Thursday 2 April 2015

आरोग्याबाबत आत्मविश्वास जागवणे हीच खरी रुग्णसेवा



रायपाटण (ता. राजापूर) - आरोग्याबाबत रुग्णाच्या मनात आत्मविश्वास जागवणे हीच खरी रुग्णसेवा होय, असे उद्गार इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक अशोक सेन यांनी काढले.

मुंबईच्या नानावटी रुग्णालयाच्या माध्यमातून इंडियन ऑइल (पश्चिम क्षेत्र) या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आणि नवजीवन विकास संस्थेने येथे नुकत्याच आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रक्कम खर्च करून आरोग्यसेवा कोठेही मिळते, मात्र आस्थेने तपासणी करून त्यांच्या मनातील आत्मविश्वास जागृत करणे, धीर देणे ही कामे करून डॉक्टरने रुग्णाच्या मनाला संजीवनी द्यायची असते, असेही श्री. सेन यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर दिलीप हरी (जनरल मनेजर इंडियन ऑइल), वासुदेव तुळसणकर (सामाजिक कार्यकर्ते), उदय बेडेकर (इंडियन ऑइल), राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. एस. एस. चव्हाण, रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. पटेल, परिचारिका सौ. शिंदे इत्यादी उपस्थित होते.

नवजीवनचे विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष महेश लक्ष्मण पळसुलेदेसाई यांनी प्रास्ताविक, तर पाचलच्या सरस्वती लॅबचे मंगेश पराडकर यांनी स्वागत केले. वडचाई व्यायामशाळेचे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबा शेट्ये यांनी सर्व रुग्णांना अल्पोपाहार दिला. शिबिराला अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी महिला रुग्णांना घेऊन येण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली. शिबिर यशस्वी होण्यासाठी राजापूरचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव आणि महिला बालविकास अधिकारी सौ. व्हटकर यांनी मोलाची मदत केली.

शिबिराचे संयोजन इंडियन ऑइलचे आरोग्य अधिकारी विजय तावडे यांनी पार पाडले. शिबिरात १४० महिला आणि बालरुग्णांची तपासणी करून औषधांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. शिबिरात सहभागी रुग्णांना विविध भेटवस्तू देण्यात आल्या. मुलांना बिस्किट्स, सुका मेवा आणि पॅड, पेन, रंगपेटी असे शालोपयोगी साहित्य तर महिलांना घरसजावटीच्या वस्तू इंडियन ऑइलतर्फे सौ. पूजा काकोडकर यांनी वितरित केल्या. तपासणी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन श्री. तावडे यांनी दिले. शिबिराची भोजन व्यवस्था सौ. वैशाली आणि विद्याधर पळसुलेदेसाई यांनी पार पाडली.

रायपाटण (ता. राजापूर) येथील आरोग्य शिबिर


Wednesday 1 April 2015

मठ येथे लक्ष्मीपल्लीनाथाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता



लांजा – तालुक्यातील मठ येथील नव्याने स्थापन झालेल्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या मंदिरात दुर्मिळ पंचकुंडी यज्ञासह मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता रविवारी (ता. 29) झाली.
तीन दिवसांच्या या सोहळ्यात लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम पार पडले. पहिल्या दिवशी लक्ष्मीपल्लीनाथ, गणपती तसेच महालक्ष्मी या तीन मूर्तींचा जलाधिवास आणि पंचकुंडी हवन झाले. दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा करायच्या तिन्ही देवतांची ढोलताशांच्या गजरात रथातून मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये शेकडो भक्त सहभागी झाले. विश्वकर्मा पूजनाच्या वेळी तिन्ही दगडी मूर्ती आणि मंदिराचा दगडी गाभारा साकारणारे कुडाळ येथील शिल्पकार कुडीगार यांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळी श्रीकृष्ण पंडित यांनी आयोजित केलेल्या कुलोपासकांच्या स्वरसंगम या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने परिसर भक्तिमय होऊन गेला. अखेरच्या दिवशी तिन्ही मूर्तींचा प्राणप्रतिष्ठेचा महत्त्वाचा विधी लक्ष्मीपल्लीनाथाच्या गजरात पार पडला.
पंचकुंडी यज्ञाने हा प्राणप्रतिष्ठा विधी झाला. पन्नास ब्रह्मवृंदांनी विनामोबदला पौरोहित्य केल्याने सुमारे दहा लाख रुपयांच्या निधीची बचत झाली, अशी माहिती आणि दुर्मिळ यज्ञाविषयीची माहिती वेदमूर्ती विश्वास ऊर्फ नाना जोशी यांनी माहिती दिली. विश्वस्त राजू नेवाळकर सूत्रसंचालन केले. संस्थानच्या कार्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, विश्वस्त शशिकांत गुणे, रवींद्र भाटे इत्यादींनी समारंभाचे उत्तम नियोजन केले.

-    लक्ष्मीपल्लीनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारी प्रतिष्ठापित झालेली गणपतीची मूर्ती.

प्रवेशद्वारी प्रतिष्ठापित करण्यात आलेली लक्ष्मीची मूर्ती.

गाभाऱ्यात विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली लक्ष्मीपल्लीनाथाची मूर्ती