Wednesday 15 June 2016

कोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरपूर वाव – लक्ष्मीनारायण मिश्रा



रत्नागिरी : भारतीय प्रशासकीय सेवेसाठी आवश्यक असलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी तरुण अलीकडे यश मिळविताना दिसत असले, तरी कोकणातील तरुणांचा मात्र त्यामध्ये अभाव दिसतो. त्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी भरपूर वाव आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी रविवारी (ता. १२) येथे व्यक्त केले.

  रत्नागिरी – कबीर अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात
बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा.
शेजारी संजीव कबीर आणि डॉ. धनाजी कदम
नवी दिल्लीतील करिअर क्वेस्ट आणि कबीर अॅकॅडमीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र रत्नागिरीत सुरू केले आहे. त्याविषयी तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या अनुभवाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे अधिकारी डॉ. धनाजी कदम यांनीही मार्गदर्शन केले. प्रारंभी वन विभाग, त्यानंतर प्राप्तिकर विभाग आणि अखेर प्रशासकीय सेवेत दाखल झालेले श्री. मिश्रा म्हणाले की, यूपीएससीसाठी दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्यापैकी २५ हजार मुले मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात आणि केवळ ८०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० जणांना शासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. अशा कठीण पातळीवरच्या या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहेत. मुळात परीक्षांची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा दर्जा सतत उच्च राखण्यासाठी दरवर्षी परीक्षा पद्धतीत बदल होत असतो. त्यामुळे सर्वांत प्रथम आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने अभ्यास केला पाहिजे. अभ्यासक्रमामधून स्वतःच्या आवडीचा विषय कोणता, त्याचे अभ्याससाहित्य किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि त्या विषयात आपण अधिकाधिक गुण मिळवू शकतो का, याचा विचार करूनच विषय निवडावा. अभ्याससाहित्यासाठी आता केवळ पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत नाही. सिव्हिल सर्व्हिस आणि यूपीएससी पोर्टल या संकेतस्थळांसह इंटरनेटवर असंख्य पुस्तके आणि माहितीचा खजिनाच उपलब्ध आहे. दैनिक ताज्या घडामोडींचे ज्ञान अद्ययावत ठेवतानाच सर्व घडामोडींमधून भविष्याचा वेध घेऊनच अभ्यासाची तयार केली पाहिजे. त्याकरिता हिंदू, क्रॉनिकलसारख्या नियतकालिकांचे नियमित वाचन आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांचे पेपर्स पाहून परीक्षांचा कल लक्षात घेऊन अभ्यासाची दिशा ठरवायला हवी. एखाद्या प्रश्नाकडे विविध दृष्टिकोनातून पाहण्याकरिता सकारात्मक ग्रुप डिस्कशनचा चांगला उपयोग होतो. प्रत्येक विषयाचे पाच ते दहा महत्त्वाचे मुद्दे काढता आले पाहिजेत. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे टप्पे ओलांडल्यानंतर मुलाखतीचा महत्त्वाचा टप्पा येतो. मुलाखतीला सामोरे जाताना विकास, गरिबी, महिला आणि भारतीय लोकशाहीच्या बाबतीत सकारात्मक उत्तरे दिली गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अवांतर वाचनावर भर दिला पाहिजे, असे सांगून धनाजी कदम म्हणाले की, नागरी सेवांना इतरही अनेक पर्याय आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी ताज्या घटनांची केवळ माहिती असून उपयोगाची नाही. त्यावर विश्लेषण करता आले पाहिजे. वृत्तपत्रांचे नियमित वाचन करताना अभ्यासक्रम, नकाशे आणि शब्दकोश जवळ असायलाच हवा. दररोज किमान दहा नवे शब्द आपल्या शब्दकोशात जमा झाले पाहिजेत. आपण प्रशासकीय सेवेत जाणार आहोत, हे लक्षात घेऊन वृत्तपत्रे आणि मुख्यत्वे राजकीय बातम्या वाचताना एकाच बाजूने विचार करू नये. त्या त्या घटनांच्या विश्लेषणावर भर दिला पाहिजे. अभ्यासाच्या वेळी लेखन, सादरीकरण आणि कौशल्यविकासासाठी प्रारंभापासूनच प्रयत्न केले पाहिजेत.
व्याख्यानांनंतरच्या शंकासमाधानाच्या सत्रात श्री. मिश्रा आणि डॉ. कदम यांनी विषय कसा निवडावा, तयारी कशी करावी, वृत्तपत्रे कशी वाचावीत, प्रत्यक्ष पेपर कसे लिहावेत आणि मुलाखत कशी द्यावी, याविषयी सोदाहरण माहिती दिली.
कबीर अॅकॅडमीचे संजीव कबीर यांनी अॅकॅडमीतर्फे सुरू होणार असलेल्या सहा महिने ते दोन वर्षे कालावधीच्या तीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. एमपीएससी, यूपीएससी, एसएससी, बँका तसेच अन्य शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती यावेळी देण्यात आली.
...........................
कबीर अॅकॅडमीचा संपर्क - (व्हॉट्स अप) - 0990840999 

Tuesday 7 June 2016

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना चाकरमान्याने मुंबईतून फोन करून सोडविली समस्या

सरकारी काम आणि सहा महिने थांब, या म्हणीला आता खरोखरीच तडा जाणार काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. आपला एखादा प्रश्न सोडवायचा असेल, तर कागदपत्रे आणि अर्जविनंत्या करून करून सामान्य माणूस थकून जातो. पण आता यापुढे हे कागदी घोडे नाचवावे लागणार नाहीत. समस्या तितकीच महत्त्वाची असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांना एक फोन करून ही समस्या सोडविता येऊ शकेल. सेवानिवृत्तीनंतर मुंबईत राहायला गेलेल्या प्रभाकर महाजन या रत्नागिरीच्या चाकरमान्याने ६ जून २०१६ रोजी हा अनुभव घेतला. राज्य शासनाच्या फोन इन लोकशाही दिनाच्या नव्या उपक्रमामुळे हे शक्य झाले.
शासनाने जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जांबरोबरच ज्या नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने प्रायोगिक तत्त्वावर फोनद्वारे संपर्क साधून निवेदन स्वीकारण्याचा आणि शक्य असेल, तर त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ जून दुपारी १ ते ३ या वेळेत झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात फोनद्वारे निवेदने स्वीकारण्यात आली. या फोन इन लोकशाही दिनाची माहिती मिळताच सर्वप्रथम मुंबईतून प्रभाकर महाजन यांनी १०७७ या टोलफ्री क्रमांकावर फोन केला. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी हा फोन स्वीकारला आणि श्री. महाजन यांची कैफियत ऐकून घेतली. श्री. महाजन भूविकास बँकेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांना अद्याप सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. याबाबत त्यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र त्यांचा प्रश्न सोडविला गेला नाही. त्यामुळे त्यांनी फोन इन लोकशाही दिनाचा आधार घेतला. त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीशी संबंधित असणाऱ्या सहकारी संस्था उपनिबंधक श्रीमती बी. एस. माळी यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर श्री. महाजन यांचे प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती माळी यांना दिल्या.
फोन इन लोकशाही दिनातील दुसरा फोन पुर्ये तर्फ देवळे (ता. संगमेश्वर) येथील दत्ताराम ठाकर यांनी केला होता. ग्रामपंचायतीने नियमबाह्य घरपट्टी आकारल्याचे त्यांचे म्हणणे होते. श्री. ठाकर यांनी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सांगितली. जिल्हाधिकाऱ्यांनी ती ऐकून घेतली आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या अखत्यारीतील ही तक्रार असल्याने त्या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांना त्याची माहिती दिली आणि या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करण्याच्या सूचना त्यांना दिल्या.
        रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता अनेक नागरिकांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. अशावेळी फोन इन लोकशाही दिनाचा पर्याय उपलब्ध झाल्याने लोकशाही दिनाला प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या नागरिकानी समाधान व्यक्त केले. यापुढेही फोन इन लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
       अन्य शासकीय योजनेप्रमाणेच फोन इन लोकशाही दिनाची तक्रार चांगली आहे. मात्र नेहमीच्या लोकशाही दिनात तक्रार एका महिन्यात निकाली काढण्याचे बंधन आहे. तसे फोन इन लोकशाही दिनाच्या तक्रारीला बंधन आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. फोन इन लोकशाही दिनही महिन्यातून एकदाच होणार आहे. त्याच दिवशी ठरलेल्या वेळेत फोन स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे फोनवरून तक्रार करूनही त्याचे निवारण झाले नाही, तर कोणाकडे आणि केव्हा संपर्क साधायचा, याबाबत स्पष्टीकरण नाही. ते झाले, तरच योजना यशस्वी होऊ शकेल.
      
-    प्रमोद कोनकर

pramodkonkar@yahoo.com

Sunday 5 June 2016

सचोटीचा व्यवसाय करणे म्हणजे देशसेवाच – रवींद्र प्रभुदेसाई

रत्नागिरी - कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सचे उद्घाटन
करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी,
शेजारी उमेश आंबर्डेकर, मनोज कळके, रवींद्र प्रभुदेसाई, रुची महाजनी
रत्नागिरी : गरजूंना रोजगार देणे आणि सर्व कर भरून केला जाणारा व्यवसाय म्हणजे देशसेवाच आहे, असे मत पितांबरी उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे रत्नागिरीत आज (ता. ५) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या पहिल्या बिझिनेस कॉन्फरन्समध्ये व्यवसायाच्या अभिनव कल्पना या विषयावर ते बोलत होते. पितांबरी उद्योगाचा प्रारंभ आणि विकासाची माहिती देतानाच घरोघरी वापरल्या जाणाऱ्या विविध उत्पादनांची उदाहरणे देऊन ते म्हणाले की, ग्राहकाच्या मनावर राज्य करेल, तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून जग जिंकेल. व्यवसाय करून इच्छिणाऱ्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी क्षमता असते. आपल्यातील क्षमता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. संगणक आणि इतर यंत्रसामग्री नव्हे, तर व्यवसायातील माणसेच धंदा करतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. माणसांची किंमत जाणून घ्यायला हवी. व्यवसाय म्हणजे फायदा हेच मनात ठसवून उद्योजकीय मानसिकता विकसित केली पाहिजे. आपल्या व्यवसायाची विशिष्ट ओळख निर्माण करून आपला ग्राहक आपण शोधला, तर व्यवसाय करणे कठीण नाही. इनोव्हेशन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग ही फायदेशीर व्यवसायाची त्रिसूत्री आहे. व्यक्तिगत जीवनात ध्यानधारणा आणि ब्रह्मविद्येसारखी मन शांत ठेवायला मदत करणारी साधनाही दररोज करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्योगाचे अर्थ आणि आणि नियोजन या विषयावर मार्गदर्शन करताना ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी म्हणाले की, वाढ होत असेल, तरच कोणताही व्यवसाय टिकतो. व्यवसायात वेळोवेळी बदल करणे आवश्यक आहे. व्यवसाय वाढवायचा असेल, तर स्वस्तात भांडवल उपलब्ध करण्याचा मार्ग निवडला पाहिजे. प्राप्तिकर किंवा रिटर्न्स भरण्याची वेळ येऊ नये, ही मानसिकता आधी बदलली पाहिजे. रिटर्न्स भरले असतील, तर बँकांकडून कर्ज सुलभतेने मिळू शकते. तरच भांडवल उभे राहू शकते. व्यवसाय वाढवायचा असेल, तर तो प्रोप्रायटरी न ठेवता प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपनीपर्यंत विस्तारित करून कंपनीचे भागधारक वाढविले पाहिजेत. आगामी काळात चलनी व्यवहार बंद होऊन ऑनलाइन व्यवहार वाढणार आहेत, हे लक्षात घेऊन छोट्यात छोट्या व्यावसायिकांनीसुद्धा आपल्या व्यवसायाच्या आर्थिक व्यवहारांना तंत्रज्ञानाची जोड द्यायला हवी. योग दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यामागील भूमिका श्री. महाजनी यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, योगाचा प्रसार झाला, तर लोक खाण्यापिण्याच्या सवयी बदलतील. अधिक स्वास्थ्यपूर्ण आहार घेतील. त्यात वाढ झाली, तर शरीराला अपायकारक फसफसणाऱ्या पेयांसारख्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय कमी होऊन ताज्या फळांच्या रसाची मागणी वाढण्यात परिवर्तित होईल.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमविषयी ठाण्याचे मनोज कळके यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, काठियावाडी, पालनपुरी आणि मारवाडी लोकांनी आपल्या ज्ञातीच्या माध्यमातून एकमेकांना साह्य करून व्यवसाय वाढविला. पोलाद उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा यांनी पारशी जमातीसाठी १८८४ साली स्थापन केलेल्या मंडळाचा एवढा विस्तार झाला, की मुंबईतील कोणीही पारशी व्यक्ती आजही घरासाठी कर्ज घेत नाही. पारशी जमातीकडूनच त्यांना घरासाठी कर्ज मिळते. अशा जमातींकडून प्रेरणा घेऊनच केबीबीएफची स्थापना करण्यात आली आहे. ठाणे, डोंबिवली, पुणे, बेळगावनंतर कोकणात या फोरमचा विस्तार होत आहे. संपर्क वाढावा आणि त्यातून व्यवसाय वाढीस लागावा, हा त्यामागचा उद्देश आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्समध्ये आपले विचार
व्यक्त करताना रवींद्र प्रभुदेसाई. शेजारी रुची महाजनी,
नरेंद्र महाजनी, मनोज कळके
कॉन्फरन्सला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६० उद्योजकांनी नोंदणी केली. यापुढे दर महिन्याला कॉन्फरन्सची बैठक रत्नागिरीत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यात फोरमची शाखा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.

योगेश मुळ्ये यांनी प्रास्ताविक केले, तर प्रशांत पाध्ये यांनी आभार मानले.

Saturday 4 June 2016

कऱ्हाडे बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला प्रतिसाद

रत्नागिरी : उद्या (दि. ५ जून) रत्नागिरीत होत असलेल्या पहिल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्सच्या नावनोंदणीला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. सुमारे शंभर उद्योजकांनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे.
कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या बिझिनेस फोरमतर्फे पहिली कॉन्फरन्स रविवारी रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी, प्रशांत पाध्ये इत्यादी व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. त्याकरिता सशुल्क नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यवसाय या विषयासाठी अशा तऱ्हेची परिषद भरविणे गरजेचे होते. परिषदेत ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी (उद्योगाचे अर्थ आणि नियोजन), मनोज कळके (केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे) आणि पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई (व्यवसायाच्या अभिनव कल्पना) यांची व्याख्याने होणार असल्याने व्याससायिक मार्गदर्शनाची गरज पूर्ण होणार आहे. नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय वाढविण्यासाठी ही परिषद मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा नोंदणी केलेल्या उद्योजकांनी व्यक्त केली.
       दरम्यान, उद्याच्या कॉन्फरन्सची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये इच्छुक उद्योजकांनी उद्याही नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.....................
संपर्क १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९
२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९
३) रुची महाजनी ९८८११५९३२०
४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४                  

Thursday 2 June 2016

रत्नागिरीचे जाणीव फौंडेशन घेणार एक गाव दत्तक

रत्नागिरी : येथील जाणीव फौंडेशनतर्फे तालुक्यातील एक गाव दत्तक घेऊन ते सुजलाम् सुफलाम् करण्यात येणार आहे. या गावात शैक्षणिक, पर्यावरण उपक्रम, पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याकरिता गावाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून इच्छुक गावांनी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जाणीव संस्थेने केले आहे.
जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे, सचिव नीलेश मुळ्ये, उमेश महामुनी, संजय शिंदे, अमित येदरे, सुशील जाधव, प्राजक्ता मुळे यांनी आज (दि. २ जून) पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गेल्या पाच वर्षांपासून जाणीव रक्तदात्यांची यादी तयार करून रक्तदानास सहकार्य करत आहे. करबुडे-बौद्धवाडी (ता. रत्नागिरी) येथील शाळेवर ४ लाख खर्च करून कायापालट केला आहे.
दोन वर्षांपूर्वी दत्तक गाव घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. याकरिता आम्ही मदत करावी, अशी गावांची अपेक्षा होती. पण लोकांचा सहभाग मिळत नव्हता. त्यामुळेच या योजनेसाठी इच्छुक गावांचे प्रस्ताव मागवले आहेत. यात ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा आहे. या उपक्रमात लागणारा निधी हितचिंतकांकडून मिळणार असून कार्यक्रमातून निधी गोळा केला जाईल, असे श्री. गर्दे यांनी सांगितले.
या उपक्रमात सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग हवा. गावात शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबवले जातील. स्वच्छता, वृक्षारोपण, गाव रोगमुक्त करणे, मुलांकडून गावाचा प्रकल्प करणे, संगणक साक्षरता, महिला बचत गट स्थापना, आरोग्य शिबिरे, शाळेला भौतिक सुविधा, सौरदीप दिले जातील. एकंदरीत स्वच्छ, सुंदर हरित ग्राम करण्यासाठी प्रयत्न राहील. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत. गावांचे प्रस्ताव आल्यानंतर छाननी करून निवडक गावांची पाहणी केली जाईल. त्यातून एक गाव निवडण्यात येईल. त्यानंतर कामाला सुरवात केली जाईल. साधारण तीन ते पाच वर्षे गावात उपक्रम राबवले जाणार आहेत.
प्रस्ताव पाठवण्याकरिता ग्रामपंचायतीचा अर्ज, सदस्य, तलाठी आदींची नावे, गावाची थोडक्यात माहिती, भौगोलिक स्थिती, शाळेची माहिती, साध्या कागदावर सरपंचांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. हे प्रस्ताव १) महेश गर्दे, विहार वैभव, टिळक आळी नाका, रत्नागिरी, (९४२२००३१२८) २) नीलेश मुळ्ये, अ‍ॅपेक्स हॉलिडे, शिवाजीनगर, रत्नागिरी, (८५५४८५४१११) ३) उमेश महामुनी, श्रावणी ग्राफिक्स, मारुती मंदिर, रत्नागिरी (८१८००३२४२४) यांच्याकडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
.................




Wednesday 1 June 2016

रत्नागिरीत रविवारी कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स



रत्नागिरी : नव्याने स्थापन झालेल्या कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस फोरमतर्फे येत्या रविवारी (ता. ५) रत्नागिरी पहिली कऱ्हाडे ब्राह्मण बिझिनेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
       उपजीविकेसाठी नोकरीचा पारंपरिक पर्याय न स्वीकारता व्यवसाय करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी बिझिनेस फोरम स्थापन केला आहे. वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यामुळे सतत वाढणारी स्पर्धा, वेळोवेळी बदलणाऱ्या कायद्यांचे फायदेतोटे, व्यवसायासाठी जागतिक स्तरावर खुली होणारी नवनवीन दालने यांची माहिती होण्यासाठी या फोरमची स्थापना करण्यात आली आहे. फोरममार्फत पहिली बिझिनेस क़ॉन्फरन्स येत्या रविवारी (ता. ५ जून) रत्नागिरीच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
       सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या कॉन्फरन्समध्ये उद्योगाचे अर्थ आणि नियोजन (ठाण्याचे व्यावसायिक सल्लागार नरेंद्र महाजनी), केबीबीएफचे कार्य आणि उद्दिष्टे (मनोज कळके) आणि व्यवसायाच्या अभिनव कल्पना (पितांबरी उद्योगाचे सीएमडी रवींद्र प्रभुदेसाई) यांची व्याख्याने होणार आहेत. त्यानंतर चर्चासत्र आणि शंकासमाधान होईल.
       कऱ्हाडे ब्राह्मण व्यावसायिकांनी प्रत्येकी २०० रुपये शुल्क असलेल्या दिवसभराच्या या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी सुहास ठाकूरदेसाई, योगेश मुळ्ये, रुची महाजनी किंवा प्रशांत पाध्ये यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
...........................
संपर्क – १) सुहास ठाकूरदेसाई - ९८२२२९०८५९
२) योगेश मुळ्ये - ९४२२०५६९२९
३) रुची महाजनी – ९८८११५९३२०
४) प्रशांत पाध्ये - ९४२२६३५८०४