रत्नगिरीतील नामवंत छायचित्रकार अजय बाष्टे यांनी उचलली. 5 डीसारखा अत्याधुनिक कॅमेरा त्यांनी या लघुपटासाठी वापरला. लघुपटाचे दिग्दर्शन श्रीकांत पाटील आणि दुर्गेश आखाडे यांनी केले आहे. डिसेंबरमध्ये कलाकारांच्या डेटस घेऊन दोन दिवस मुंबईत चित्रीकरण करण्यात आले. त्यानंतर जानेवारीत प्र. लं.चे मूळ गाव राजापूर तालुक्यातील आडिवरे कोंभेवाडीतील त्यांचे जन्मघर आणि शाळेचे चित्रीकरण करण्यात आले. लघुपटाचे निवेदन दिग्गज अभिनेता अविनाश नारकर आणि मूळची रत्नागिरीची आणि प्र. लं.च्या पाठिंब्याने मुंबईत जाऊन व्यावसयिक रंगभूमीवर आपला ठसा उमटविणारी अभिनेत्री मयूरा जोशी हिनेही केले आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये लघुपटाचे निवेदन चित्रीत करण्यात आले. मे महिन्यात रत्नगिरीतील उदयराज सावंत यांच्या एस. कुमार स्टुडिओमध्ये व्हॉइस ओव्हर ध्वनिमुद्रित करण्यात आला. नामवंत निवेदक आणि अभिनेते प्रमोद पवार यांचा खणखणीत आवाज या लघुपटाला मिळाला आहे.  व्हॉइस ओव्हरसाठी प्रमोद पवार खास रत्नागिरीत आले होते.
      लघुपटाचा सर्वांत महत्त्वाचा भाग होता तो संकलनाचा. आज फायनल कट प्रो हे सॉफ्टवेअर मालिका आणि चित्रपटांसाठी वापरतात. प्र. ल. लघुपटाची उंची वाढण्यासाठी त्या सॉफ्टवेअरमध्ये संकलन करण्याचा निर्णय घेतला. हे सॉफ्टवेअर रत्नागिरीत उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबईमध्ये संकलन करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. लघुपटाचे संकलन मुंबईत धीरज पार्सेकर यांनी उत्तमरीत्या करून लघुपटाचा दर्जा उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. नाट्यलेखक राजेश मयेकर आणि मनीष कदम यांचे संकलनासाठी मोलाचे योगदान लाभले. लघुपटाचे शीर्षक आणि डीव्हीडी कव्हरची सजावट विवेक वाडिये यांनी अतिशय अप्रतिम केली आहे. लघुपटासाठी देवीलाल इंगळे आणि सुनील भोंगले यांचे निर्मिती साह्य लाभले. या सर्वांच्या मेहनतीमधून ४७ मिनिटांचा प्र. ल. हा लघुपट जन्माला आला. रत्नागिरीतील कलाकारांनी व्यावसयिक कलाकारांबरोबर काम करत लघुपट तयार करण्याचा हा यशस्वी प्रयत्न समर्थ रंगभूमीने केला आहे. या लघुपटाच्या निमित्ताने प्र. ल. मयेकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न नाटकाकाराचा इतिहास जगासमोर आला आहे. नव्या पिढीला प्र. लं.ची माहिती होणार आहे.

 ..............
संपर्कासाठी –
श्रीकांत पाटील - ९४२३०४९७०५
दुर्गेश आखाडे - ९४२२६३६९५०
अजय बाष्टे - ९९७५५५१६५५

Thursday 1 September 2016

पडद्यामागच्या कलाकारांना व्यासपीठ

प्रभावी गायनाने गायक रसिकप्रिय होतात. त्यामागे गायकाबरोबरच गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या असंख्य कलाकारांची मेहनत असते.  काही अपवाद वगळता असे कलाकार पडद्यामागेच राहतात. त्यांच्या कलेला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्यांनाही पुरेसा वाव मिळत नाही. अशा कलाकारांचा परिचय करून देणारे अभिनव संकेतस्थळ रत्नागिरीच्या विधाता म्युझिक संस्थेने सुरू केले आहे. पडद्यामागच्या कलाकारांसाठी ते हक्काचे व्यासपीठ आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या मते एक चळवळ ठरणार आहे.

..............

......................

Wednesday 31 August 2016

राजापूरच्या गंगेचे आगमन

             
 रत्नागिरी : राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि निसर्गाचा चमत्कार मानल्या गेलेल्या राजापूरच्या गंगेचे आज (दि. ३१ ऑगस्ट) सकाळी साडेपाच वाजण्याच्या आगमन झाले आहे. चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगा याठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहित झाली आहे.
             सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी राजापूरची गंगा प्रकट होते, असे मानले जाते. प्रामुख्याने उन्हाळ्यात आणि दुष्काळस्थिती असताना गंगा अनेकदा आली आहे. गेली चार वर्षे मात्र साऱ्यांचे अंदाज चुकवत गंगा पावसाळ्यातही प्रकट होत आहे. तीन वर्षांचा नियमही बाजूला राहिला आहे. गेल्यावर्षी २७ जुलै रोजी गंगेचे आगमन झाले होते. सुमारे १०२ दिवस वास्तव्य केल्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी गंगा अंतर्धान पावली. त्यानंतर सुमारे आठच महिन्यांत पुन्हा एकदा गंगा आली आहे. गेल्या काही वर्षामध्ये गंगामाईच्या आगमनामध्ये अनेकदा बदल झाला आहे. गंगा दरवर्षीच येऊ लागली आहे. त्यामुळे गंगेच्या आगमनाच्या अफवाही अनेकदा पसरल्या. आज सकाळीही गंगा आल्याची बातमी सर्वदूर पसरताच सुरुवातीला अनेकांना ती अफवाच वाटली. त्यामुळे अनेकांनी गंगामाईच्या आगमनाची पाहणी करण्यासाठी गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली. तेथे गंगा आल्याचे पाहिल्यानंतर अनेकांनी पहिल्या स्नानाचीही पर्वणी साधली. सध्या गंगातीर्थक्षेत्री लोकांची गर्दी झाली नसली, तरी गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठ्या संख्येने कोकणात दाखल होणारे मुंबईकर गंगास्नानाची पर्वणी साधण्याची शक्यता आहे.

Monday 22 August 2016

लहानपणीच संगीत संस्कार केल्यास मुले मानसिकदृष्ट्या सशक्त : प्रा. अनिल सामंत

कुडाळ : संगीत आणि मनाचा थेट संबंध आहे. आजकालच्या अस्थिर वातावरणात मुलांवर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार केले, तर मुले मानसिकदृष्ट्या सशक्त होतील, असे प्रतिपादन गोवा कला अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी येथे व्यक्त केले.
-          कुडाळ – विद्याभारतीच्या संगीत प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
प्रास्ताविक करताना भाई उपाले. शेजारी डॉ. सौ. मेधा फणसळकर, प्रा. श्रीशरण
मडगावकर, प्रा. अनिल सामंत, डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, प्रा. अरुण मराठे.
सिंधुदुर्ग जिल्हा विद्याभारतीतर्फे शिशुवाटिका आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी एक दिवसाची संगीत प्रशिक्षण कार्यशाळा रविवारी (ता. २१) आयोजित करण्यात आली होती. दामले मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. लहान मुलांवर संगीताचा कसा परिणाम होतो, हे त्यांनी स्पष्ट केले. विद्याभारतीचे कोकण प्रांत संघटन मंत्री भाई उपाले यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. ज्या घरात लहान मुले मोठ्या प्रमाणावर दंगामस्ती करतात आणि अस्वस्थ असतात, अशा घरांमध्ये संगीताची जास्त आवश्यकता असते. संगीतामुळे मुले शांत व्हायला मदत होते, असेही त्यांनी सांगितले. ज्या घरात जात्यावरच्या ओव्या, अंगाईगीते, अभंग इत्यादींमधून संगीताचा आविष्कार होतो, त्यामधूनही मुलांवर संस्कार होतात. अलीकडे घरांमधील जात्यांची जागा अत्याधुनिक यंत्रांनी घेतली असल्याने ओव्याही कालबाह्य झाल्या आहेत. मात्र त्यामुळेच मुलांवर संस्कार करण्याचे साधनच आपण हरवून बसलो आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
दीपप्रज्वलन आणि सामूहिक वंदनेनंतर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यशाळेत प्रा. सामंत यांच्याबरोबरच सौ. संध्या कामत, प्रा. अरुण मराठे, प्रा. श्रीशरण मडगावकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. सामंत यांनी अनेक संगीत कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले असून ते कवी, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत. सौ. संध्या कामत संगीत विशारद आणि संगीत शिक्षिका असून त्यांनी अनेक संगीत कार्यशाळांमध्ये अध्यापन केले आहे. प्रा. अरुण मराठे विद्याप्रबोधिनी महाविद्यालयात प्राध्यापक असून नाट्य आणि संगीत कार्यशाळांमध्ये विद्यार्थी तसेच शिक्षकांना ते मार्गदर्शन करतात. प्रा. श्रीशरण मडगावकर पुरुषोत्तम वालावलकर उच्च महाविद्यालयात हिंदी, मराठीचे प्राध्यापक  आहेत. ते उत्तम तबलावादक असून त्यांनीही अनेक संगीत कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, मालवण, कणकवली आणि देवगड तालुक्यातील शिशुवाटिका आणि अंगणवाड्यांमधील ७४ कार्यकर्त्या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी विद्याभारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. मुरलीधर प्रभुदेसाई, सदस्य डॉ. सौ. माधुरी प्रभुदेसाई, डॉ. सौ. रश्मी कार्लेकर, राजू मराठे इत्यादी उपस्थित होते.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन विद्याभारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्षा डॉ. मेधा फणसळकर यांनी केले.

.......
-          कार्यशाळेतील संगीतमय वातावरणात तल्लीन झालेल्या कार्यकर्त्या.

Saturday 20 August 2016

पडद्यामागच्या कलाकारांसाठीची विधाता म्युझिकची चळवळ गौरवास्पद – अशोक पत्की



गणेशोत्सवासाठी पावला गणराजाअल्बमचे मुंबईत प्रकाशन

मुंबई : गायक कलाकारांप्रमाणेच त्यांना साथ देणाऱ्या पडद्यामागच्या असंख्य कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीच्या विधाता म्युझिकने संकेतस्थळाच्या माध्यमातून सुरू केलेली चळवळ गौरवास्पद आहे. गौरांग आगाशे याने त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला सर्वांनीच साथ दिली पाहिजे, असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार, संगीत संयोजक, अशोक पत्की यांनी काल (ता. १९) मुंबईत काढले.
मुंबई – रत्नागिरीतील विधाता म्युझिक संस्थेच्या पावला गणराजा
ध्वनिफितीचे प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रकाशन करताना
आमदार उदय सामंत, शंकर अभ्यंकर, अशोक पत्की,
गौरांग आगाशे, अभिजित भट
गायकाचे गाणे रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी झटणाऱ्या पडद्यामागच्या संगीत कलाकारांचा परिचय करून देणाऱ्या विधाताम्युझिकआरटीएन (www.vidhatamusicrtn.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन श्री. पत्की यांच्या हस्ते काल मुंबईत प्रभादेवीतील रवींद्र नाट्यगृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सतारवादक शंकर अभ्यंकर आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. श्री. पत्की म्हणाले की, मी नेहमी भाषणातून सांगत आलो आहे की सर्व कलाकारांचा विचार झाला पाहिजे. पडद्यामागील कलाकारांना व्यासपीठ मिळायलाच हवे. रत्नागिरीच्या गौरांग आगाशे त्यासाठी प्रयत्न करत आहे, याचे मला कौतुक वाटते. त्याला या क्षेत्रातील सर्वांनीच मदत करायला हवी. श्री. अभ्यंकर यांनीही या कार्याला शुभेच्छा दिल्या. आमदार उदय सामंत म्हणाले की, रत्नागिरीच्या कलाकारांनी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरासारख्या नाट्यगृहात कार्यक्रम करणे हेच मोठे धाडसाचे आहे. यापुढे या उपक्रमासाठी आवश्यक असेल, ती सर्व मदत मी देणार आहे.
     
यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावला गणराजाअल्बमचेही प्रकाशन करण्यात आले. गौरांग आगाशे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली. कोणतेही गीत परिपूर्ण करण्यासाठी संगीत संयोजक, वादकांसह पडद्यामागचे इतर अनेक हात झटत असतात. त्यांचा परिचय रसिकांना कधीच होत नाही. तो करून देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. सर्व विद्यमान आणि उदयोन्मुख कलाकारांना त्यामुळे संधी मिळणार आहे. पावला गणराजाया ध्वनिफितीतील सर्व गाणीही संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक, १२ उदयोन्मुख आणि प्रथितयश गीतकार, १४ तरुण, नामवंत गायक, ८ लोकप्रिय गायिका, १३ यशस्वी तसेच उदयोन्मुख संगीतकार, १९ सुप्रसिद्ध वादक, २१ कोरस गायक, २ वेबसाइट डिझायनर, २ छायाचित्रकार, १ सीडी डिझायनर, मुंबई-पुणे, कोकणासह विविध ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १२० जणांचे मोलाचे योगदान आहे. त्या सर्वांचा परिचयही संकेतस्थळावर करून देण्यात आला आहे.
      उद्घाटन समारंभाला रत्नागिरी आणि मुंबईतील संगीतप्रेमींनी गर्दी केली होती.  संकेतस्थळाचे औपचारिक उद्घाटन होताच अनेकांनी संकेतस्थळाला भेट दिली.

......................................................................................................................................